चीनचे माजी परराष्ट्रमंत्री चिन गांग (Qin Gang) यांना जुलै २०२३ मध्ये मंत्री पदावरून दूर करण्यात आले होते. अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम करत असताना त्यांचे एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, ज्यातून महिलेला एक मुलगा झाला, या घटनेशी संबंधित असलेल्या लोकांचा हवाला देऊन अमेरिकेच्या वॉल स्ट्रिट जर्नल (WSJ) वर्तमानपत्रात मंगळवारी एक लेख (१९ सप्टेंबर) छापून आला आहे. या विवाहबाह्य संबंधामुळे किंवा इतर कारणांमुळे चिन यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तर केली नाही ना? याचा तपास केला जात असून चिन गांग तपासात सहकार्य करत आहेत, असेही या लेखात म्हटले आहे. माजी मंत्री चिन गांग २५ जून पासून सार्वजनिक मंचावर कुठेही दिसलेले नाहीत.
वॉल स्ट्रिट जर्नलच्या लेखात काय म्हटले?
चिन गांग यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार देण्याआधी त्यांनी जुलै २०२१ पासून ते जानेवारी २०२३ पर्यंत अमेरिकेतील चीनचे राजदूत म्हणून काम केले होते. वॉशिंग्टनमध्ये चीनचे सर्वोच्च दूत म्हणून काम करत असताना चिन गांग यांनी एका महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले, ज्यामुळे संबंधित महिलेला अमेरिकेत एक मुलगा झाला, असे या लेखात नमूद केले आहे.
हे वाचा >> चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर दावा का करण्यात येतो?
विशेष म्हणजे, चिन गांग यांच्या हकालपट्टीसाठी त्यांची अमेरिकेतील जीनवशैली कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यासाठी लैंगिक गैरवर्तन असा एक शब्दप्रयोग या लेखात करण्यात आला आहे. चिन गांग यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीची माहिती मिळवत असताना सूत्रांनी वॉल स्ट्रिट जर्नलला चिन यांच्याशी संबंधित महिला आणि तिच्या मुलाचे नाव काय आहे? याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे वर्तमानपत्राने आपल्या लेखात सदर महिला आणि मुलाचा कोणताही नामोल्लेख केलेला नाही.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांनी वॉल स्ट्रिट जर्नलला माहिती देताना सांगितले की, चिन गांग यांच्या या प्रेमप्रकरणाची माहिती पक्षाच्या (कम्युनिस्ट पक्ष, चीन) तपासात उघड झाल्यानंतर चिन यांचे पक्षातील स्थान घसरले. चिन यांचे अमेरिकेत जन्मलेले मूल अमेरिकन प्रतिनिधिंशी वाटाघाटी करत असताना चीनच्या हितसंबंधांच्या आड येऊ शकते, अशी अटकळ बांधली गेली असल्याचे लेखात म्हटले आहे.
चिन यांच्या हकालपट्टीचे अर्थ काय?
परदेशात आर्थिक किंवा इतर हितसंबंध जोपासणाऱ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चिन यांच्यावरील कारवाईतून थेट आणि गंभीर असा इशारा दिला असल्याचे दिसते. यावरून चीनच्या अधिकाऱ्यांवर वाढत्या निर्बंधांची चुणूक दिसते. या महिन्याच्या सुरुवातीला चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू यांना चौकशीसाठी यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. तर जुलै महिन्यात पिपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्सचे कमांडर आणि राजकीय अधिकारी (commissar – चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा पदाधिकारी) अशा दोघांना बडतर्फ करण्यात आले होते.
वॉल स्ट्रिट जर्नलने या कारवाईमागे दोन संभाव्या कारणांची चर्चा केली आहे. एक म्हणजे, चीनला चिंता आहे की, अधिकाऱ्यांनी अमेरिकेत किंवा परदेशात अधिक खुलेपणाने वागणे ही देशासाठी अडचण होऊ शकते. तसेच इतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धानंतर रशियावर जसे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय चीनबाबतीत घेतला गेला आहे.
हे वाचा >> चीनला भारताच्या ‘संस्कृत’चे वावडे का ? काय आहे नेमके प्रकरणं?
दुसरे कारण असे की, २०१३ रोजी क्षी जिनपिंग यांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून वेळोवेळी भ्रष्ट कारवायात गुंतलेल्या त्यांच्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. जे अधिकारी उच्च जीवनशैलीचा आनंद घेत आहेत किंवा विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर जिनपिंग यांनी ताशेरे ओढलेले आहेत.
क्षी जिनपिंग यांनी मध्यंतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात त्यांनी अधिकाऱ्यांना कडक भाषेत समज दिल्याचे समजते, अशी माहिती वॉल स्ट्रिट जर्नलने दिली.
चिन गांग कोण आहेत?
चिन गांग यांचा जन्म १९६६ साली झाला. १९८८ साली ‘बिजिंग सर्विस ब्युरो फॉर डिप्लोमॅटिक मिशन्सच्या कर्मचारी सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. इथून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक पदावर काम केले. जसे की, ब्रिटनमधील चिनी दूतावासात अनेक वर्ष विविध पदावर काम केले. त्यांची दोन वेळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.
आणखी वाचा >> जी-२०च्या यशासाठी एकत्रित प्रयत्नांना तयार; चीनचे स्पष्टीकरण
दोन वर्ष अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम केल्यानंतर २०२३ साली त्यांची चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. चिन गांग यांच्या झटपट भरभराटीमागे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी त्यांची असलेली जवळीक कारणीभूत असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले होते. वॉल स्ट्रिट जर्नलने म्हटले आहे की, चिन गांग यांच्या प्रगतीचा वेग असामान्य असा होता. चीनमध्ये राजकीय हिंतसंबंध असल्याशिवाय पारंपरिकपद्धतीने अशी प्रगती साधता येत नाही.