Pakistan Launches Hangor Class Submarine : कर्जाच्या भरमसाट ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. आर्थिक संकट आणि महागाईमुळे पाकिस्तानी लोकांचं जगणं कठीण झालं आहे. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाककडून अनेक देशांकडे कर्जासाठी विनंती केली जात आहे. मात्र, चीन वगळता कुठलाही देश पाकिस्तानच्या मदतीला पुढे येत नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, चीननं पाकिस्तानला पुन्हा मदतीचा हात दिला असून, एक अत्याधुनिक पाणबुडी पाठवली आहे. या पाणबुडीमुळे पाकच्या नौदलाला बळकटी मिळणार आहे, ज्यामुळे भारतासमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता आहे.
चीन-पाकिस्तानमध्ये आठ पाणबुड्यांचा करार
मागील दोन-तीन वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तिला रुळावर आणण्यासाठी पाकिस्ताननं अनेकदा चीनकडे मदतीची झोळी पसरवली आहे. एका रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ पर्यंत चीन हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा कर्जदार आहे. आर्थिक मदतीबरोबरच चीकडून पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धनौका, तसेच पाणबुड्याही दिल्या जात आहे. नौदलाला बळकटी मिळावी म्हणून पाकिस्ताननं चीनकडे हँगर श्रेणीतल्या आठ पाणबुड्यांची मागणी केली होती. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये तब्बल पाच अब्ज डॉलर्सचा करारही झाला होता.
आणखी वाचा : Pakistan Terrorists : पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत? भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?
करारानुसार, पाकिस्तान चीनकडून आठ हँगोर श्रेणीतल्या पाणबुड्या खरेदी करील. त्यापैकी चार पाणबुड्या चीनमध्ये बांधल्या जातील; तर उर्वरित चार पाणबुड्यांची निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतर कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानमधील कराची येथे केली जाईल. या पाणबुड्या अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज असतील. त्यामुळे त्या स्टँडऑफ रेंजमधील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम होतील, असं पाकिस्तानी नौदलानं म्हटलं आहे. एप्रिल २०२४ मध्ये चीननं पहिली अत्याधुनिक पाणबुडी पाकिस्तानला दिली होती. त्यानंतर आता दुसरी पाणबुडीही पाकिस्तानला सुपूर्द केल्याची माहिती आहे.
पाकिस्तानच्या नव्या पाणबुडीचं वैशिष्ट्य काय?
ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, वुचांग शिपबिल्डिंग इंडस्ट्री ग्रुप (डब्ल्यूएसआयजी) शुआंग्ल्यू बेसवर सोमवारी (तारीख १७ मार्च) या पाणबुडीचा लाँच समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला पाकिस्तान नौदलप्रमुख अॅडमिरल नवीद अश्रफ उपस्थित होते. हँगोर क्लास ही चीनच्या ०३९ए पाणबुडीची निर्यात आवृत्ती असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये ३८ क्रू मेंबर्स आणि आठ विशेष दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. या पाणबुडीमध्ये ४६ लोक वाहून नेण्याची क्षमता आहे. चीननं २०२२ मध्येही पाकिस्तानी हवाई दलाला मल्टीरोल J-10CE लढाऊ विमानांचा पहिला पुरवठा केला होता, ज्यामध्ये दोन्ही देशांनी संयुक्तपणे उत्पादित केलेल्या JF-17 लढाऊ विमानांचा समावेश होता.
चीनची भारताविरोधात कुरघोडी?
काही दिवसांपासून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात पाकिस्तानच्या हालचाली वाढत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी चीन भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. चीननं यापूर्वी पाकिस्तानच्या नौदलाला बळकटी देण्यासाठी चार आधुनिक युद्धनौका दिल्या होत्या. स्वीडिश लष्करी थिंक टँकच्या मते, गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत चीनचा तब्बल ८१ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. या संयुक्त उपक्रम प्रकल्पांमध्ये हँगर, तसेच जेएफ-१७ लढाऊ विमानांचा समावेश आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या हँगोर पाणबुडीची रचना भारताच्या कलवारी पाणबुडीसारखीच करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानची पाणबुडी आकाराच्या बाबतीत भारतीय पाणबुडीच्या तुलनेत खूपच मोठी असल्याचं सांगितलं जात आहे.
