अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धामध्ये अमेरिकेच्या वाढीव आयातशुल्कानंतर चीनकडून दुर्मीळ संयुगांवरील (रेअर अर्थ) निर्यातबंदीचे हत्यार उपसण्यात आले आहे. याचा अमेरिका आणि उर्वरित जगाला नक्कीच फटका बसणार आहे. पण ही संयुगे आहेत तरी कोणती आणि त्याचा वापर कसा केला जातो ते पाहणे आवश्यक आहे.
परस्परांवर शुल्कास्त्रे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ एप्रिलपासून चिनी मालावर ३४ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लागू केले. या दिवसाचा उल्लेख त्यांनी आयातशुल्क मुक्तीदिन असा केला. उत्तरादाखल, चीनने ४ एप्रिलला अमेरिकेला केल्या जाणाऱ्या सात दुर्मीळ संयुगांच्या विक्रीवर निर्बंध लागू केले. त्यानुसार, खनिज उत्पादकांना निर्यात परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दुसरीकडे, हे परवाने देण्याची प्रक्रिया चीनने व्यवस्थित सुरू केलेली नाही. हा नियम म्हणजे अगदीच खनिजविक्रीवरील बंदी नसली तरी त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकी उत्पादक व कंत्राटदारांना बसणार आहे. त्यापूर्वी चीनने तीन कमी दुर्मीळ पण महत्त्वाच्या संयुगांच्या आयातीवर बंदी घातली आहे आणि अन्य काही खनिज धातूंच्या विक्रीवर नियंत्रण आणले आहे.
‘रेअर अर्थ’चे महत्त्व

ही सर्व संयुगे अत्यल्प प्रमाणात सापडतात. मात्र त्यांचा वापर अतिशय महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये केला जातो. त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने, बॅटरी, नूतनीकरण करता येणारी उत्पादने, शस्त्रे आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. त्याशिवाय विजेवर चालणाऱ्या कार, ड्रोन, यंत्रमानव यांच्या उत्पादनांसाठी ही संयुगे महत्त्वाची आहेत. त्याशिवाय आणखी एक बाब महत्त्वाची आहे – ही दुर्मीळ संयुगे बहुतांश करून चीनमध्ये सापडतात, तिथेच त्यांच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते आणि चीनकडूनच त्यांचा उर्वरित जगाला पुरवठा होतो.

दोन वर्षांपूर्वीही निर्यात निर्बंध

अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध नवीन नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणाऱ्या चीनवर ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळापासून, म्हणजे २०१७पासून अमेरिकेने निर्बंध लादले. त्यानंतर हे व्यापारयुद्ध तीव्र झाले. दोन वर्षांपूर्वी चीनने गॅलियम आणि जर्मेनियम या खनिज धातूंच्या निर्यातीवर निर्बंध घातले. हे दोन्ही धातू सेमीकंडक्टर उद्योगासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. संगणकाच्या चिप्स, रडार आणि उपग्रहांमध्ये त्याचा वापर केला जातो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंधांची तीव्रता वाढवत चीनने या धातूंच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली. पाश्चात्त्य देशांमध्ये या धातूंची किंमत दोन ते तीन पट अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी, उत्पादकांनी बंदीपूर्वीच त्यांचा साठा करून ठेवल्यामुळे अद्याप अमेरिकेला त्याचा तुटवडा जाणवत नाही. त्याशिवाय अन्य काही देशांमधूनही हे धातू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा आहे.

नवीन निर्बंधांमुळे नुकसान

गॅलियम आणि जर्मेनियमच्या निर्यातबंदीमुळे अमेरिकेचे फारसे नुकसान झाले नसले तरी नव्याने लादलेल्या सात संयुगांवरील निर्यातनिर्बंधांमुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. निर्बंध घातलेल्या या दुर्मीळ संयुगांची जागा अन्य खनिजे घेऊ शकत नाही. पवनचक्क्या, विमाने आणि अवकाश यान यांना ऊर्जा प्रदान करणाऱ्या चुंबकांमधील उष्णतेचे नियमन करण्याचे काम डिस्प्रोसियम आणि टर्बियम हे दुर्मीळ खनिज धातू करतात. मोटार जितकी मोठी तितक्या अधिक जड दुर्मीळ भूखनिजाची आवश्यकता असते असे या क्षेत्रातील तज्ज्ञ आयोनट लाझर सांगतात. उरलेली पाच संयुगे कृत्रिम प्रज्ञेसाठी आवश्यक चिप्स तयार करण्यासाठी महत्त्वाची आहेत. त्याशिवाय एमआरआय स्कॅनर, लेझर आणि फायबर ऑप्टिक्समध्येही त्यांचा वापर केला जातो.

संयुगांवरील चीनचे वर्चस्व

चीनचे हलक्या वजनाच्या संयुगांपेक्षा जड वजनाच्या दुर्मीळ संयुगांच्या उत्पादनांवर वर्चस्व आहे. या संयुगांच्या स्वदेशासह म्यानमारमधील बहुतांश खाणींवर चीनचे नियंत्रण आहे. खाणींमधून बाहेर काढलेल्या ९८ टक्के संयुगांवर चीनमध्ये प्रक्रिया केली जाते. पृथ्वीच्या पोटात इतर खनिज धातूंप्रमाणेच दुर्मीळ धातूही शुद्ध स्वरूपात आढळत नाहीत. तसेच गॅलियम व जर्मेनियम हे धातू ॲल्युमिनियम आणि जस्ताच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनादरम्यान उप-उत्पादन म्हणून हाती लागतात. या सात दुर्मीळ धातूंचे तसे नाही. संयुगांतून त्यांचे पृथःकरण करण्यासाठी भरपूर काम आणि विशेष कौशल्याची आवश्यकता असते. चीनमधील खाणींमधून बाहेर काढलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या प्रत्येक दुर्मीळ धातूंवर तेथील सरकारचे बारकाईने लक्ष असते. हे धातू कुठे जातात याचा माग ठेवला जातो. तसेच जगभरातील कोणत्या कंपन्याकडून या दुर्मीळ धातूंना मागणी आहे याची नोंद ठेवलेली असते. त्यामुळे अमेरिकेला अन्य कोणत्या मार्गाने ही दुर्मीळ संयुगे प्राप्त करणे तितकेसे सोपे नाही असे ‘ॲडम्स इंटेलिजन्स’ या संशोधन संस्थेचे रायन कॅस्टिलक यांचे म्हणणे आहे.

nima.patil@expressindia.com