China Vaccine Plaque in Heart : आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या झटक्यानं सर्वाधिक मृत्यू होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे, त्यामुळे या गंभीर आजाराला रोखण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ ठोस उपाय शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी शास्त्रज्ञांनी स्ट्रोक आणि हृदयविकार यांसारख्या घातक आजारांना रोखण्यासाठी संभाव्य लस विकसित केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ही लस नेमकी कशी काम करणार? त्यामुळे हृदयरोग बरा होऊ शकतो का? याबाबत जाणून घेऊ.
चीनमधील ‘Nanjing University of Science and Technology’च्या संशोधकांनी हृदयविकारावर प्रभावी ठरणारी नॅनो लस विकसित केल्याचा दावा केला आहे. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये या संदर्भातील अभ्यासही प्रकाशित करण्यात आला आहे. चिनी संशोधकांनी शोधून काढलेली ही लस वैद्यकीय क्षेत्रातील मोठी प्रगती आहे, असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : इंडसइंड बँकेत घडले काय? बँकेचे पुढे होणार काय?
हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो?
चीनमधील संशोधकांनी ‘एथेरोस्क्लेरोसिस’ला लक्ष्य करण्यासाठी ‘नॅनो व्हॅक्सिन’ विकसित केली आहे. एथेरोस्क्लेरोसिस हा एक सामान्य आजार आहे, जो शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा करतो. शरीरातील वाढलेली चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांचा साठा प्लेक जमा करण्याला कारणीभूत ठरतो. या प्लेकमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्याच्या जोखीम घटकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान, लठ्ठपणा, टाइप १ मधुमेह, चरबीयुक्त आहार यांचा समावेश आहे.
उंदरांवर केला यशस्वी प्रयोग
लसीकरणाचा वापर रोगांवर उपचार करण्यासाठी किंवा त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी केला जाऊ शकतो असा एक सिद्धात फार पूर्वीपासून आहे. चिनी संशोधकांनी सुरुवातीला उंदरांना उच्च कोलेस्ट्रॉल असलेला आहार दिला, यामुळे त्यांच्या शरीरातील प्लेकचे प्रमाण झपाट्याने वाढले. यानंतर नवीन विकसित करण्यात आलेल्या लसीचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. अभ्यासातून असं समोर आलं की, ही लस उंदरांच्या शरीरात जमा होणारे प्लेक रोखण्यात यशस्वी ठरली. “आम्ही तयार केलेल्या नवीन लसीमुळं एथेरोस्क्लेरोसिसवर नियंत्रण मिळवता येतं,” असं चीनमधील नानजिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं.
लस कशी विकसित केली गेली?
उंदरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होण्यास प्रतिबंध करणारे हे पहिलेच संशोधन होते. यापूर्वीही चीनमध्ये हृदयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधन करण्यात आले होते. मागील अभ्यासांमध्ये जळजळीपासून संरक्षण करणाऱ्या आणि एथेरोस्क्लेरोसिसला रोखणाऱ्या विविध प्रथिनांची डिजिटल लायब्ररी तयार करण्यात आली होती. या लायब्ररीचादेखील नवीन अभ्यासाठी फायदा झाला. चिनी संशोधकांनी सांगितले की, लस तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले p210 नावाचे प्रथिनं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, याशिवाय ते रक्तवाहिन्यांमध्ये प्लेकही जमा होऊ देत नाही.
हृदयविकारामुळे दर ३४ सेकंदांनी एकाचा मृत्यू
नवीन लसीचा प्रयोग मानवी शरीरावर यशस्वी प्रयोग झाला तर लाखो लोकांचे प्राण वाचतील. याशिवाय उपचारांवरील खर्चही कमी होईल. ज्या व्यक्तींना हृदयरोगाचा सर्वाधिक त्रास आहे, त्यांच्यासाठी ही लस वरदान ठरू शकते, असं चिनी संशोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान, हृदयरोग हा जगभरातील सर्वात मोठ्या आजारापैंकी एक आहे. दर मिनिटाला लाखो लोक हृदयरोगाशी झुंजत आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी केलेल्या दाव्यानुसार, दर ३४ सेकंदांनी हृदयरोगाने एका व्यक्तीचा मृत्यू होतो.
हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी लस विकसित करणे हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. मात्र, संशोधकांसमोर या लसीचा वापर मानवी शरीरावर करण्यासाठी अनेक आव्हानं असणार आहेत. मानवी चाचण्यांदरम्यान लसीची सुरक्षितता आणि तिची परिणामकारकता सिद्ध करणे गरजेचं आहे. याशिवाय लसीचे संभाव्य दुष्परिणामदेखील बारकाईने तपासावे लागणार आहे. या लसीचा वापर करण्यापूर्वी तिचा आणखी सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यतज्ज्ञांनी मांडलं आहे, त्यामुळे ही लस बाजारात येणार की प्रयोगशाळेतच पडून राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Nepal Hindu Monarchy: नेपाळ पुन्हा एकदा हिंदूराष्ट्र होणार का? काय आहे नेमकं प्रकरण?
हृदयविकाराचा सर्वाधिक धोका कोणाला?
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकार वाढण्याचं कारण बदलत्या जीवनशैलीशी निगडित आहे. तंबाखू सेवन, मद्यपान, सकस आहाराचा अभाव, आहारात मिठाचा अतिरिक्त वापर, शारीरिक हालचाल कमी असणं या कारणांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. हृदयविकाराचा धोका आता तिशीपासून वाढला आहे. त्याचं प्रमाण आता ३० ते ७० वयोगटात सर्वाधिक आहे. आहारावर नियंत्रण न ठेवणं, धुम्रपान करणं, ताणतणाव, निष्क्रिय जीवनशैली, कमी झोप यामुळं शरीरातील उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. याशिवाय मधुमेहाचा त्रासही होऊ शकतो. अशा आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हृदयविकाराचा धोका कसा टाळता येईल?
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात सर्व प्रकारची फळे, भाजीपाला, कडधान्ये, प्रोटिनयुक्त आणि चांगला फॅटयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. या आहारातून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी नियमित व्यायाम करणे गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वेगाने चालणे, सायकल चालविणे, डान्स करणे, इत्यादी गोष्टींमुळे शरीरातील स्नायूंना बळकटी मिळते. या व्यायामांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणीची करायला हवी, असंही आरोग्यतज्ज्ञ सांगतात.