Vietnam Bans Chinese Products : गेल्या दशकभरात चीननं औद्योगिक क्षेत्रात अफाट साम्राज्य उभारलं. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर चीनचा शिक्का असलेल्या वस्तू पाहायला मिळतात. केसांपासून – नखांपर्यंत, घरापासून – ऑफिसपर्यंत लहान क्षेत्रांपासून – मोठ्या क्षेत्रांपर्यंत लागणाऱ्या जवळजवळ सगळ्या वस्तूंची निर्मिती चीनमध्ये होते. लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी तयार करण्यातही चिनी व्यावसायिक पटाईत आहेत. काही दिवसांपूर्वी चिनी बनावटीच्या एका बाहुलीला व्हिएतनाममध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. दिसायला आकर्षक असलेली ‘बेबी थ्री डॉल’ अनेकांनी खरेदी केली. मात्र, आता ही बाहुली देशद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे तिच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. हे नेमकं कशामुळं घडलं, त्याबद्दल जाणून घेऊ…
‘बेबी थ्री डॉल’ची विक्रमी विक्री
मागील काही वर्षांपासून चीनने जगभरातील बाजारपेठ काबीज केली आहे. ग्राहकाच्या गरजा, आवडीनिवडी आणि खिसा यांचा विचार करून चिनी कंपन्या उत्पादनं तयार करीत आहेत. २०२४ मध्ये चिनी उत्पादकांनी लहान मुलांसाठी एक आकर्षित बाहुली तयार केली होती. नक्षीदार डिझाइन, मोठे डोळे आणि सशासारखे सुंदर कान असलेल्या या बाहुलीने व्हिएतनाममधील लहान मुलांना अक्षरश: भारावून सोडलं. मुलांच्या हट्टापोटी अनेकांनी ही बाहुली खरेदी केली, ज्यामुळे अल्पवधीत तिला लोकप्रियता मिळाली आणि देशभरात या बाहुलीची विक्रमी विक्री झाली.
बाहुलीवरील डिझाइनवर आक्षेप
एएफपीच्या वृत्तानुसार, सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत व्हिएतनाम आणि आग्नेय आशियाई देशात १.६ दशलक्ष डॉलर्सच्या बाहुल्या विकल्या गेल्या. मात्र, त्यानंतर जे घडलं त्याचा विचार कधी चिनी व्यावसायिकांनी स्वप्नातही केला नसेल. जानेवारीत व्हिएतनाम आणि इतर आग्नेय आशियाई राष्ट्रांनी या बाहुलीच्या गालावरील डिझाइनवर आक्षेप घेतला. मुळात बाहुलीच्या गालावर रंगवलेली डिझाइन ही दिसायला ‘नाइन-डॅश लाइन’ सारखीच आहे, असा दावा काहींनी केला. या मुद्द्यावरून देशातील नागरिकांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
आणखी वाचा : Tesla Attack : एलॉन मस्क यांना कोण लक्ष्य करतंय? टेस्ला नेमकी कुणाच्या रडारवर?
नागरिकांनी भररस्त्यात बाहुल्या जाळल्या
अनेकांनी प्रेमापोटी खरेदी केलेल्या या बाहुल्या भररस्त्यात आणून जाळल्या. इतकंच नाही तर कुणीही ही बाहुली खरेदी करू नये असा प्रचारही करण्यात आला. सरकारी कारवाईनंतर या बाहुलीच्या विक्रीत लक्षणीय घट झाली, ज्यामुळे चिनी उत्पादकांना मोठा आर्थिक भूर्दंड बसला. व्हिएतनाममधील एका व्यक्तीनं या बाहुलीच्या आवृत्तीवरील हृदयाच्या आकाराचे चिन्ह वादग्रस्त ‘नाइन-डॅश लाइन’ सारखे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर वाद निर्माण झाला. मुळात ‘नाइन-डॅश लाइन’ (Nine-Dash Line) ही एक भौगोलिक रेखा आहे.
नाइन-डॅश लाइन’ काय आहे?
चीनने दक्षिण चीन समुद्रावर आपला क्षेत्रीय हक्क दर्शवण्यासाठी ही तयार केलेली सीमा आहे. ज्यामध्ये अनेक बेटं, खाडी आणि संसाधने समाविष्ट आहेत. चीनचा हा दावा व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससह शेजारील देशांनी मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरवला आहे. समुद्रातील काही भागांवर आमचाही हक्क आहे, असं या देशांचं म्हणणं आहे. विशेष बाब म्हणजे, २०१६ मध्ये हेगमधील एका आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ‘नाइन-डॅश लाइन’ आपला हक्क असल्याचा चीनचा दावा फेटाळून लावला होता. परंतु, तरीही चीनने न्यायालयाचा निर्णय अमान्य केला आणि आग्नेयकडील देशांवर दबावतंत्राचा वापर करत या प्रदेशात आपलं वर्चस्व निर्माण केलं.