पाणबुडीबाबत पाकिस्तानचा दावा काय?
भारताच्या कलवारी पाणबुडीचं वजन १,७७५ टन आणि लांबी ६७.५ मीटर आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या हँगोर पाणबुडीचं वजन तब्बल २,८०० टन आहे. तसेच तिची एकूण लांबी ७६ मीटर व रुंदी ८.४ मीटर आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, चीनकडून मिळालेल्या अत्याधुनिक पाणबुडीमध्ये रडारपासून वाचण्याची क्षमता आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला मिळालेली नवीन पाणबुडी अत्याधुनिक असली तरी भारताच्या कलवारी पाणबुडीमध्ये तिचा प्रतिकार करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानी हँगोर पाणबुडीचा कमाल वेग २० नॉट्स (ताशी ३७ किमी) असल्याचं सांगितलं जातं. भारताच्या पाणबुडीचा वेगही ताशी ३० ते ३२ किमीच्या आसपास आहे.
पाकिस्तानी पाणबुडीचा भारताला कितपत धोका?
हँगोर पाणबुडीच्या खरेदीमुळे पाकिस्तानची लष्करी ताकद पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. भारताची पाकिस्तानला लागून मोठी सीमा आहे. दोन्ही देशांमधील संबंध गेल्या अनेक दशकांपासून बिघडले आहेत. उत्तरेकडील वादग्रस्त प्रदेशावरील युद्धात पाकिस्ताननं भारताचा सामना करण्यासाठी यापूर्वीही पाणबुड्यांचा वापर केला होता. तज्ज्ञांचं असं मत आहे की, चीननं पाकिस्तानला हँगोर पाणबुडी दिली असली तरी या पाणबुडीचा भारतासाठी काहीही धोका नाही. कारण- भारतानं यापूर्वीही युद्धभूमीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत हा पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. भारताकडे राफेलसारखी अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि आयएनएस अरिघाटसारख्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या आहेत.
हेही वाचा : समुद्रात ‘तो’ तीन महिने भरकटला, पक्षी आणि झुरळं खाऊन कसा वाचवला जीव?
चीन पाकिस्तानचा सर्वांत मोठा कर्जदाता
चीन हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा कर्जदाता आहे. एका रिपोर्टनुसार, चीननं पाकिस्तानला सुमारे २९ अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. चीननंतर जागतिक बँकेनं पाकिस्तानला २३.५५ अब्ज व आशियाई विकास बँकेनं १९.६३ अब्जांचा निधी दिला आहे. सौदी अरेबियानंही पाकिस्तानला तब्बल ९.१६ अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तानची अवस्था कमकुवत होत असून, त्याबद्दल जागतिक बँकेनं त्यांना इशारा दिला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला तब्बल सात अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मिळाली होती. या मदतीनंतर पाकिस्ताननं देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला; मात्र अजूनही त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही.
पाकिस्तानवर कर्जाचा मोठा बोजा
इस्लामाबादस्थित अर्थतज्ज्ञ सफिया आफताब यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, चिनी लोकांनी पाकिस्तानला ३.७ टक्के व्याजदरानं पैसे दिले आहेत. हा व्याजदर सरकारी व्याजदरापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी कर्जाची परतफेड करणं आव्हानात्मक आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षी चीनला पत्र लिहून पाकिस्तानच्या कर्जाची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. सध्या चीनकडून पाकिस्तानला कर्जाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळेच पाकिस्तान हा चीनसह जागतिक बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी काय योजना आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.