धर्मेश शिंदे
भविष्यातील कौशल्यसिद्ध पिढी घडविण्यासाठी चीनने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) शिक्षणाचा समावेश करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना सध्याच्या तसेच भविष्य काळातील अत्यावश्यक तंत्रज्ञान कौशल्यांनी सुसज्ज करणे आहे. चीनने घेतलेल्या भूमिकेचे थोडक्यात विश्लेषण.
कशी होईल सुरुवात?
जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी चीनने मुलांना लहान वयातच एआयचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात बीजिंगपासून होत आहे. येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एआय शिक्षण अनिवार्य आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान आठ तास कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण मिळेल. सहा वर्षांचे विद्यार्थी चॅटबॉट्स वापरण्यास, मूलभूत कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना समजून घेण्यास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नीतिमत्तेचा शोध घेण्यास शिकतील, असे ‘फॉर्च्यून’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे.
अंमलबजावणीचे धोरण कसे?
शाळांमध्ये विद्यमान अभ्यासक्रमात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषय समाविष्ट करण्याची किंवा ते स्वतंत्र म्हणून देण्याची मुभा असेल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी, मूलभूत कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना सादर करण्यासाठी प्रत्यक्ष कृतींवर लक्ष केंद्रित केले जाईल. माध्यमिक शाळेतील विद्यार्थी दैनंदिन जीवनात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर, त्याचे उपयोग याचा अभ्यास करतील. उच्च माध्यमिक वर्गात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबच्या नवीन कल्पनांवर भर असेल. फॉर्च्यूनच्या अहवालानुसार, बीजिंग म्युनिसिपल एज्युकेशन कमिशनने घोषणा केली की शाळा विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या विद्यमान विषयांमध्ये एआय शिक्षणाचा समावेश करू शकतात किंवा ते स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून देऊ शकतात. आयोगाने बहु-वर्षीय अभ्यासक्रम स्थापित करण्याची, सामान्य शिक्षण प्रणाली तयार करण्याची, समर्थन संरचना प्रदान करण्याची आणि शाळांमध्ये एआय शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची योजनादेखील उघड केली.
उपक्रमाचे उद्दिष्ट काय?
जागतिक एआय उद्योगातील स्पर्धेत टिकण्यासाठी चीन एआयचे शालेय स्तरावर शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक मानतो. डिसेंबरमध्ये चीनच्या शिक्षण मंत्रालयाने देशभरातील १८४ शाळांची निवड केली जेणेकरून ते कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम प्रायोगीक स्तरावर राबवू शकतील आणि नंतर देशभरात विस्तारू शकतील. चीनचे शिक्षणमंत्री हुई जिनपेंग यांनी एआयचे महत्त्व अधोरेखित केले आणि ते देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी ‘गोल्डन की’ असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण सुरू केल्याने तांत्रिक क्षेत्रातील नव-नव्या कल्पनांमध्ये यामुळे योगदान मिळेल. बीजिंगचा दृष्टिकोन हांगझोऊमधील झेजियांग विद्यापीठाच्या यशाने प्रेरित असू शकतो, ज्याने डीपसीकचे लियांग वेनफेंग आणि युनिट्रीचे वांग झिंगझिंगसारखे तंत्रज्ञ निर्माण केले. राष्ट्रीय कम्युनिस्ट पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात हुआई यांनी घोषणा केली की, चीन २०२५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणावर एक पत्रक प्रसिद्ध करेल. या दस्तऐवजात शिक्षण व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकात्मिकतेसाठी धोरणे, उद्दिष्टे आणि पद्धतींची रूपरेषा असेल.
जागतिक संदर्भ काय?
चीन सरकारने बीजिंग संदर्भात घेतलेला निर्णय एआय शिक्षणातील जागतिक कल दाखवून देत आहे. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियाने शालेय अभ्यासक्रमात एआय साक्षरतेचा समावेश करण्यासाठी कायदे केले आहेत आणि इटली डिजिटल कौशल्ये वाढविण्यासाठी वर्गात एआय साधनांचा प्रयोग करत आहे. जगभरातील देश एआय शिक्षणाचे महत्त्व ओळखत आहेत आणि ते त्यांच्या शैक्षणिक चौकटीत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एस्टोनियाच्या सरकारने अलीकडेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ‘चॅट जी.पी.टी. एज्यू’ सादर करण्यासाठी ‘ओपन एआय’शी भागीदारी केली आहे. कॅनडा, दक्षिण कोरिया आणि यूकेने देखील के-१२ शिक्षणात एआयचा समावेश केला आहे. काही संस्था एआय संचालित पाठ्यपुस्तके वापरतात, तर यूकेमधील एका खासगी शाळेने ‘शिक्षकविरहित’ वर्गखोली सुरू केली आहे. तेथे विद्यार्थी शिकण्यासाठी ‘व्हर्च्युअल रिॲलिटी हेडसेट’ आणि एआयवर अवलंबून असतात.