Christopher Columbus a Spanish Jew? मध्ययुगीन जगात व्यापार आणि त्या दृष्टिकोनातून आखलेल्या मोहिमांनी इतिहासाला कलाटणी दिली. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ख्रिस्तोपर कोलंबसचे नाव महत्त्वाचे आहे. इसवी सनाच्या १५ व्या शतकात उत्तर अमेरिकेच्या शोधाने इतिहासातील एक नवे पर्व सुरु झाले. या शोधाचे श्रेय कोलंबसकडे जाते. असे असले तरी कोलंबस नक्की कोणाचा? कोणत्या देशाचा किंवा वंशाचा यावर एकमत नव्हते. परंतु एका नव्या संशोधनातून या रहस्याचा उलगडा झाला आहे. या संशोधनात डीएनए चाचणी करण्यात आली होती. यातूनच कोलंबस हा स्पॅनिश ज्यू (यहुदी) वंशाचा असावा हे संशोधकांनी शोधून काढले आहे. अमेरिकेचा शोध घेणाऱ्या या दर्यासारंगाची समाधी स्पेनमध्ये आहे. या शोधाने कोलंबसचे जन्मस्थान आणि मूळ कुटुंबाच्या वंशावळीसंदर्भात अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संशोधनात मोलाची भर घातली आहे. याच नवीन संशोधनाचा घेतलेला हा आढावा.
रहस्य उलगडले आहे
१५ व्या शतकात होऊन गेलेला ख्रिस्तोफर कोलंबस याने १४९२ साली केलेल्या अटलांटिक प्रवासाने इतिहासाचा प्रवाह बदलला. अभ्यासकांच्या मते,कोलंबस हा सेफार्डिक यहुदी होता आणि त्याचा जन्म पश्चिम युरोपमध्ये, कदाचित व्हॅलेन्सिया येथे झाला होता. ‘सेफार्डिक’ हा शब्द हिब्रूतील ‘सेफाराद’ किंवा स्पेन या शब्दावरून आला आहे. संशोधकांच्या मते, धार्मिक छळ टाळण्यासाठी कोलंबस याने कॅथलिक धर्म स्वीकारला किंवा आपली यहुदी अशी ओळख लपवली असावी. इसाबेला आणि फर्डिनांड या कॅथलिक राजवटींनी यहुदी आणि मुसलमानांना कॅथलिक धर्म स्वीकारावा किंवा देश सोडावा असा आदेश दिला होता. त्यापूर्वी स्पेनमध्ये सुमारे ३,००,००० यहुदी राहत होते.
अधिक वाचा: Vasco da Gama: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
कोलंबस नक्की कोणाचा? हे सांगणारे २५ सिद्धांत
कोलंबसचे मूळ तसेच समाधी स्थान नेमके कुठे आहे? याविषयी अनेक देशांमध्ये वाद आहेत. कोलंबसच्या मूळ स्थानाविषयी हक्क सांगणारे २५ सिद्धांत आहेत. त्यातील काही सिद्धांतानुसार कोलंबसचा जन्म पोलंड, ग्रेट ब्रिटन, ग्रीस, पोर्तुगाल, हंगेरी, आणि स्कँडिनेव्हिया येथे झाल्याचे मानले जाते. तर कोलंबसचा जन्म १४५१ साली इटलीमधील जिनोआ येथे एका लोकरीचे विणकाम करणाऱ्या कुटुंबात झाला होता हा सिद्धांत सर्वाधिक लोकप्रिय आहे. परंतु,अलीकडील डीएनए संशोधनाने हा पारंपरिक सिद्धांत खोडून काढला आहे.
संशोधनाविषयी..
