British Worst Rapist : काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला अत्याचाराविरोधात कठोरात कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. अशातच लंडनमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने ड्रग्ज देऊन तब्बल १० महिलांवर बलात्कार केला आहे. झेनहाओ झोउ, असे नाव असलेला हा वासनांध तरुण चीनमधील रहिवासी असल्याचे कळतेय. या प्रकरणी इनर लंडन क्राउन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून, त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, ही भयावहता इथेच थांबत नाही; आरोपी झेनहाओने १० नाही तर ६० महिलांवर बलात्कार केला, असा संशय लंडन पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुप्तहेरांच्या माहितीनुसार, २८ वर्षीय आरोपी हा ब्रिटनमधील सीरियल बलात्कारी असू शकतो. ज्याने अनेक महिलांची आपल्या जाळ्यात ओढून वासनेची शिकार केली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके कसे उघडकीस आले? लंडनमधील महिला, तसेच तरुणी या तरुणाच्या वासनेला कशा बळी पडल्या? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

झेनहाओ झोउ कोण आहे?

लंडनमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, झेनहाओ झोउ हा मूळ चीनमधील रहिवासी आहे. त्याचा जन्म दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात झाला. झेनहाओचे वडील एका सरकारी मालकीच्या उद्योगात काम करतात आणि त्याची आई शिक्षिका आहे. वयाच्या २० व्या वर्षी झेनहाओ हा उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तर आयर्लंडला गेला. त्याने बेलफास्ट येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. सप्टेंबर २०१९ मध्ये तो यूसीएलमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स करण्यासाठी लंडनला गेला; परंतु कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान झेनहाओ पुढच्या वर्षी चीनला परतला.

आणखी वाचा : Marathi Politics : मुंबईत मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होतेय का? हिंदी भाषिक का वाढले?

ड्रग्ज देऊन महिलांवर बलात्कार

दरम्यान, करोना महामारीचा उद्रेक थांबल्यानंतर २८ वर्षीय तरुण पुन्हा चीनमधून लंडनला गेला. इथेच त्याची काळी बाजू समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेनहाओ डेटिंग अॅप्सद्वारे महिलांना लक्ष्य करrत होता. सुरुवातीला मैत्री केल्यानंतर तो महिलांना भेटण्यासाठी आग्रह धरायचा. ज्या महिला तरुणाला भेटायला येत होत्या, त्यांना तो शीतपेयातून ड्रग्ज देत होता. महिलांची शुद्ध हरपल्यानंतर झेनहाओ त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे नग्नावस्थेतील फोटो सापडले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरातून ड्रग्ज, नशेचे पदार्थ व दारूचा साठा जप्त केला आहे. त्याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

घटनेला वाचा कशी फुटली?

२०२३ मध्ये लंडनमधील एका ३२ वर्षीय महिलेने झेनहाओविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. २८ वर्षीय तरुणाने मला भेटायला बोलावून ड्रग्ज दिले आणि माझ्यावर सलग तीन तास बलात्कार केला, असे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच लंडन पोलीस झेनहाओला अटक करण्यासाठी त्याच्या महागड्या घरात पोहोचले. तेव्हा समोरील दृश्य पाहून पोलिसही चक्रावून गेले. लंडनमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, झोनहाउ हा एक श्रीमंत घराण्यातील मुलगा आहे. तो एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. आमचे अधिकारी जेव्हा त्याला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या फ्लॅटमद्ये शारीरिक संबंधांना उत्तेजना देणारी अनेक औषधे सापडली.

झोनहाउच्या मोबाईलमध्ये सापडले अनेक व्हिडीओ

पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, त्यांनी झोनहाउच्या मोबाईल, तसेच लॅपटॉपची तपासणी केली. त्यामध्ये अनेक बेशुद्ध महिलांवर बलात्कार करतानाचे त्याने शूट केलेले व्हिडीओ होते. एका व्हिडीओमध्ये आरोपी हा बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार करीत होता. या महिलेला जेव्हा थोडीशी शुद्ध आली, तेव्हा तिने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. परंतु, आरोपीने तिचे काहीही ऐकले नाही. व्हिडीओमध्ये महिलेच्या रडण्याचा आणि तरुणाच्या बोलण्याचा आवाजही रेकॉर्ड झाला होता. “मला धक्का देऊन आणि ओरडून काहीही होणार नाही. तुझा आवाज माझ्या घरातून अजिबात बाहेर जाणार नाही. कारण- येथील ध्वनी इन्सुलेशन खूप चांगले आहे,” असे झोनहाउ त्या पीडित महिलेला म्हणत असल्याचे लक्षात येतेय.

