करोनाच्या आठवणी धूसर होऊ लागल्या आहेत, परंतु करोनाचे संकट पूर्णपणे संपले असे आपण म्हणू शकत नाही. संचारबंदी, मास्क आदी गोष्टी जरी सुटल्या असतील, तरी करोनाचे नवनवीन प्रकार (व्हेरिएंट) येतच आहेत. त्यामुळे करोना गेला असे म्हणता येणार नाही, कारण या रोगाचा धोका मोठा आहे. जगाच्या विविध भागांमध्ये त्याची नवीन रूपे उदयास येत आहेत. आता चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) च्या संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांनी एक नवीन नॅनोवॅक्सीन विकसित केली आहे, जी सर्व प्रमुख कोविड-१९ प्रकारांपासून संरक्षण करू शकते, असे साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी) च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. वुहान इन्स्टिट्यूट तीच प्रयोगशाळा आहे, जिथून करोना रोग पसरल्याचे सांगितले जाते. करोना काळात ही प्रयोगशाळा वादाच्या भोवर्‍यात अडकली होती. या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेली लस काय आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वुहान प्रयोगशाळेतील नवीन करोनाची लस

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी भविष्यातील साथीच्या रोगांशी लढण्यासाठी नेझल लस विकसित केली आहे. ‘एससीएमपी’नुसार, संशोधकांनी करोना व्हायरस एपिटोप्स, रक्तातील प्रथिने फेरीटिनसह एकत्र केले. एपिटोप्स रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात. संशोधकांना असे आढळून आले की, या संयोजनातून इंट्रानेझल नॅनोपार्टिकल लस तयार होते, जी डेल्टा, ओमिक्रॉन आणि डब्ल्यूआयव्ही ०४ सारख्या सार्स-कोव्ही-२ च्या अनेक प्रकारांपासून संरक्षण देऊ शकते.

वुहान इन्स्टिट्यूट तीच प्रयोगशाळा आहे, जिथून करोना रोग पसरल्याचे सांगितले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?

डब्ल्यूआयव्ही ०४ स्ट्रेन हा चीनच्या वुहानमध्ये नुकताच आढळून आलेला एक प्रारंभिक प्रकार आहे. ही नॅनोपार्टिकल लस इतर प्रकारच्या करोना व्हायरसपासून दीर्घकाळ टिकणारे आणि व्यापक संरक्षणदेखील प्रदान करू शकेल, असे एससीएमपीने नोंदवले आहे. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, करोना व्हायरसच्या सतत उत्परिवर्तनामुळे नवीन उत्परिवर्तीत स्ट्रेन तयार होत राहतील; ज्यापैकी काही प्रकार भविष्यात उद्रेकदेखील करू शकतात आणि पुन्हा जागतिक महामारीची परिस्थिती निर्माण करू शकतात.

सार्स-कोव्ही-२ च्या उत्परिवर्तनांमुळे आणि भविष्यातील साथीच्या रोगांमुळे व्यापक संरक्षण प्रदान करणाऱ्या प्रभावी लसींची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी जूनमध्ये पीअर-रिव्ह्यू केलेल्या एसीएस नॅनो जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या पेपरमध्ये लिहिले होते. नॅनोवॅक्सीनची चाचणी उंदरांवर करण्यात आली. उदरांना पहिल्या डोसनंतर, ४२ दिवसांच्या आत दोन बूस्टर दिले गेले. या लसीकरण केलेल्या उंदरांमध्ये इम्युनोग्लोबुलिन म्हणजेच अँटीबॉडीची उच्च पातळी दिसून आली. ही पातळी सहा महिन्यांनंतरही टिकून होती.

नॅनोवॅक्सीनची चाचणी उंदरांवर करण्यात आली. (छायाचित्र-रॉयटर्स)

वादग्रस्त वुहान प्रयोगशाळा (Wuhan Lab)

कोविड-१९ महासाथीचे उगमस्थान शोधून काढण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले. साथीच्या रोगाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये, वुहानमधील प्रयोगशाळेतून करोना व्हायरस पसरला असल्याचा वादग्रस्त दावा करण्यात आला होता. वुहानमध्येच करोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील संशोधक आरएटीजी १३ या वटवाघुळामध्ये आढळून येणाऱ्या करोना विषाणूवर संशोधन करत असल्याचे सांगण्यात आले होते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ही प्रयोगशाळा ह्युआनन बाजारापासून केवळ ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. याच भागात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. प्रयोगशाळा सिद्धांताचे समर्थक असा दावा करतात की, हा विषाणू चुकून किंवा हेतुपुरस्सर प्रयोगशाळेमधून बाजारात पसरला. या सिद्धांताला ‘वुहान लॅब लीक थेअरी’ असे नाव आहे.

साथीच्या रोगाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये, वुहानमधील प्रयोगशाळेतून करोना व्हायरस पसरला असल्याचा वादग्रस्त दावा करण्यात आला होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

कोविड-१९ प्रादुर्भाव प्राण्यांपासून मानवांमध्ये झाला की हा साथीचा रोग प्रयोगशाळेच्या हलगर्जीपणामुळे पसरला, हे एक गूढच आहे. गेल्या जूनमध्ये, अमेरिकेने एक गुप्तचर अहवाल प्रसिद्ध केला, ज्याने कोविड-१९ प्रयोगशाळा सिद्धांताच्या काही मुद्द्यांचे खंडन केले. तसेच त्यांना कोविड-१९ चा प्रादुर्भाव चिनी प्रयोगशाळेतून झाला, हे सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्ष पुरावा सापडला नाही. अमेरिकेतील चार यंत्रणा मानतात की, हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये हस्तांतरित झाला आहे, तर दोन यंत्रणांचे सांगणे आहे की, हा विषाणू प्रयोगशाळेतून पसरला आहे. २०२१ मध्ये, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त तपासणीत ‘लॅब लीक थेअरी’ शक्य नसल्याचे आढळले होते. परंतु, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेला टीकांचा सामना करावा लागला आणि तज्ज्ञांनीही निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा : खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव मांजरी खातात? ट्रम्प यांनी वादविवाद सत्रात प्राण्यांचा मुद्दा का उपस्थित केला? नेमकं प्रकरण काय?

लॅब लीक सिद्धांतामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी गुप्तचर संस्थांवर विषाणूच्या उत्पत्तीच्या चौकशीतून राजकारण केल्याचा आरोप केला आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी)च्या वृत्तानुसार, चिनी सरकारने साथीच्या रोगाची उत्पत्ती शोधण्यासाठी करण्यात आलेल्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला होता. हे अजूनही सुरू आहे, कारण परदेशी शास्त्रज्ञांना देशाबाहेर काढण्यात आले आहे आणि चिनी शस्त्रज्ञांना देशाबाहेर जाण्यास बंदी आहे. परंतु, चीनने कायम बचावाची भूमिका घेतली आहे. चीनच्या सर्वोच्च वैद्यकीय प्राधिकरण नॅशनल हेल्थ कमिशनने ‘एपी’ला सांगितले की, त्यांनी मोठ्या मनुष्यबळ, भौतिक आणि आर्थिक संसाधनांची गुंतवणूक केली असून करोना व्हायरसचे मूळ शोधणे थांबवले नाही. कोविड-१९ चा उदय कसा झाला हे अजुनही एक रहस्यच आहे.