जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनउद्योगाला मंदीसदृश वातावरणातून जावे लागत असताना १७ जानेवारी रोजी दिल्लीत ‘ऑटो एक्स्पो’ या भव्य प्रदर्शनाला आरंभ झाला. बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांविषयी या वाहन प्रदर्शनात अधिक बोलले जाईल, अशी अपेक्षा आहे. यात मारुती-सुझुकी कंपनीने त्यांची पर्यावरणपूरक वाहननिर्मितीतील जबाबदारी आणि कटिबद्धता जाहीर केली आहे. तर भारतात वाहन खपात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाईने किफायतशीर इलेक्ट्रिक वाहनांची पूर्तता करण्याची हमी दिली आहे. ईव्ही निर्मितीतील उच्च दर्जा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली आधुनिकता हे या वाहनांचे वैशिष्ट्य असेल. चिनी वाहन कंपन्यांची बऱ्याच अवधीनंतर हजेरी हे प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य.

ऑटो एक्स्पोमधून काय अपेक्षित?

एका दशकानंतर ऑटो एक्स्पो अर्थात वाहन प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो या नावाने दिल्लीत भरवले जात आहे. या प्रदर्शनाची अनेक वैशिष्ट्ये असतील. त्यातील पहिले म्हणजे जगभरातील पाच हजार कंपन्या यात सहभागी होत आहेत. दुसरे म्हणजे प्रमुख चिनी वाहन कंपन्या या प्रदर्शनात पहिल्यांदाच असतील. अर्थात, या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चीनमधील वाहन कंपन्यांसाठी व्हिसाचे काही निकष शिथिल केल्याचे ऐकिवात आहे. शिवाय काही वर्षांच्या अनुपस्थितीनंतर बजाज आणि हिरो या प्रमुख कंपन्यांही इथे परतत आहेत. सुमारे २१ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या वाहन उद्योगासाठी ऑटो एक्स्पो ही एक पर्वणीच ठरणार आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सात टक्के इतका वाटा वाहनउद्योगाचा आहे. तर १४ ते १५ टक्के वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) या माध्यमातून गोळा होतो. तर सात टक्के इतकी व्यापारी निर्यात आहे.

आणखी वाचा- देशातील प्रजनन दर झपाट्याने का घटतोय? हा चिंतेचा विषय आहे का?

ईव्हीसाठी भारतीय बाजारपेठ अनुकूल?

ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल अर्थात ईव्हीनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल. यात प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल. ईव्हीनिर्मितीतील आव्हाने आणि बाजारातील कमी मागणीमुळे आजवर निर्णय घेऊ न शकलेल्या तसेच आजवर पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या प्रदर्शनात असतील. भारतातील मारुती-सुझुकी ही मोठी वाहनिर्मिती कंपनी त्यांची ई-विटारा आणि त्यांचा देशांतर्गत प्रतिस्पर्धी ह्युंदाईची लोकप्रिय पावलेली क्रेटा ही एसयूव्ही यापुढे विजेवरही धावणार आहे. ई-विटारा ही सुझुकीची जागतिक पातळीवरील पहिली ईव्ही आहे. याशिवाय सुझुकीची छोट्या आकारातील कारही विजेवर धावणारी असेल. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी संचालक तोशिहिरो सुझुकी म्हणाले, की ईव्हीची जगभरातील मागणी मंदावली असताना भारतात विजेवर धावणाऱ्या वाहननिर्मितीला मोठा वाव आहे. ईव्ही उत्पादन प्रथम समजून घेऊन त्यात कोणते घटक समाविष्ट केले जाऊ शकतात, याचा अभ्यास आम्ही केला.

मारुती-सुझुकीपेक्षा ह्युंदाईची ईव्ही निर्मितीतील कामगिरी खचितच मोठी आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेत अवतरलेली क्रेटा ईव्ही ही सर्वाधिक स्वस्त असेल, असा कंपनीचा दावा आहे. क्रेटा ही भारतातील मोठ्या आकाराची एसयूव्ही म्हणून आधीपासूनच लोकप्रिय आहे. त्यामुळे ईव्ही वाहनांवर अधिक पैसा खर्च करण्यास न धजलेल्या भारतीय ग्राहकांसाठी विजेवर धावणारी क्रेटा ही अधिक किफायतशीर ठरेल, असा अंदाज आहे.

चिनी कंपन्यांचे स्वागत का?

गेल्या पाच वर्षांत चिनी कंपन्यांची ईव्ही निर्मितीतील कामगिरी ही चढत्या भाजणीची आहे. चिनी बनावटीच्या ईव्ही कार आणि एसयूव्ही या खपाच्या बाबतीत सातत्याने आघाडीवर आहेत. लोकप्रिय कारच्या सुट्या भागांची निर्मिती करणारा देश ही प्रतिमा बदलून ईव्ही वाहननिर्मितीत नवनवे प्रयोग राबवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या बीवायडी कंपनीने सर्वाधिक ईव्ही कार निर्मिती कंपनी म्हणून टेस्लाला मागे टाकले आहे.

आणखी वाचा- Sanchar Saathi : घरबसल्या करता येणार सायबर फसवणुकीची तक्रार; काय आहे सरकारचे नवीन संचार साथी ॲप?

कॉम्पोनन्ट निर्मिती ते एआय… चीनचे वर्चस्व

चीनने आजवर ईव्ही कारची उच्च दर्जाची निर्मिती केली आहे. यात चीनने शाबासकी मिळवली आहे. इलेक्ट्रिक वाहन बांधणीतील सूक्ष्म परंतु प्रमुख अवयवभूत (कॉम्पोनन्ट) भागांच्या निर्मितीतील चीनच्या कामगिरीची प्रकर्षाने नोंदही अनेक मुरब्बींनी घेतली आहे. पण, त्याहून पुढचे पाऊल म्हणजे चीनची बुद्धिसंपदेतील मातब्बरी. निर्मितीच्या या टप्प्यावर चीनचा आजवर झालेला प्रवास आणि यापुढील संशोधन हे चीनच्या नव्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. म्हणजे दर्जेदार निर्मितीत आपण मागे नाही, हे चिनी कंपन्यांना जगाला सांगायचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांतील इंडक्टिव्ह पोझिशन सेन्सर (आयपीएस) उत्पादनातील त्यांचे दमदार पाऊल. विजेवर चालणाऱ्या वाहनात या आयपीएसचा मोठा वाटा असतो. कोन मापनांतील अचूकता आणि वेगातील सातत्य आयपीएस सुधारू शकते. ईव्हीच्या इन्व्हर्टरमध्ये आयपीएसचा वापर केला जातो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांत आवश्यक कॉम्पोनन्टची संख्या आणि खर्चही कमी होऊ शकतो. शिवाय, बॅटरी उत्पादन, सुटे भाग आणि कॉम्पोनन्टमधील बेताबेताची अर्थात परस्परपूरक व्यवस्थाही चीनने आपल्या कब्जात आणली आहे. यात त्यांच्या प्रगतीचे लख्ख दर्शनही होते.

भारत-चीन तणावाचे प्रतिबिंब नाही?

सीमेवरील काही घटनांनंतर भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले. मात्र, पाच वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर नवी दिल्लीने व्हिसाच्या काही निकषांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे अधिकाधिक चिनी व्यावसायिक आणि तंत्रज्ञ भारत मोबिलिटी एक्स्पोला हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader