वीजनिर्मिती करिता, वर्षभर नागरी वस्त्यांमध्ये पाणी पुरवण्याकरिता, पूर नियंत्रणाकरिता धरणं अत्यंत महत्त्वाची असतात. मात्र, जगातील सर्वात मोठे धरण गेल्या काही काळापासून वादग्रस्त ठरत आहे. या धरणाच्या अस्तित्वामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगात बदल झाला असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील थ्री गॉर्जेस धरण जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. हे धरण केवळ त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारासाठीच नव्हे तर पृथ्वीच्या परिभ्रमणावरील संभाव्य प्रभावासाठीदेखील फार पूर्वीपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. हा दावा जरी अवास्तव वाटत असला तरी असे वैज्ञानिक पुरावे आहेत की, हे धरण खरोखरच ग्रहाचा वेग मंद करू शकते. थ्री गॉर्जेस आकर्षणाचा विषय का ठरत आहे? धरणाचा पृथ्वीच्या परिभ्रमणावर कसा परिणाम होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थ्री गॉर्जेस धरण

चीनच्या हुबेई प्रांतातील यांग्त्झी नदीवर असलेले थ्री गॉर्जेस धरण हे अभियांत्रिकीचा एक अतुलनीय नमुना आहे. सुमारे दोन दशकांच्या बांधकामानंतर २०१२ मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. आश्चर्यकारक म्हणजे, हे धरण २,३३५ मीटर (७,६६० फूट) लांब आणि १८५ मीटर (६०७ फूट) उंच असून जगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे धरण आहे. धरणाच्या जलाशयात ४० घन किलोमीटर (सुमारे १० ट्रिलियन गॅलन) पाण्याची क्षमता आहे, जी लाखो लोकांच्या ऊर्जेच्या गरजा भागवून २२,५०० मेगावॅट वीज निर्मिती करू शकते. जलविद्युत क्षमतेच्या पलीकडे, धरण पूर नियंत्रित करते आणि नदीचे जलवाहतूक सुधारते; ज्यामुळे हे धरण चीनच्या व्यापक आर्थिक आणि पायाभूत धोरणासाठी महत्त्वाचे मानले जाते. या धरणाचे फायदे असूनही, हा प्रकल्प त्याच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांमुळे वादात सापडला आहे. धरणामुळे १.३ दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आणि ६३२ चौरस किलोमीटर परिसरातील वन्यजीव अधिवास आणि स्थानिक परिसंस्थेवर याचा परिणाम झाला आहे.

चीनच्या हुबेई प्रांतातील यांग्त्झी नदीवर असलेले थ्री गॉर्जेस धरण हे अभियांत्रिकीचा एक अतुलनीय नमुना आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : एकेकाळी ब्रॅण्ड्सचं माहेरघर असणार्‍या चीनमध्ये बनावटी वस्तूंचं जाळं; कारण काय?

धरणाचा पृथ्वीच्या परिभ्रमणावर कसा परिणाम होतो?

थ्री गॉर्जेस धरणाबद्दलचा सर्वात आश्चर्यकारक दावा म्हणजे, त्याचा पृथ्वीच्या परिभ्रमणावर होणारा संभाव्य परिणाम. हा मुद्दा सर्वप्रथम २००५ च्या नासाच्या पोस्टमध्ये पहिल्यांदा चर्चेत आला होता. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील भूभौतिकशास्त्रज्ञ डॉ. बेंजामिन फोंग चाओ यांच्या मते, धरणाच्या विशाल जलाशयात पृथ्वीचा वेग मंदावण्यासाठी पुरेसे पाणी आहे. त्याचा पृथ्वीच्या जडत्वावर परिणाम झाला आहे. चाओ यांनी केलेल्या गणनेत असे आढळून आले की, पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी झाल्यामुळे दिवसाची वेळ ०.०६ मायक्रोसेकंदांनी वाढली आहे. त्याचा अर्थ असा की, दिवस काही प्रमाणात का होईना मोठा झाला आहे. थ्री गॉर्जेस धरणामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवदेखील आपल्या ठिकाणाहून प्रत्येकी दोन सेंटीमीटर (०.८ इंच) सरकले आहेत, असेही सांगितले जात आहे. “हा आकडा जरी आपल्याला कमी वाटत असला तरी मानवनिर्मित संरचनेसाठी महत्त्वपूर्ण आहे,” असे चाओ म्हणाले.

