चीन आपल्या कृतींनी कायम जगाचे लक्ष वेधत असतो. चीनच्या अनेक कृतींनी आधीच जगाची चिंता वाढवली आहे. आता चीनने पुन्हा एकदा जगासाठी धोकादायक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. नुकतंच चीनने समुद्राच्या खोलात तयार करण्यात आलेल्या केबल कटिंग उपकरणाचे अनावरण केले आहे. हे उपकरण समुद्राच्या खोलवरील जगातील सर्वात मजबूत संप्रेषण आणि वीज केबल्स कापण्यास सक्षम आहे. चीनच्या या उपकरणामुळे समुद्राखालील पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशा केबल्स ९५ टक्के जागतिक डेटा ट्रान्समिशन वाहून नेतात आणि महत्त्वाच्या लष्करी व नागरी ऑपरेशन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरतात. हे उपकरण काय आहे? आणि याचा जगाला धोका कसा? खरंच संपूर्ण जगाचे इंटरनेट कनेक्शन चीनच्या ताब्यात गेले आहे का? जाणून घेऊ.

हे उपकरण चायना शिप सायंटिफिक रिसर्च सेंटर (सीएसएसआरसी) आणि स्टेट की लॅबोरेटरी ऑफ डीप-सी मॅनेड व्हेईकल्स यांनी विकसित केले आहे. हे उपकरण चीनच्या प्रगत क्रू आणि अनक्रूड सबमर्सिबल, जसे की फेंडोझे (स्ट्रायव्हर) आणि हैदौ सीरिजसह एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एखाद्या देशाने अशा तंत्रज्ञानाचा ताबा अधिकृतपणे उघड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपकरणामुळे खोल समुद्रातील ऑपरेशन्समध्ये चीन महत्त्वपूर्ण विकास करत असल्याचे दिसून येते.

चीनच्या या उपकरणामुळे समुद्राखालील पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

खोल समुद्रातील केबल कटिंग तंत्रज्ञान वेगळे का आहे?

हे नवीन उपकरण ४,००० मीटर (१३,१२३ फूट) पर्यंतच्या खोलीवरील केबल्स कापण्यास सक्षम आहे. ही खोली सध्याच्या समुद्राखालील संप्रेषण पायाभूत सुविधांच्या कमाल ऑपरेशनल रेंजपेक्षा दुप्पट आहे. केबल कटिंग पद्धतींनी स्टील-प्रबलित केबल्स कापणे मोठे आव्हानात्मक आहे. मुख्य म्हणजे शून्य दृश्यमानतेमध्ये रोबोटिक आर्म्सद्वारे चालवले जाणारे हे उपकरण कटिंग ऑपरेशन्स योग्यरित्या पार पाडण्यासाठी प्रगत पोझिशनिंग तंत्रज्ञानाचा वापर करते.

चीनच्या केबल कटिंग टूलचा संरक्षणासाठी अर्थ काय?

समुद्रतळातील खाणकामासारख्या बाबींसाठी हे उपकरण विकसित केले गेले आहे. या उपकरणाच्या दुहेरी वापराच्या स्वरूपामुळे जागतिक सुरक्षा वर्तुळात चिंता निर्माण झाली आहे. या उपकरणात समुद्रातील केबल्समध्ये व्यत्यय आणण्याची क्षमता असल्याने भू-राजकीय संघर्षांमध्ये चीनसाठी एक महत्त्वपूर्ण शस्त्र ठरू शकते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणातील एक प्रमुख केंद्र असलेल्या गुआमजवळील समुद्राखालील केबल्सला चीनकडून लक्ष केले जाऊ शकते. गुआममध्ये गूगलसह लष्करी आणि नागरी क्लायंटना सेवा देणाऱ्या डझनभराहून अधिक फायबर-ऑप्टिक केबल्स आहेत. या लाईन्स तुटल्यास जागतिक संप्रेषण आणि लष्करी तयारीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सागरी प्रकल्प सीलाईटचे संस्थापक आणि निवृत्त अमेरिकन हवाई दलाचे कर्नल रेमंड पॉवेल यांनी इशारा दिला आहे की, चीन आधीच त्याच्या विशाल ग्रे झोन टूलकिटचा विस्तार करत आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, “केबल आणि पाइपलाइन तोडणे हे छळ करण्यापेक्षाही जास्त आहे. चीनने असे पाऊल उचलल्यास चीनच्या शत्रूंना खूप जास्त नुकसान सोसावे लागू शकते. खोल समुद्रातील ऑपरेशन्समध्ये चीनच्या वाढत्या क्षमतांची तुलना रशियाच्या समुद्राखालील कारवायांशी केली जात आहे.

२०२३ पासून बाल्टिक समुद्रात पाण्याखालील केबलचे नुकसान झाल्याच्या ११ घटना घडल्या आहेत, त्यामुळे चीन आणि रशिया हे दोन्ही देश ग्रे-झोन युद्ध रणनीतींमध्ये सहभागी आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः तैवानमध्ये संशयास्पद चिनी केबल तोडण्यात आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये, चीनला तैवानच्या अधिकाऱ्यांनी समुद्राखालील टेलिकॉम केबल तोडण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी टोगोतील मालवाहू जहाज ‘हाँग ताई ५८’ ताब्यात घेतले, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले. तैवानच्या सरकारने या वर्षी अशा पाच घटना नोंदवल्या आहेत. २०२३ आणि २०२४ दरम्यान तीन घटना घडल्या आहेत. गेल्या काही काळापासून समुद्राखालील पायाभूत सुविधांवरील संशयास्पद हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे.

चीनच्या उपकरणाचा परिणाम जगावर?

चीन जगातील सर्वात मोठा क्रू आणि क्रू नसलेल्या पाणबुड्यांचा ताफा चालवतो. चीनने समुद्राखालील ऑपरेशन्समध्ये एक प्रमुख शक्ती म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. गेल्या महिन्यात, दक्षिण चीन समुद्रात २००० मीटर खोल पाण्याखालील अवकाश स्थानकाचे बांधकाम सुरू झाले. हे अवकाश स्थानक महिनाभर चालणाऱ्या विस्तारित मोहिमांसाठी, तसेच किमान सहा लोकांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केले जात आहे. या सुविधेमुळे समुद्रातील संघर्षमयी भागातील चीनची उपस्थिती वाढेल अशी शक्यता आहे.

दुसरीकडे अमेरिका समुद्रात आपली ताकद वाढवण्यासाठी संघर्ष करत आहे. जुन्या जहाजांमुळे चीनच्या विस्तारत्या सागरी क्षमतांना तोंड देण्याची अमेरिकेची क्षमता मर्यादित होत असल्याचे चित्र आहे. जपानचे एकमेव क्रू असलेले पाणबुडी ‘शिंकाई ६५००’देखील निवृत्त होण्याच्या जवळ आहे, असे ‘एससीमपी’ने म्हटले आहे. हू यांच्या संशोधन पथकाचा असा दावा आहे की, केबल-कटिंग उपकरण लष्करी वापरापेक्षा सागरी संसाधन विकासासाठी तयार करण्यात आले आहे. जर्नलमध्ये त्यांनी लिहिले आहे की, देशांना आता त्यांचे लक्ष समुद्री संसाधनांकडे वळवावे लागत आहे. २१ वे शतक हे महासागरांचे शतक आहे. सागरी संसाधन विकास क्षमता वाढवणे आणि समुद्रातील चीनची शक्ती अधिक वाढवणे, हे चीनसाठी महत्त्वाचे घटक आहेत.”