भारतानंतर चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. चीनमध्ये विवाहसंख्येत सातत्याने घट होत असल्याने जन्मदरात आणखी घट होत आहे, ज्यामुळे देशातील लोकसंख्याशास्त्रीय संकट वाढत आहे. २०२४ मध्ये चीनमधील विवाहांची संख्या ६.१ दशलक्षपर्यंत घसरली. २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म होईल याची खात्री करण्यासाठी अनेक जोडप्यांनी २०२३ मध्ये लग्न केले. चिनी संस्कृतीत बाळंतपणासाठी हे एक शुभ वर्ष मानले जात आहे, यामुळे २०२३ मध्ये विवाहात तसेच २०२४ मध्ये जन्मदरात वाढ झाली. परंतु, २०२४ मध्ये विवाहांची संख्या पुन्हा कमी झाली.
असाही अंदाज लावला जात होता की लोकांनी २०२४ मध्ये लग्न करणे टाळले होते, कारण ते चिनी कॅलेंडरमध्ये अशुभ वर्ष होते. २०२४ ची संख्या २०२२ च्या तुलनेत ११% कमी झाली आहे आणि २०१३ मध्ये चीनमध्ये १३.४७ दशलक्ष विवाहांची नोंद करण्यात आली होती, त्याच्या तुलनेत ५५% विवाहात घट झाली आहे. चीनमधील एकूण परिस्थिती काय? तरुण पिढी लग्नाला नकार का देत आहे? त्याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chinese-Men-And-Women-Dont-Want-To-Get-Married-reasons-.jpg?w=830)
चीनमध्ये तरुणांचा लग्नाला नकार का?
विवाह दर कमी होण्यामागे सामाजिक कारण आहे, ते म्हणजे तरुण प्रौढांची घटती लोकसंख्या. त्यासह अलीकडील तरुणांचा आर्थिक दृष्टिकोन, विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री-पुरुषांमधील असमानता, या गोष्टीदेखील लग्नाला नकार देण्यास कारणीभूत आहेत, असे फॉरेन रिलेशन्सचे सांगणे आहे. चीनच्या २०१० च्या जनगणनेने नोंदवले की, महिलेचे सरासरी पहिल्या लग्नाचे वय अजूनही २४.९ आहे. २००० मध्ये हे २३.४ होते, त्यामुळे यात काही बदल झालेला नाही. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोनुसार, २०२० मध्ये लग्न करणाऱ्या महिलेचे सरासरी वय २७.९५ होते.
२०२२ मध्ये मोठ्या प्रमाणावरील सर्वेक्षणांनुसार, चिनी तरुणी विवाहाला अडथळा मानतात असे समोर आले आहे, त्यामुळे त्या विवाह न करण्यास पसंती दर्शवीत आहेत. १८ ते २६ वयोगटातील २,९०५ शहरी तरुणांच्या २०२१ च्या कम्युनिस्ट युथ लीगच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, तरुण पुरुषांपेक्षा तरुण स्त्रिया विवाहाला अधिक विरोध करतात. चीनमध्ये लग्न करणाऱ्या लोकांची संख्या सलग नऊ वर्षांपासून घसरत आली आहे. २०२२ मध्ये ही घट १९८६ नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर गेली आहे. १९८६ नंतर नागरी व्यवहार मंत्रालयाने आकडेवारी नोंदवण्यास सुरुवात केली.
विवाहांमध्ये घट झाल्यामुळे जन्मदरांवर परिणाम
विवाहसंख्येत झालेली प्रचंड घट चीनच्या जन्मदरात आणखी घसरण दर्शवत आहे. पूर्व आशियाच्या उर्वरित भागांप्रमाणेच चीनमध्ये विवाह नसलेल्या जन्मांविरुद्ध आजही विरोध आहे. विवाह आणि बाळंतपण या दोन गोष्टी जोडलेल्या आहेत. २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात विवाहात घट झाल्याने त्याचा परिणाम २०२५ मध्ये जन्मांच्या संख्येत तीव्र घट झाल्याच्या स्वरूपात दिसून येईल. दक्षिण कोरियामध्ये २०१३ ते २०२३ दरम्यान विवाहसंख्येत ४० टक्क्यांनी घट झाली, त्यामुळे प्रजनन दर ०.६८ वर घसरला. त्याप्रमाणेच चीनच्या प्रजनन दरात तीव्र घसरण (२०२० पेक्षा कमी) नोंदवली गेली आणि या आकडेवारीने दक्षिण कोरियालाही मागे टाकले.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/china-marriage-rate-declining.jpg?w=830)
सरकार लोकांना लग्न करण्यासाठी कसे प्रोत्साहन देत आहे?
लग्न, प्रेम, प्रजनन आणि कुटुंबाबद्दल सकारात्मक विचारांवर जोर देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी चीनमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांना ‘लव्ह एज्युकेशन’ प्रदान करण्याचे आवाहन केले. नागरी व्यवहार मंत्रालयाने ऑगस्टमध्ये विवाह नोंदणीवरील नियमावलीतील दुरुस्तीचा मसुदा प्रसिद्ध केला. त्याला आनंदी आणि सामंजस्यपूर्ण कुटुंबे निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा बदल म्हणून संबोधले गेले. या दुरुस्तीमध्ये घटस्फोटासाठी ३० दिवसांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधीदेखील समाविष्ट आहे. हा नियम केवळ घटस्फोटाच्या कार्यालयात कायद्यानुसार केलेल्या घटस्फोटाच्या अर्जांवर लागू होतो. तडकाफडकी घटस्फोट घेण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागील उद्देश आहे.
नोव्हेंबरमध्ये चीनच्या राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक सरकारांना चीनच्या लोकसंख्येच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी संसाधने निर्देशित करण्यास सांगितले आणि योग्य वयात मूल जन्माला घालणे आणि विवाहासाठी सकारात्मकता पसरविण्यासाठी प्रसार करण्यास सांगितले. २०१६ मध्ये चीनने आपले ‘एक कुटुंब एक मूल’ धोरण रद्द केले. आता सरकार महिलांना जास्तीत जास्त तीन मुलांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. लोकसंख्या विस्तारासाठी स्थानिक सरकारेही पावले उचलत आहेत आणि धोरणे तयार करत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांसाठी मोफत आयवीएफ सुविधा आणि अनुदान दिले जात आहे.
चीनची लोकसंख्या चिंताजनक
चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. चीनच्या १९८० ते २०१५ पर्यंत सुरू असलेल्या एक मूल धोरणामुळे आणि जलद शहरीकरणामुळे जन्मदर अनेक दशकांपासून घसरलाय. येत्या दशकात, अंदाजे ३०० दशलक्ष चिनी नागरिक सेवानिवृत्तीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. हा आकडा जवळजवळ संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या समतूल्य आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दीर्घ आयुर्मान आणि घटत्या प्रजनन दरामुळे चीनमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या २०४० पर्यंत २८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये, ६० आणि त्याहून अधिक वयोगटातील २५४ दशलक्ष वृद्ध लोक होते आणि १७६ दशलक्ष ६५ आणि त्याहून अधिक वयाचे वृद्ध लोक होते. २०४० पर्यंत अंदाजे ४०२ दशलक्ष लोक (एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के) ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील. हा कल असाच सुरू राहिल्यास, चीनमध्ये मोठे संकट निर्माण होऊ शकते.