चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी १३ ते १८ जानेवारी दरम्यान इजिप्त, ट्युनिशिया, टोगो आणि आयव्हरी कोस्ट या चार आफ्रिकन देशांना भेट दिली. आफ्रिका खंडाशी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या निमित्ताने आयोजित केलेली ही यात्रा होती. या भेटीमागच्या हेतूंचा घेतलेला हा शोध.
भेट कशासाठी होती?
वांग यी यांच्या आफ्रिका दौऱ्यामागे अनेक उद्दिष्टे होती. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे २०२३ साली ऑगस्ट महिन्यात चीन आणि आफ्रिका या देशांच्या प्रमुखांमध्ये बैठक झाली होती, या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणे हा वांग यी यांच्या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश होता. यामध्ये आफ्रिकेच्या औद्योगिकीकरणासाठी पाठिंबा, कृषी आधुनिकीकरण आणि प्रतिभा-कौशल्य विकासासाठी सहकार्य या तीन उपक्रमांच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. गाझा आणि इजिप्त मध्ये सामायिक सीमा आहे. चीनने गाझा सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचे हे पाऊल जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. वांग यी यांनी इजिप्त, ट्युनिशियाचे नेते आणि लीग ऑफ अरब स्टेट्सचे सरचिटणीस यांची भेट घेतली आणि गाझामध्ये “तात्काळ आणि व्यापक युद्धविराम” करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या ३४ वर्षांमधील आफ्रिका- चीनमधील ऋणानुबंध
चीन- आफ्रिका संबंधांची आधुनिक पाळेमुळे १९५० च्या दशकात सापडतात. या शीतयुद्धाच्या कालखंडात चीनने आफ्रिकेच्या मुक्ती चळवळीला पाठिंबा दिला होता. याशिवाय हाच पाठिंबा चीनने ७० च्या दशकात आफ्रिकन देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवून देण्यासाठीही दिला होता. पूर्वी आफ्रिका आणि चीनचे नाते वैचारिक आधारावर केंद्रित होते. १९९९ साली चीनने आपल्या कंपन्यांना “गो आऊट पॉलिसी” चा भाग म्हणून आफ्रिकेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले.
अधिक वाचा: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?
फोरम ऑफ चायना आफ्रिका कॉर्पोरेशनने (FOCAC) आपले पहिले चर्चासत्र २००० साली आयोजित केले होते. FOCAC चा मुख्य उद्देश मुत्सद्देगिरी, गुंतवणूक आणि व्यापार यांच्या माध्यमातून चीन-आफ्रिका सहकार्य मजबूत करणे हा होता. या संवादाने शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन- आफ्रिकेदरम्यान व्यापार, मदत, परस्पर सुरक्षा यांच्यात स्थिर वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले. २०१३ साली, चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) हा प्रकल्प सुरू केला, यानंतर ५२ आफ्रिकन देशांनी या प्रकल्पाअंतर्गत चीनशी आपले संबंध दृढ केले. सध्या चीन हा आफ्रिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आफ्रिकेतील एक चतुर्थांश कच्च्या मालाची निर्यात चीनला केली जाते. २००० ते २०२२ या कालखंडात चीनने ४९ आफ्रिकन देशांना १७०.०८ अब्ज अमेरिकन, डॉलर्सची कर्जे दिली . पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय तळ जिबूतीमध्ये तैनात केला. या तैनातीच्या माध्यमातून चीनने आफ्रिकेत गुंतवणूकदार असण्यापासून ते धोरणात्मक भागीदार म्हणून पाय रोवले.
आफ्रिकेत चीनची उद्दिष्टे काय आहेत?
चीनचा आफ्रिका खंडातील रस हा केवळ मैत्रीपूर्ण मदत नाही. ही देऊ केलेली मदत नक्की कशासाठी हे जाणून घेण्यासाठी आफ्रिकेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. आफ्रिका खंडाची ओळख ही नैसर्गिक खनिजांच्या स्रोतांसाठी आहे. आफ्रिका जगातील ९०% कोबाल्ट आणि प्लॅटिनम तसेच ७५% कोल्टनचा पुरवठा करते; जे इलेक्ट्रॉनिक्ससाठी आवश्यक आहे. चीन आणि आफ्रिका संबंधांमुळे आफ्रिकेतील खनिज उद्योगावर चीनचे प्रभुत्त्व आहे. चीनच्या खाण क्षेत्रातील वर्चस्वामुळे अमेरिका आफ्रिकेतील प्रमुख खनिजांसाठी चीनवर अवलंबून आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आफ्रिकेशी केलेल्या मैत्रीच्या मागे चीनची राजकीय भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. यूएन जनरल असेंब्लीमध्ये आफ्रिका हा सर्वात मोठा गट आहे आणि दक्षिण चीन समुद्रासारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर ठराव आणण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. तैवान आणि हाँगकाँगसह एकसंघ चीन या चीनच्या धोरणाला आफ्रिकेने पाठिंबा दिला आहे.
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे युआन (RMB) मजबूत करणे हे होय. चीन आफ्रिकेला चिनी चलनात व्यापार करण्यास प्रोत्साहन देत आहे. इतकेच नाही तर चीन आफ्रिकेला कमी व्याज दराने निधी उपलब्ध करते, हा निधी त्यांच्या पांडा बाँड्सचा भाग आहे. कमी चिनी व्याज दर आणि आफ्रिकन स्थानिक चलनाचे अवमूल्यन यामुळे, (युआन) RMB डॉलरला पर्याय म्हणून उभा आहे.
चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यावसायिक संधी. आफ्रिका तयार माल चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात करतो. चिनी निर्यातीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी आफ्रिकन बाजारपेठा फायदेशीर आहेत. आफ्रिकेतील तरुण लोकसंख्या आणि स्वस्त कामगार शक्ती जागतिक स्तरावर आणि आफ्रिकेतील चिनी निर्यातीला समर्थन देतात.
अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?
आफ्रिका भेटीचा अर्थ काय आहे?
नैसर्गिक संसाधनांच्या बदल्यात आफ्रिकेला चीनकडून गुंतवणूक, व्यापार आणि विकासासाठी मदत मिळत आहे. चीन थेट परकीय गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा स्रोत ठरला आहे. चीन-निर्मित पायाभूत सुविधा आणि औद्योगिक उद्योगांनी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि “मेड इन आफ्रिका” ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
याव्यतिरिक्त, संकरित पिकांच्या प्रगतीसाठी मिळालेल्या चिनी समर्थनामुळे आफ्रिकेला त्यांच्या कृषी क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यास मदत झाली आहे. पाश्चिमात्य देश हे प्रगतीच्या मदतीवर राजकीय अटी लादतात, परंतु चीनकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे आफ्रिका आणि चीन यांमधील हितसंबंध सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आहे. तरीही पाश्चिमात्य देशांकडून चिनी गुंतवणुकीबद्दल भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच चीनकडून मिळणारे कर्ज हे सापळा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. केनिया आणि झांबियासह काही देशांचे चीन बरोबरीचे संबंध बिघडत असले तरी इतर आफ्रिकन देशांनी चीनबरोबर कर्ज व्यवस्था अबाधित ठेवली आहे. या शिवाय चीनच्या कमी राजकीय हस्तक्षेपामुळे आफ्रिकेतील अनेक हुकूमशहांना निर्विवाद सत्तेत राहण्यासाठी मदत होत आहे.