मध्य चीनमध्ये सुमारे एक हजार मेट्रिक टन उच्च गुणवत्तेच्या सोन्याच्या धातूचा मोठा साठा सापडला आहे. चीनच्या शासकीय माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. बहुतांश मोठे खनिजसाठे चीनलाच का सापडतात, इतर देशांच्या भूगर्भात खनिजे नाहीत का, भारतात असे मोठे साठे का आढळत नाहीत, याविषयी…
चीनमध्ये सोन्याचा साठा कोठे आणि किती?
चीनच्या हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोला पिंगजियांगच्या ईशान्य हुनान काउंटीमध्ये दोन किलोमीटर (१.२ मैल) खोलीवर ४० सोन्याच्या शिरा (खडकातला साठा) सापडल्या. या एकट्या खाणीत ३०० मेट्रिक टन सोने असल्याचे म्हटले जात होते. थ्रीडी मॉडेलिंगनुसार, तीन किलोमीटरच्या खोलीपर्यंत आणखी साठा आढळू शकतो. ड्रिलींग केलेल्या अनेक खडकांमध्ये सोने दिसत असल्याचे सांगितले जात आहे. गाभ्यातून घेतलेल्या खडकांच्या नमुन्यांनुसार, प्रत्येक मेट्रिक टन धातूमध्ये १३८ ग्रॅम (जवळपास ५ औंस) सोने असू शकते. शिवाय त्याची गुणवत्ता पातळीही अत्युच्च दर्जाची आहे.
सोन्याचा साठा किती मोठा?
तब्बल ६०० अब्ज युआन किंवा ८३ अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचा, हा आतापर्यंत सापडलेला सोन्याचा सर्वात मोठा आणि किफायतशीर साठा मानला जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेतील साउथ डीप माइन या सर्वात खोल खाणीत अंदाजे ९०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे. हा साठा आतापर्यंत जगातला सर्वात मोठा मानला जातो होता. पण चीनमधील साठ्याने त्याला मागे टाकले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मार्शल लॉ’ जारी करणाऱ्या अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात! दक्षिण कोरियात नेमके काय घडले?
सोन्याच्या बाजारपेठेत चीनचे वर्चस्व
जागतिक सोन्याच्या बाजारपेठेवर चीनचे आधीपासूनच वर्चस्व आहे. २०२४ च्या सुरुवातीच्या नोंदीनुसार, चीनकडे सोन्याचा दोन हजार टनांहून अधिक राखीव साठा आहे. त्याच्या खाण उद्योगाचा जागतिक उत्पादनात सुमारे दहा टक्के वाटा आहे.
सोने हा एक प्राचीन धातू आहे आणि पूर्वापार त्याला संपूर्ण मानवी इतिहासात बहुमोल मानले गेले आहे. आधीच गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतीत या चीनमधील उत्खननाच्या घोषणेने भर पडणार आहे.
चीनमध्ये इतकी खनिजे का मिळतात?
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजांचे साठे सातत्याने मिळतच असतात. सोन्याची ही खाण सापडण्याआधी अशाच प्रकारे तांब्याची खाण सापडली होती, तर त्यापूर्वी लिथिअमचा साठा आढळला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर साठे सापडण्याचे प्रमुख कारण आहे चीनकडे असलेले उत्खननाचे तंत्रज्ञान. भारतातही बहुवैशिष्ट्यांचा भूभाग पाहता असे बरेचसे खनिज साठे भूगर्भात असण्याची दाट शक्यता आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे तंत्रज्ञ, तंत्रज्ञान आपल्याकडे तूर्त तरी चीनच्या तुलनेत कमी आहे.
चीन खनिज उत्पादनांवर जास्त गुंतवणूक करते कारण चीनचा भर औद्योगिक क्षेत्रावर आहे. औद्योगिक क्षेत्राला या खनिज स्रोतांची आवश्यकता असते. त्यामुळे दुर्मीळ भूगर्भीय खनिजे शोधून काढण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान चीनकडे आहे आणि इतर अनेक गोष्टी चीन जगभरात निर्यात करत असला तरी हे तंत्रज्ञान चीनने कोणालाच निर्यात केलेले नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : कर्जाचा हप्ता कमी होणार का? रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत काय निर्णय घेणार?
द्विमितीय सोने?
तंत्रज्ञानात चीन इतका आघाडीवर आहे की नैसर्गिक धातूतही तिथे नवनवीन प्रयोग होत आहेत. सोने नैसर्गिकरित्या कसे बनते याबद्दल अधिक जाणून घेण्याव्यतिरिक्त, तेथील शास्त्रज्ञ नवीन गोष्टींचादेखील शोध घेत आहेत. एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ‘गोल्डीन’ नावाचा द्विमितीय सोन्याचा नवीन प्रकार तयार करण्यात आला, ज्याची उंची केवळ अणूंचा एकच थर आहे, ज्याचे काही मनोरंजक गुणधर्म सोन्याच्या त्रि-आयामी स्वरूपात दिसत नाहीत.
चीनच्या तुलनेत खनिजक्षेत्रात भारत कुठे?
चीनचे उत्खननाद्वारे मिळणारे उत्पादन सुमारे २५ टक्के तर भारताचे सुमारे ५ टक्के आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात खनिजनिर्मितीचा वाटा अवघा २ टक्के आहे. खनिजसाठा सापडलाच तर त्या खनिजाला शुद्ध रूपात बाहेर काढण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान आपल्या देशात नाही. मागे जम्मू-काश्मीरमध्ये लिथिअमचा मोठा साठा सापडला आहे. पण या लिथिअमवर प्रक्रिया करून त्याचे शुद्ध रूपात उत्पादन घेण्यासाठी एकाही उद्योगाने अद्याप बोली लावलेली नाही. आपल्या देशात खाण क्षेत्रांना शासकीय परवानग्या, नियमावलीच्या लाल फितीचाही अनेकदा जाच होतो.