New Coronavirus in China 2025 : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. या महामारीची लागण झालेल्या लाखो लोकांना आपले प्राण गमावावे लागले. याशिवाय अनेक देशांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. करोना विषाणू नेमका कशामुळे उद्भभवला यासंदर्भातील तपास अद्यापही प्रलंबित आहे. अशातच चीनमध्ये आणखी एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चिनी संशोधकांनी वटवाघुळांमधील नवीन व्हायरस शोधून काढला आहे, ज्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, चीनमधील नव्या व्हायरसचे नाव काय? त्याची लक्षणे कोणती? या विषाणूचा भारताला धोका किती? या संदर्भात जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेल (Cell) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, चीनमध्ये सापडलेल्या नव्या व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असे आहे. हा विषाणू प्रयोगशाळेत मानवी पेशींना संक्रमित करत असल्याचे आढळून आले आहे. वटवाघुळांमध्ये सापडलेल्या या विषाणूच्या संसर्गाची पद्धत कोविड-१९ सारखीच आहे, ज्यामुळे भविष्यात हा विषाणू प्राण्यांमधून मानवांमध्ये झपाट्याने पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या विषाणूचा वंश आणि त्याची प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होण्याची क्षमता उघड केली आहे.

‘HKU5-CoV-2’ विषाणू किती धोकादायक?

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘HKU5-CoV-2’ हा विषाणू प्रथम हाँगकाँगमधील जपानी पिपिस्ट्रेल या वटवाघळांच्या प्रजातीमध्ये आढळून आला होता. ACE2 रिसेप्टरद्वारे हा विषाणू मानवी पेशांना संक्रमित करतो. मात्र, त्याची बाधित करण्याची क्षमता SARS-CoV-2 पेक्षा खूपच कमी आहे. आतापर्यंत कोणत्याही मानवाला या विषाणूची लागण झालेली नाही. मात्र, भविष्यात येणारा कोणताही धोका वेळीच रोखता यावा यासाठी शास्त्रज्ञ यावर सतत संशोधन करत आहेत. हा नवीन व्हायरस मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे MERS नावाने ओळखला जातो.

आणखी वाचा : विश्लेषण : पोप फ्रान्सिस यांना ‘डबल न्यूमोनिया’चे निदान… काय असतो हा विकार?

‘HKU5-CoV-2’ विषाणूचा मानवाला किती धोका?

दरम्यान, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हा नवीन विषाणू मानवांच्या ACE2 रिसेप्टर्सशी बांधला जाऊ शकतो, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला करोनाची लागण होऊ शकते. विशेष म्हणजे, काही करोना व्हायरस मानवांमध्ये सौम्य लक्षणे निर्माण करतात, तर काही प्राणघातक असू शकतात. सध्या HKU5-CoV-2 ची कोणतीही प्रकरणे आढळून आली नाहीत. त्याच्या लक्षणांबाबतही फारशी माहिती मिळू शकली नाही. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या विषाणूची लागण झाल्यास कोविड-१९ सारखीच श्वसनाची लक्षणे उद्भवू शकतात.

‘HKU5-CoV-2’ विषाणूची लक्षणे कोणती?

बाधित झालेल्या व्यक्तींना खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे आणि थकवा जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ब्लूमबर्गच्या मते, संशोधकांना चीनमधील ग्वांगडोंग, फुजियान, झेजियांग, अनहुई आणि गुआंग्शी प्रांतांमधील शेकडो पिपिस्ट्रेलस वटवाघळांमध्ये ‘HKU5-CoV-2’ हा विषाणू आढळून आला. विषाणू शास्त्रज्ञांच्या पथकाचे नेतृत्व शी-झेंगिल यांनी केले होते, ज्यांना ‘बॅटवूमन’ म्हणून ओळखले जाते. SARS-CoV-2 च्या उदयात शी-झेंगिल यांच्या भूमिकेबद्दल अनेक आरोप झाले होते.

‘HKU5-CoV-2’विषाणू मानवाला कसं संक्रमित करतो?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चिनी संशोधकांनी नवीन शोधून काढलेल्या व्हायरसची चाचणी प्रयोगशाळेत करण्यात आली. मानवी आतडे, श्वसनलिकेच्या मार्गाने हा विषाणू मानवी शरीरात नेमका कसा प्रवेश करू शकतो, यावर सखोलपणे अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळून आले की, हा विषाणू मानवी पेशी आणि फुफ्फुसे आणि आतड्यांमधील ऊतींना संक्रमित करू शकतो. तसेच वटवाघळांपासून थेट मानवांमध्ये किंवा इतर प्राण्यांद्वारे पसरू शकतो. मात्र, याचा अद्याप कुठलाही ठोस पुरावा आढळून आला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

वटवाघळांमध्ये कोणकोणते विषाणू आढळतात?