हे संशोधन दोन दशकांपेक्षा जास्त काळ चालू होते. या संशोधनाचे निष्कर्ष शनिवारी रात्री RTVE वर (स्पॅनिश नॅशनल टेलिव्हिजन) एका विशेष कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रसारण स्पेनच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. याच कार्यक्रमात ख्रिस्तोफर कोलंबसने १२ ऑक्टोबर १४९२ रोजी लावलेल्या अमेरिकेच्या शोधाचे स्मरण करण्यात आले. या संशोधनाची सुरुवात २००३ साली झाली होती. इतिहासकार मार्शियल कॅस्ट्रो आणि जोसे अँटोनियो लोरेन्टे, ग्रॅनडा विद्यापीठातील फॉरेन्सिक औषधाचे प्राध्यापक यांनी सेव्हिल कॅथेड्रलमधून कोलंबसचे अवशेष शोधून काढले. सेव्हिल कॅथेड्रल हे स्थळ कोलंबसच्या समाधीचे स्थळ मानले गेले होते. गूढ उकलण्यासाठी, संशोधकांनी सेव्हिल कॅथेड्रलमध्ये दफन केलेल्या अवशेषांच्या लहान नमुन्यांची चाचणी केली. हे संशोधन सुरु असतानाही अनेक प्रतिस्पर्धी दावे करण्यात येत होते. या तपासणीतून कोलंबसचे मूळ स्थान आणि त्याचे राष्ट्रीयत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणि पारंपरिक सिद्धांतांना आव्हान दिले गेले, ज्यात कोलंबसचा जन्म जिनोआ, इटली येथे झालाचे म्हटले होते.
कोलंबसच्या ज्ञात नातेवाईक आणि वंशजांच्या डीएनएची पडताळणी
“आमच्याकडे ख्रिस्तोफर कोलंबसचा डीएनए आहे, जरी तो अपूर्ण असला, तरी तो पुरेसा आहे. आमच्याकडे त्याचा मुलगा हर्नांडो कोलोनचा डीएनए आहे,” असे लॉरेन्टे यांनी कार्यक्रमात सांगितले. पुढे ते म्हणाले, “हर्नांडोच्या ‘Y’ क्रोमोसोम (पुरुष) आणि माइटोकॉन्ड्रियल डीएनए (आईकडून मिळणारे) मध्ये यहुदी वंशाशी सुसंगत गुणधर्म आढळले आहेत.” लॉरेन्टे कोलंबसचे जन्मस्थान निश्चित करू शकले नाही, तरी त्यांनी सांगितले की, कोलंबसचा जन्म स्पेनच्या भूमध्यसागरीय प्रदेशात झाला असण्याची शक्यता आहे. द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, डीएनए अहवालानुसार ख्रिस्तोफर कोलंबसचा जन्म पश्चिम भूमध्यसागरीय भागात झाला होता. १५ व्या शतकात जिनोआमध्ये यहुदी लोक नसल्याने तिथे जन्म झाल्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच इटलीच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात यहुदी समुदाय नव्हता. त्यामुळे काही गोष्टी अस्पष्ट आहेत.
लॉरेन्टे यांनी पुढे सांगितले की, शोध अधिक मर्यादित झाला कारण कोलंबस फ्रेंच होता याबद्दल कोणतेही ठोस सिद्धांत किंवा स्पष्ट पुरावे नव्हते. त्यामुळे समोर फक्त स्पॅनिश भूमध्यसागरीय क्षेत्र, बालिआरिक बेट आणि सिसिली इतकेच प्रदेश शिल्लक होते. त्यामुळे तो मुळचा स्पॅनिश भूमध्यसागरीय प्रदेश किंवा बालेअरिक बेटे येथील असण्याची शक्यता वाढली. हा प्रदेश त्यावेळी अर्गॉनच्या राज्याचा भाग होता. लॉरेन्टे यांनी २५ संभाव्य ठिकाणांचा अभ्यास केल्यानंतर, त्यांचा शोध पश्चिम युरोपपर्यंत आला आणि त्यानंतर हा शोध आठ ठिकाणांपर्यंत मर्यादित करण्यात आला. कोलंबसच्या राष्ट्रीयत्त्वावरील संशोधन अनेक घटकांमुळे गुंतागुंतीचे झाले, परंतु आम्ही केलेले संशोधन हे विश्वासार्ह आहे,” असे लॉरेन्टे यांनी सांगितले.