आपत्तींचा पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम होऊ शकतो का?

भूकंपांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहाच्या फिरण्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याचा नासाच्या शास्त्रज्ञांनी दीर्घकाळ अभ्यास केला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे, २००४ मध्ये जेव्हा हिंद महासागरात मोठा भूकंप आणि त्सुनामी आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात टेक्टोनिक प्लेटच्या हालचालींमुळे दिवसाची लांबी २.६८ मायक्रोसेकंदांनी कमी झाली, असे नासाच्या संशोधनात आढळून आले. थ्री गॉर्जेस धरणाचा प्रभाव भूकंपाच्या तुलनेत खूपच कमी असला, तरी पृथ्वीच्या रोटेशनल डायनॅमिक्सच्या संतुलनावर याचा परिणाम होऊ शकतो. काही घटना आणि त्यांच्या एका दिवसाच्या कालावधीवर झालेला परिणाम:

-थ्री गॉर्जेस धरण : +०.०६ मायक्रोसेकंद

-२००४ हिंद महासागर भूकंप : -२.६८ मायक्रोसेकंद

-हवामान बदल (अनुमानित परिणाम) : हळूहळू वाढ दर्शवली जात आहे.

मानवनिर्मित थ्री गॉर्जेस धरणामुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणावर तर परिणाम होतच आहे, परंतु पृथ्वीचा वेग मंदावण्यात हवामान बदलदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हवामान बदलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणावर होणारा परिणाम

मानवनिर्मित थ्री गॉर्जेस धरणामुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणावर तर परिणाम होतच आहे, परंतु पृथ्वीचा वेग मंदावण्यात हवामान बदलदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जसजसे जागतिक तापमान वाढते, तसतसे ध्रुवीय बर्फ वितळते आणि समुद्राची पातळी वाढते; ज्यामुळे विषुववृत्ताजवळ अधिक पाणी साचत जाते आणि पृथ्वीचा वेग मंद होऊ लागतो. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, माणूस इतर मार्गांनीही पृथ्वीच्या परिभ्रमणावर प्रभाव टाकत आहेत. विषुववृत्तावर पाण्याचा संचय ध्रुवीय बर्फ वितळण्यामुळे आणखी वाढणार आहे, त्यामुळे येत्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ताजमहालचं वैभव धोक्यात; भिंतींना तडे, पाण्याची गळती अन् बरंच काही, नुकसानाची व्याप्ती किती?

वेळ पाळण्याच्या पद्धतीत होणार बदल?

या बदलांचा सर्वात मोठा परिणाम वेळ पाळण्याच्या पद्धतीत होऊ शकतो. पृथ्वीचे परिभ्रमणाचा वेग हळूहळू कमी होत असताना अगदी एका सेकंदाच्या लहान फरकानेही ‘ॲटोमिक क्लॉक’सारख्या अति-अचूक मोजमापांसाठी वापरल्या जाणार्‍या यंत्रणांमध्ये बदल करणे आवश्यक होऊ शकते. या बदलांचा एकत्रित परिणाम जीपीएस प्रणाली, उपग्रह संप्रेषण आणि आर्थिक व्यवहारांसह अचूक वेळेवर अवलंबून असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये होऊ शकतो. “आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा परिणाम नगण्य आहे, परंतु त्यामुळे ‘ॲटोमिक क्लॉक’सारख्या अति-अचूक वेळ पाळणाऱ्या उपकरणांचा गोंधळ होऊ शकतो, असे ‘आयएफएल सायन्स’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China gigantic three gorges dam slow down earth rotation rac
Show comments