विशेष बाब म्हणजे, वटवाघळांमध्ये विविध प्रकारचे करोना विषाणू आढळून येतात, ज्यामध्ये MERS, SARS-CoV-1 आणि SARS-CoV-2 या विषाणूंचा समावेश आहे. ब्लूमबर्गने २०२१ च्या एका अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की, दरवर्षी आग्नेय आशियातील हजारो लोकांना प्राण्यांमधून करोना विषाणूची लागण होते. त्यातील बहुतेक लोकांना आपण बाधित आहोत याचा अंदाजही येत नाही. कारण या विषाणूची लक्षणे अत्यंत सौम्य असतात आणि ते आरोग्यावर फारसे परिणाम करत नाहीत. मात्र, ‘HKU5-CoV-2’ या विषाणूचा प्रसार SARS-CoV-2 सारखाच असल्याने त्याचा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

‘HKU5-CoV-2’विषाणूबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले?

मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांनी रॉयटर्सला सांगितले की, अशाप्रकारच्या विषाणूंच्या भीतीने अनेकजण आरोग्याची काळजी घेऊन वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात, ज्यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि इतर साथीच्या आजारांपासून वाचण्यास मदत होते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आधीच मेर्बेकोव्हायरसला संभाव्य साथीच्या यादीत समाविष्ट केले आहे. HKU-5-CoV-2 हा मार्बेकोव्हायरस गटाशी संबंधित आहे, म्हणूनच शास्त्रज्ञही यावर लक्ष ठेवून आहेत.

‘HKU5-CoV-2’ विषाणू किती धोकादायक?

नेफ्रॉन क्लिनिकचे अध्यक्ष डॉ. संजीव बागई यांनी न्यूज १८ ला सांगितले की, “आतापर्यंत अशी कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत, जिथे HKU5-CoV-2 या विषाणूचा प्रसार वटवाघळांपासून मानवांमध्ये झाला आहे. तसेच विषाणूमध्ये फारसे उत्परिवर्तन झालेले नाही आणि संक्रमणाचा धोकादेखील कमी आहे. हा विषाणू कमी संसर्गजन्य असून त्याचा फारसा धोका नाही. आपल्याकडे विषाणूबद्दल मर्यादित माहिती असली तरी उपलब्ध माहितीचा अंदाज घेता, तात्काळ चिंता किंवा धोक्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”

‘HKU5-CoV-2’चा प्रसार कसा होतो?

भारतातील आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘HKU-5-CoV-2’ बाबत कोणतेही अधिकृत विधान केलं नाही. भारतीय आरोग्य विभाग आणि वैज्ञानिक संस्था करोना व्हायरसच्या या नवीन प्रकारावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. या विषाणूचे संक्रमण प्रामुख्याने वटवाघळांच्या किंवा त्यांच्या शरीरातील द्रवपदार्थ जसे की लाळ, मूत्र किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यानंतर होऊ शकते. ‘HKU-5-CoV-2’ हा विषाणू प्रथम दुसऱ्या प्राण्यामध्ये पसरू शकतो आणि नंतर त्या प्राण्यापासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाजही लावण्यात आला आहे.

हेही वाचा : शक्तिकांत दास यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती, काय आहे या पदाची जबाबदारी?

HKU5-CoV-2 विषाणूवर कोणते उपचार?

HKU-5-CoV-2 हा विषाणू सध्या संपूर्ण जगासाठी अगदी नवीन आहे, त्यामुळे कोविड-१९ लस त्याच्यावर प्रभावी ठरेल की नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, या विषाणूची लागण होऊ नये म्हणून अँटीव्हायरल औषधे आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र, कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कर्करोगासह विविध रोगांना लक्ष्य करण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाचे प्रथिने तयार केले जातात.

फोर्ब्सच्या मते, SARS-CoV-2 च्या स्पाइक प्रथिनांना लक्ष्य करण्यासाठी या औषधांची निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून ते मानवी पेशींना संक्रमित होण्यापासून रोखू शकेल. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती अगदीच कमी आहे, त्यांना लसीकरणापासून पुरेसे संरक्षण मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा उपचार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, अँटीव्हायरल औषधे संपूर्ण शरीरात विषाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी तयार केली जातात. या औषधांच्या सेवनांमुळे कोविड-१९ आणि फ्लूसह इतर आजार लवकर बरे होतात, असंही आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे.

लस उत्पादक कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढले.

दरम्यान, चिनी संशोधकांनी नव्या करोना विषाणूचा शोध लावल्यानंतर शुक्रवारी लस उत्पादक कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढले. ‘मॉडर्ना’ या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ६.६ टक्के वाढ झाली, तर ‘नोव्हाव्हॅक्स’चे शेअर्स ७.८ टक्क्यांनी वर गेले. फायझर या कंपनीच्या शेअर्समध्येही ५.१ टक्क्यांनी वाढ झाली. ब्लूमबर्गच्या मते, फायझरचा नफा २.६ टक्क्यांवर पोहोचला. महामारीचा धोका लक्षात घेता आगामी काळात लस उत्पादक कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.