आरोपी महिलांना लक्ष्य कसं करायचा?

लंडन पोलिसांनी २८ वर्षीय बलात्कारी तरुणाला अटक करून, त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा आरोपीने १० महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यानंतर इनर लंडन क्राउन न्यायालयात झोनहाउविरोधात खटला सुरू झाला. यादरम्यान आणखी एका महिलेने झोनहाउविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेने असा दावा केला की, सप्टेंबर २०२१ मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिची झोनहाउबरोबर ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने तिला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले आणि शीतपेयातून ड्रग्ज दिले. महिलेची शुद्ध हरपल्यानंतर आरोपीने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने तिला आपल्या फ्लॅटवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

जेव्हा महिलेला शुद्ध आली, तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि आरोपी तरुण तिच्या बाजूला झोपलेला होता. महिलेने त्याला याबाबत विचारले असता, आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या महिलेने घाबरून पोलिसांत तक्रार दाखल केलेली नव्हती. आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांवर बलात्कार केला. विशेष म्हणजे बदनामीच्या भीतीने कुणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. परंतु, जेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली, तेव्हा अनेक महिलांनी आरोपीविरोधात बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या. सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपीकडे सापडलेल्या व्हिडीओंमध्ये अनेक महिला बलात्काराप्रसंगी त्याला प्रतिकार करताना दिसून आल्या आहेत.

हेही वाचा : Who is Ranya Rao : कोण आहे अभिनेत्री रान्या राव? तिच्याकडे कोट्यवधींचं सोनं कसं सापडलं?

पोलिसांना आरोपीकडे सापडले बलात्काराचे अनेक व्हिडिओ

लंडन पोलिसांनी जेव्हा झोनहाउच्या मोबाइल आणि लॅपटॉपची तपासणी केली. तेव्हा त्यांना आरोपीचे अनेक महिलांवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी श्रीमंत घराण्यातील आहे. त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बलात्काराचे १६०० तासांचे व्हिडीओ सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक व्हिडीओत वेगवेगळ्या महिला आहेत. त्यामुळेच आरोपीने १० नाही, तर ६० महिलांवर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांसह गुप्तचर विभागाला आहे. सरकारी वकील म्हणाले, “आरोपीने ज्या महिलांवर बलात्कार केला आहे, त्यांनी स्वत: पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात. आम्ही त्यांना खात्री देतो की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळले जाईल.”

आरोपीला आतापर्यंत किती प्रकरणांत शिक्षा सुनावण्यात आली?

२८ वर्षीय आरोपीने ड्रग्ज देऊन १० महिलांवर बलात्कार केल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. या प्रकरणी लंडन क्राउन न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या १० महिलांपैकी दोघींची ओळख पटली आहे आणि इतर आठ महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. अजूनही बरीच प्रकरणे उघडकीस येणे बाकी आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणांचा कसून तपास केला जात आहे.

ब्रिटनमध्ये बलात्काराची अनेक प्रकरणे

दरम्यान, ब्रिटनमध्ये साखळी बलात्कारांची प्रकरणे काही नवीन नाहीत. यापूर्वी ४२ वर्षीय सिनागा नामक आरोपीने २०१५ ते २०१७ दरम्यान मँचेस्टरमधील ४८ पुरुष आणि १५९ महिलांवर बलात्कार केला होता. ड्रग्ज देऊन आरोपी घाणेरडे कृत्य करीत होता. २००६ ते २००८ दरम्यान घडलेल्या आणखी एका घटनेने ब्रिटनला हादरवून टाकले होते. त्यामध्ये ६७ वर्षीय आरोपीने १२ तरुणी आणि १९ महिलांना ड्रग्ज देऊन, त्यांच्यावर बलात्कार केला होता. पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने १०० हून अधिक महिलांबरोबर घाणेरडे कृत्य केल्याची कबुली दिली होती.