इतर तज्ञांचे मत
इतर तज्ज्ञांनी अगदीच सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनटोनियो अलोंसो (अनुवंशशास्त्रज्ञ आणि स्पेनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्सेसचे माजी संचालक) यांनी El País शी बोलताना सांगितले की, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या डॉक्युमेंटरीत नक्की काय सांगितले आहे यावर काहीच भाष्य करता येत नाही. त्यांनी पुढे सांगितले की, “माझे निष्कर्ष असे आहेत की, या डॉक्युमेंटरीत कोलंबसच्या डीएनएचे विश्लेषण कधीच दाखवले गेले नाही आणि वैज्ञानिक म्हणून आम्हाला काय विश्लेषण केले गेले हे माहिती नाही.” रॉड्रिगो बारक्वेरा हे मॅक्स प्लॅन्क इन्स्टिटयूट फॉर इव्होल्यूशनरी अँथ्रोपॉलॉजी येतेच पुरातत्त्व अभ्यासक आहेत, त्यांनीही अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त केली. संशोधनाचे परिणाम इतर वैज्ञानिकांनी पुनरावलोकन न करता प्रसिद्ध केले गेले असे ते म्हणाले. मूलतः संशोधन क्षेत्रात तुमचा संशोधनपर लेख सायंटिफिक जर्नलला पाठवला जातो. त्याचे मूल्यांकन होते. तो वैज्ञानिकदृष्ट्या वैध आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो. जर तो वैध असेल, तर तो प्रकाशित केला जातो आणि मग उर्वरित वैज्ञानिक समुदायाला तो मान्य आहे की नाही हे सांगण्याची संधी मिळते. मात्र, स्क्रीनवर तो डेटा दाखवणे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेणे यामुळे वैज्ञानिक समुदायाकडून त्यावर मत मांडणे कठीण होते,” असे रॉड्रिगो यांनी ‘El País’ ला सांगितले. लॉरेन्टे यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितले की, तपास पूर्ण होईपर्यंत काहीही प्रकाशित केले जाणार नाही.
अधिक वाचा: विश्लेषण: दालचिनीचं ग्रीक कनेक्शन; भारतीय मसाल्यांना हजारो वर्षांचा इतिहास!
कोलंबस विषयी..
ख्रिस्तोफर कोलंबस याने स्पेनच्या कॅथलिक राजवटींनी पाठिंबा दिलेल्या एका मोहिमेचे नेतृत्व केले होते. या मोहिमेचा हेतू आशियाकडे जाणाऱ्या नवीन मार्गाचा शोध घेणे हा होता. कोलंबस अखेर कॅरिबियन बेटांवर पोहोचला. त्याच्या आगमनानंतर युरोपियन लोकांचा अमेरिकेशी संपर्क सुरु झाला. या शोधानंतर वसाहतवाद, युद्ध, रोगामुळे लाखो लोकांचे मृत्यू असा इतिहास लिहिला गेला. कोलंबसचे निधन १५०६ साली स्पेनमधील व्हॅलाडोलिड येथे झाला. परंतु त्याची इच्छा होती की, त्यांचे अंतिम संस्कार हिस्पानिओला बेटावर (सध्याचे डॉमिनिकन रिपब्लिक आणि हायती) केले जावेत. त्यामुळे त्याचे अवशेष १५४२ साली त्या बेटावर नेण्यात आले, नंतर १७९५ साली क्यूबात हलवण्यात आले, आणि शेवटी १८९८ साली, स्पॅनिश-अमेरिकन युद्धानंतर, स्पेनने क्यूबाचा ताबा गमावल्यानंतर, त्यांचे अवशेष सेव्हिलमध्ये परत नेण्यात आले.