‘बेबी थ्री डॉल’वरील चिन्हाची चौकशी
दरम्यान, चिनी उत्पादकांनी तयार केलेल्या बाहुलीच्या गालावरची डिझाइन ‘नाइन-डॅश लाइन’चा दावा सांगणारी असल्याचा आरोप काही वापरकर्त्यांनी केला. यानंतर व्हिएतनामच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने वादग्रस्त चिन्हांकन असलेल्या खेळण्यांची अधिकृत चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी इशारा दिला की, अशी उत्पादने राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला धोका निर्माण करू शकतात. त्यानंतर मंत्रालयाच्या स्थानिक बाजारपेठ विभागाने मुलांच्या खेळण्यांची तपासणी वाढवण्याचे आदेश दिले. ‘नाइन-डॅश लाइन’ असलेले कोणतीही खेळणी अथवा वस्तू बाळगल्यास ती जप्त करून संबंधित व्यक्तीवर कारवाई केली, असा आदेश व्हिएतनाम सरकारने काढला.
‘बेबी थ्री डॉल’मुळे चिनी उत्पादकांचं नुकसान
कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्याने बिथरलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी लगेचच आपल्या दुकानातून या बाहुल्या काढून टाकल्या. याचा परिणाम ठोस विक्रेत्यांवर झाला. बाहुलीची मागणी घटल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. याशिवाय चिनी उत्पादकांनाही या बहिष्काराचा मोठा फटका बसला. त्यानंतर शोपी आणि टिकटॉक शॉपसारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अहवाल दिला की, २०२५ च्या पहिल्या १० आठवड्यात बेबी थ्री बाहुल्यांची सरासरी किंमत निम्म्याने कमी झाली होती. ई-कॉमर्स डेटा विश्लेषण प्लॅटफॉर्म असलेल्या YouNet ECI च्या मते, वाद समोर आल्यानंतर व्हिएतनामी ग्राहकांनी ही बाहुली खरेदी करण्याकडे पाठ फिरवली.
व्हिएतनाममधील खेळणी विक्रेते काय म्हणाले?
व्हिएतनामच्या हनोई शहरात खेळणी विक्रेता असलेल्या एका महिलेनं एएफपी न्यूजला सांगितलं, “माझ्या दुकानात बाहुली खरेदी करण्यासाठी अनेक जण यायचे, त्यामुळे दररोज १०० ‘बेबी थ्री डॉल’ची प्रत्येकी २० डॉलर्सला विक्री व्हायची. पण, आता खरेदीदारांनी या बाहुलीकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे दिवसाला एक बाहुली विकणंही कठीण झालं आहे. मी यात खूप पैसे गुंतवले आहेत. चिनी व्यावसायिक मला पैशांसाठी वारंवार फोन करीत आहेत. त्यांचे पैसै मी कसे फेडू आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू”, असा प्रश्न या महिलेनं केला.
हेही वाचा : Aurangzeb tomb: पाकिस्तानमध्ये औरंगजेब का आहे हिरो?
आणखी एका खेळणी विक्रेत्याने सांगितले की, माझ्याकडे ‘बेबी थ्री डॉल’ मोठ्या प्रमाणात पडून आहेत. मी या खेळण्यांची होळी करणार आहे. जरी यातून चांगले उत्पन्न मिळत असले तरी ते माझ्या देशहिताविरोधात आहे. चीनकडून आमच्या देशावर जो अन्याय झाला आहे, त्यापेक्षा माझे नुकसान काहीच नाही. दरम्यान, व्हिएतनाम आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये ‘बेबी थ्री डॉल’विरोधात चळवळ सुरू झाल्यानंतर चिनी व्यावसायिकांनी नवीन बाहुल्यांवरून वादग्रस्त डिझाइन काढून टाकली. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारवाईच्या भीतीने या बाहुल्या कुणीही खरेदी केल्या नाही, ज्यामुळे चिनी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
व्हिएतनामची चीनविरोधात कडक भूमिका
अर्थव्यवस्थेला बळकटी देऊन महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनला व्हिएतनामसह आग्नेय आशियातील देशांनी चिनी उत्पादकांना रडकुंडीला आणलं आहे. याला कारणीभूत स्वत: चीनच असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. व्हिएतनाम सरकारने व्यावसायिक उत्पादने, माध्यमे आणि मनोरंजनामध्ये नाइन-डॅश लाइनच्या कोणत्याही चित्रणाविरुद्ध सातत्याने कडक भूमिका घेतली आहे. देशाने यापूर्वी अनेक चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि वादग्रस्त चिन्हांकन असलेल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे.
‘नाइन-डॅश लाइन’मुळे अनेक चित्रपटांवर बंदी
द गार्डियनच्या वृत्तानुसार, २०२३ मध्ये मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिंग अभिनीत हॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बार्बी’ला व्हिएतनाममध्ये बंदी घालण्यात आली होती. कारण या चित्रपटातील एका दृश्यात नाइन-डॅश लाइनचा नकाशा दिला होता. त्याच वर्षी सरकारने नेटफ्लिक्सला एक चिनी टेलिव्हिजन मालिका काढून टाकण्याचे आदेश दिले, ज्यामध्ये नियमितपणे वादग्रस्त रेषा दर्शविणारे नकाशे होते. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये, टॉम हॉलंड आणि मार्क वाहलबर्ग अभिनीत ‘अनचार्टेड’ या अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटावर व्हिएतनाममध्ये नकाशाचे चित्रण केल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. एवढं सगळं होऊनही चीनने सीमेवर आपला दावा आणखीच बळकट केला आहे. तिथे मोठ्या प्रमाणात तटरक्षक दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.