गेल्या कित्येक वर्षांपासून चीनमधील उइघर आणि इतर मुस्लीम गटांच्या मानवी हक्कांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय राहिला आहे. तिबेट, अरुणाचल प्रदेश, लडाख या आंतरराष्ट्रीय सीमांवर चीनकडून ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतली जात आहे, त्याचप्रकारे त्यांच्याच देशात राहणाऱ्या मुस्लीम अल्पसंख्याकांवर चीनकडून अनन्वित अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच संयुक्त राष्ट्रामध्ये सादर करण्यात आलेल्या एका बहुचर्चित अहवालातून उघड झाली आहे. संयुक्त राष्ट्राचे मावळते मानवाधिकार उच्चायुक्त मायकल बॅचलेट यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अवघे काही तास आधी हा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हातील परिषदेत मांडला आणि चीनच्या अतिरेकी वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं.
काय आहे अहवालात?
या अहवालातून चीनचा आपल्याच देशातील अल्पसंख्याकांविरोधातील आक्रमक आणि अन्यायकारक चेहरा जगासमोर उघडा पाडण्यात आला आहे. चीनच्या वायव्येकडे असणाऱ्या शीनजियांग प्रांतामध्ये उइघर आणि इतर मुस्लीम अल्पसंख्य गटांविरोधात चीनकडून मानवाधिकारांचं उल्लंघन करणारी अनेक कृत्ये झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या भागातील मुस्लिमांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याच्या आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. या नागरिकांचा छळ चीनकडून केला जात असून हा प्रकार मानवतेविरोघात आहे,. या भागातील जवळपास १० लाख उइघर आणि इतर मुस्लीम अल्पसंख्याकांना चीननं ताब्यात घेतल्याचा आरोप अनेक वर्षांपासून केला जात आहे. यावर अहवालात शिक्कामोर्तब करण्यात आलं नसलं, तरी या प्रांतामधील नागरिकांवर लैंगिक अत्याचार आणि त्यांच्यावर सक्तीचे वैद्यकीय उपचार करण्यात आल्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं देखील अहवालात म्हटलं आहे. शीनजियांगमधील उइघर स्वायत्त प्रदेशातील परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन बॅचलेट यांनी अहवालातून केलं आहे.
कोण आहेत उइघर मुस्लीम?
उइघर हे प्रामुख्याने मुस्लीम समाजातील असून चीनच्या शिनजियांग प्रांतात राहतात. या प्रांताला शिनजियांग उइघर ऑटोनॉमस रिजन असं अधिकृत नाव आहे. या भागात राहणाऱ्या उइघर नागरिकांची संख्या अंदाजे १२ मिलियन अर्थात जवळपास सव्वाकोटी इतकी आहे. त्यांच्या लोकसंख्येचं प्रमाण या प्रांताच्या जवळपास निम्मं आहे. तुर्की भाषेच्या जवळ जाणारी भाषा हा समाज बोलतो. मध्य आशियातील देशांबद्दल या समाजाला विशेष आपुलकी वाटते असं सांगितलं जातं.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद केलेल्या एका मोजणीनुसार १९५३मध्ये उइघर समाजाची लोकसंख्या शिनजियांग प्रांताच्या एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के इतकी होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधील दुसरा एक अल्पसंख्य गट असलेल्या हान समाजाचे लोक इथे मोठ्या संख्येने स्थलांतरीत होऊ लागले आहेत. जवळपास ६० वर्षांत हान समाजाची लोकसंख्या ७ टक्क्यांवरून थेट ४२ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. चीन सरकारने उइघर समाजाची लोकसंख्या कमी होण्यासाठी हान समाजाचं जाणूनबुजून या भागात स्थलांतर घडवून आणल्याचा देखील एक दावा केला जातो. मुस्लीम समाजाचे धार्मिक नेत्यांवर हल्ले, त्यांना धार्मिक प्रथा-परंपरा पाळण्यापासून मज्जाव करणे, शीनजियांग प्रांतातील मदरसे उद्ध्वस्त करणे असे काही प्रकार चीन सरकारकडून केले गेल्याचा देखील आरोप करण्यात येतो.
शीनजियांगमध्ये उइघर समाजाचा नरसंहार?
दरम्यान, या प्रांतामध्ये चीन सरकारकडून उइघर समाजातील मुस्लीम लोकांचा नरसंहार घडवून आणल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येतो. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनकडून प्रामुख्याने हे आरोप करण्यात येतात. या गटाला चीनमधून पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावर संपवण्याच्या प्रयत्नाचाच हा भाग असल्याचा देखील आरोप या देशांकडून केला जातो.
शीनजियांगमध्ये खरंच कथित ‘रीएज्युकेशन कॅम्प्स’ आहेत?
चीन सरकारने शीनजियांग प्रांतात राहणाऱ्या जवळपास १० लाख उइघर लोकांना सक्तीने बंदी बनवलं असून त्यांना कथित ‘रीएज्युकेशन कॅम्प्स’मध्ये डांबून ठेवल्याचा दावा केला जातो. बीबीसीनं २०२२मध्ये केलेल्या एका माहितीपटामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या कॅम्प्समध्ये उइघर लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जातात. जर कुणी या कॅम्प्समधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना जागीच गोळी घालण्याचे देखील आदेश देण्यात आल्याचं म्हटलं जातं. उइघर समाजाची लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी चीनकडून सक्तीने उइघर समाजातील महिलांची नसबंदी केली जाते, असा देखील दावा केला जातो.
चीनला उइघर मुस्लिमांचा इतका राग का?
चीनच्या मते उइघर आणि इतर मुस्लीम अल्पसंख्य समाज हा कट्टरवादी आणि विलगतावादी विचारसरणीचे आहेत. २०१४ साली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलेल्या काही भाषणांचे व्हिडीओ २०१९मध्ये समोर आले असून त्यामध्ये दडपशाहीचा वापर करून मुस्लीम कट्टरतावाद्यांना नष्ट करण्यासंदर्भात भूमिका मांडल्याचं दिसून आलं आहे. देशाची भौगोलिक एकता, सरकार आणि चीनी लोकसंख्येला असलेला धोका कमी करण्यासाठी शीनजियांग प्रांतातील री-एज्युकेशन कॅम्प महत्त्वाचे असल्याचं चीनमधील प्रशासनाला वाटतं.
शीनजियांगमध्ये मुस्लिमांचा अतोनात छळ, संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून उघड, चीनने आरोप फेटाळले
चीनचा अहवालावर आक्षेप
दरम्यान, चीननं हा अहवाल म्हणजे अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा कट असल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त हे अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या कटाचे बाहुले बनले असून विकसनशील देशांविरोधात हा कट रचला जात आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी केला आहे.