Sinking cities in the World बदलत्या हवामानामुळे जगभरातील लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, जपानमधील टोकियोत आणि फ्लोरिडातील मियामीसारख्या मोठ्या शहरांना धोका आहे. भारतात उत्तराखंडच्या जोशीमठचीही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. येथील जमीन आणि घराच्या भिंतींना भेगा पडल्या असून, अख्खे शहर धसत चालले आहे. धोकादायक परिस्थिती पाहता, या शहरातील लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. चीनमधील काही शहरांनादेखील अशाच गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. किनाऱ्यावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या चिनी लोकसंख्येपैकी एक-दशांश लोक समुद्रसपाटीपासून खालच्या भागात राहत आहेत. ही शहरे हळूहळू जलमय होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरे जलमय होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यात खाणकाम, भूजल उत्खनन, हवामान बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. चीनमध्ये आणि जगाच्या इतर भागांत उद्भवलेल्या परिस्थितीचे कारण काय? हे संकट टाळता येणे शक्य आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
हेही वाचा : Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
चिनी शहरे बुडण्याच्या मार्गावर
सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेटाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, चीनच्या प्रमुख शहरांचे १६ टक्के क्षेत्र दरवर्षी १० मिलिमीटरपेक्षा जास्त वेगाने बुडत आहे. तर ४५ टक्के क्षेत्र दरवर्षी तीन मिलिमीटरपेक्षा जास्त वेगाने बुडत आहे. चीनमधील फुझोऊ, हेफेई व शिआन यांसारखी प्रमुख शहरे प्रभावित भागात येतात. राष्ट्रीय राजधानी बीजिंगचाही यात समावेश आहे. काही दशकांत चीनच्या किनारपट्टी भागातील एक-चतुर्थांश जमीन समुद्राखाली बुडणार, असे एका अभ्यासात सांगण्यात आले आहे.
वाढती लोकसंख्या
चीनच्या किनारी भागात राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व लोकांना स्थलांतरित करणे अत्यंत खर्चाचे आहे. या लोकांना स्थलांतरित केल्यास, इतर प्रदेशांवरील ओझे वाढण्याचीदेखील शक्यता आहे. याचा प्रत्यय चीनच्या टियांजिन शहरात आला. टियांजिन हे शहर जलद गतीने पाण्याखाली जाणार्या शहरांपैकी एक आहे. या शहरात १५ दशलक्षांहून अधिक लोक राहतात. २०२३ मध्ये तीन हजार रहिवासी राहत असलेल्या अपार्टमेंटची जमीन धसल्यामुळे जवळपासच्या रस्त्यांवर मोठ्या भेगा निर्माण झाल्या. या अपार्टमेंटमध्ये राहत असणार्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले, असे वृत्त रॉयटर्सने दिले. शोधकर्त्यांनी सांगितले की, जमिनीतील पाणी कमी झाल्यामुळे, तसेच भू-औष्णिक विहिरींच्या बांधकामांमुळे अशा घटना घडत आहेत.
शहरे समुद्राखाली बुडण्याची कारणे काय?
-भूगर्भातील सामग्री : खडक, पाणी, तेल, खनिज संसाधने किंवा नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात जमिनीतून काढली जात असल्यामुळे जमीन धसत आहे. चीनमध्ये पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जमिनीखालचे पाणी उपसले जात आहे. मोठ्या प्रमाणात केले जाणारे उत्खननही जमीन धसण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे . जमीन धसत असल्यामुळे चीनला सध्या ७.५ अब्ज युआन (१.०४ अब्ज डॉलर) इतका वार्षिक तोटा सहन करावा लागत आहे.
-हवामान बदल : वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. चीन आणि जगाच्या इतर भागांमधील किनारपट्टीच्या जमिनी हळूहळू पाण्याखाली जात आहेत. हवामान बदलामुळे चीनच्या किनारपट्टीवरील २६ टक्के भूभाग समुद्रसपाटीच्या खाली जाण्याची शक्यता आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
-शहरी विकास : चीनमधील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. झाडे कापून इमारती बांधल्या जात आहेत. बीजिंगसारखे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले शहर हळूहळू समुद्रसपाटीच्या खाली जात आहे.
जागतिक स्तरावर हीच परिस्थिती
ही समस्या केवळ चीनमध्ये नाही, तर जगभरातील अनेक शहरांवर याच समस्येच्या संकटाचा घाला पडण्याची भीती आहे. २०४० पर्यंत जगातील लोकसंख्येपैकी अंदाजे एक-पंचमांश लोक राहत असलेली शहरे बुडण्याची दाट शक्यता आहे. युरोपमधील सखल भागात असलेल्या नेदरलँड्समधील सुमारे २५ टक्के जमीन आधीच समुद्रसपाटीच्या खाली गेली आहे. अमेरिकेतील ४५ राज्ये प्रभावित आहेत. या राज्यांमधील सुमारे ४४ हजार चौरस किलोमीटर जमीन जलमय होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत भूजल उत्खननाने हे संकट उदभवले आहे.
विशेषत: आशिया खंडात ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे शहर आता जगातील सर्वांत वेगाने पाण्याखाली जाणार्या शहरांपैकी एक आहे. जकार्ता शहराचा उत्तर भाग गेल्या १० वर्षात २.५ मीटरने पाण्याखाली गेला आहे. जकार्ता शहर दरवर्षी एक ते दीड सेंटीमीटरने बुडत आहे. २०२२ मध्ये सिंगापूरच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, किनार्यावर वसलेल्या ४० मोठ्या शहरांपैकी ३० शहरे आशियातील आहेत.
हे संकट टाळता येणे शक्य आहे का?
बुडण्याच्या मार्गावर असणार्या शहरांवरील धोक्याची घंटा अद्याप वाजलेली नाही. हे संकट टाळता येणे शक्य आहे. टोकियो हे शहर याचे उत्तम उदाहरण आहे. जपानमधील टोकियो शहर १९६० च्या दशकात दरवर्षी २४० मिमी पाण्याखाली जात होते. त्यानंतर सरकारने भूजल उपसण्यावर मर्यादा घालणारे कायदे केले. २००० च्या दशकापर्यंत हे शहर पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वार्षिक १० मिमीपर्यंत खाली आले होते.
हेही वाचा : आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीदरम्यान चुकीची माहिती कशी ओळखायची?
चीनमधील शांघाय शहर देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. १९२१ ते १९६५ दरम्यान हे शहर २.६ मीटर पाण्याखाली गेले. पर्यावरणविषयक नियमावलीचे पालन केल्यानंतर शहर पाण्याखाली जाण्याचे प्रमाण प्रतिवर्षी पाच मिमी दराने कमी झाले. त्यामुळे हे संकट जरी मोठे असले तरी ते काही उपाययोजनांद्वारे टाळता येणे शक्य आहे. मोठे संकट उद्भवण्यापूर्वी सतर्क होणे अत्यावश्यक आहे.