इजिप्त म्हटलं की, डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे मोठमोठाले पिरॅमिड्स आणि ममीज्. इजिप्तच्या या अद्भुत संस्कृतीची भुरळ कोणाला पडली नाही तर विशेषच म्हणावं लागेल. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना नाईल नदीच्याकडेला असलेल्या डोंगरात खोदलेली ३० पेक्षा अधिक प्राचीन दफने सापडली आहे. या दफनांमध्ये एकत्र असलेल्या ममीजनी तिथे एकत्र पुरलेल्या कुटुंबाचा पुरावा दिला आहे. एकेका दफनांमध्ये ३० ते ४० पेक्षा अधिक ममीज आहेत. अनेकांचे मृत्यू कमी वयातच झालेले आहेत, असे संशोधनात लक्षात आले आहे. ही दफने एकावर एक अशी वेगवेगळ्या स्तरावर खोदण्यात आली आहेत. आणखी काही दफने इथे सापडण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.
हे स्थळ नक्की कुठे आहे?
पुरातत्त्व अभ्यासकांना ईजिप्तमधील अस्वान या प्राचीन इजिप्शियन शहराजवळील नाईल नदीच्याकडेला असलेल्या एका टेकडीवरील पुरातत्त्वीय उत्खननानंतर अनेक दफने सापडली आहेत. त्यामुळे सध्या अस्वान या शहरांला ‘सिटी ऑफ डेड’ म्हटले जात आहे. या स्थळावर हजारपेक्षा अधिक ममीज सापडल्या आहेत. हे स्थळ आगा खान तिसरा याच्या समाधीजवळ आहे. गेली पाच वर्ष या भागात उत्खनन सुरु होते. अंदाजे दोन लाख ७० हजार चौरस फूट पसरलेल्या या स्थळावर ३० हून अधिक दफने आहेत, प्रत्येक दफनामध्ये ३० ते ४० ममी आहेत. या संशोधनातून तत्कालीन इजिप्तमध्ये अंत्यसंस्कार कसे होत होते, याविषयीची माहिती समजण्यास मदत होते. या स्थळावर झालेल्या शोधकार्याचे नेतृत्त्व पॅट्रिझिया पियासेंटिनी यांनी केले. २०१९ पासून येथे उत्खननाला सुरुवात झाली होती. या उत्खननातून इसवी सनपूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सन नवव्या शतकापर्यंतचा कालखंड उलगडतो. नाईल नदी जवळच असल्याने अस्वान हे प्राचीन काळात मुख्य व्यापारी आणि लष्करी स्थळ होते.
अधिक वाचा: ४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड?
अर्भक आणि बालकांच्या ममींची संख्या जास्त
या शोधातील सर्वात लक्षवेधी पैलू म्हणजे अर्भक आणि बालकांच्या ममीजची अधिक असलेली संख्या. या ठिकाणी पुरलेल्यांपैकी अंदाजे ३० ते ४० टक्के ही तरुण मुलं किंवा अर्भकं होती. क्षयरोग, कुपोषण यांसारख्या आजारांना बळी पडलेल्यांचे हे मृतदेह होते. मुलांमधला हा उच्च मृत्युदर तत्कालीन समाजातील आरोग्यविषयक आव्हाने दर्शवितो. काही ममीज् कार्टोनेजमध्ये (cartonnage) गुंडाळलेल्या आहेत, हे उदाहरण दफन प्रक्रियेत घेतलेली काळजी दर्शवते. या शोधानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणेज काही दफनांमध्ये एकाच दगडी शवपेटीत दोन ममी एकत्र ठेवलेल्या आहेत.
९०० वर्षांपासून वापरात आहे ही दफन भूमी
या स्थळावर उत्खनन करणाऱ्या पुरातत्त्व अभ्यासकांना सापडलेली ही दफने इसवी सनपूर्व ३३२ ते ३९५ या दरम्यानच्या कालखंडातील म्हणजेच ग्रीक आणि रोमन कालखंडातील असावीत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुप्रीम कौन्सिलच्या इजिप्शियन पुरातत्त्व विभागाचे प्रमुख अयमान अश्मावी यांनी एका बातमीत म्हटले आहे की, या संशोधनात ३३ दफने सापडली आणि त्यातील सुमारे ४० टक्के अवशेष हे नवजात किंवा दोन वर्षांखालील लहान बालकांचे आहेत. त्यांना याशिवाय इतरही अनेक वस्तू सापडल्या आहेत, त्यात तेलाच्या दिव्यांचाही समावेश आहे. हे दिवे मरणोत्तर जीवनावरील विश्वास दर्शवतात. पॅट्रिझिया पियासेंटिनी (इजिप्टोलॉजिस्ट आणि मिलान विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ) यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, आपण कल्पना करू शकतो की ज्यावेळी शोक सभा किंवा तत्सम विधींच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करण्यात येत असावे आणि हे चित्र नक्कीच नेत्रदीपक असणार. ही दफने कौटुंबिक दफनाची जागा दर्शवतात. दफनाची ही जागा जवळपास ९०० वर्षांपासून वापरात होती, असे पियासेंटिनी म्हणाल्या. या पुरात्तत्व चमूला दगडी शवपेटीमध्ये एकमेकांना चिकटलेल्या दोन मृतदेहांसह अनेक ममी सापडल्या आहेत. त्यांचे नाते शोधण्यासाठी या जोडीचा अभ्यास करण्याची टीमची योजना आहे, असे इजिप्शियन पुरातत्त्व मोहिमेचे संचालक अब्दुल मोनीम सईद यांनी सांगितले.
अधिक वाचा: इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
सामाजिक स्तरानुसार दफन
शोध कार्यात रंगीत पुठ्ठा आणि भाजलेली चिकणमाती, दगड, लाकडी शवपेटी आणि बळी देण्याची जागा पाहून संशोधक देखील हैराण झाले होते. त्यांनी पुढे संशोधन सुरू ठेवण्याची योजना आखली आहे. परंतु सईद यांच्या म्हणण्यानुसार, पुरावे असे दर्शवितात की, अस्वान बेटावरील मध्यमवर्गीयांना कदाचित दफनांच्या खालच्या भागात पुरले गेले होते, तर बहु-स्तरीय संरचनेचा भाग हा वरिष्ठ वर्गासाठी राखीव होता. काही दफने सफेद विटांच्या भिंतींनी वेढलेल्या मोकळ्या अंगणाजवळ होती आणि इतर थेट डोंगरातील खडकात खोदली होती. यातून सामाजिक स्तरानुसार दफन होत होते, हे सिद्ध होते.
प्रश्न अनुत्तरितच आहेत
सुरुवातीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, इथे दफन केलेल्यांपैकी काहींचा मृत्यू संसर्गजन्य रोगांमुळे झाला होता, तर काहींचा मृत्यू ऑस्टिओआर्थराइटिस किंवा कुपोषणाने झाला होता. तर एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. या प्रदेशात कोणत्या प्रकारचे रोग होते-आणि ते किती संसर्गजन्य होते- याबद्दल अतिरिक्त तपशील अवशेषांच्या पुढील तपासामध्ये उघड होऊ शकतात. हे एक श्रीमंत आणि महत्त्वाचे स्थळ होते असे पियासेंटिनी म्हणाल्या. “उत्तर आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय आफ्रिकेदरम्यानच्या व्यापारासाठी हे ठिकाण महत्त्वाचे होते आणि ते प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान होते.” त्यापुढे म्हणाल्या, या ठिकाणी संशोधनाचे काम सुरूच राहील. कारण इथे शोध घेण्यासारखे बरेच काही आहे. शिवाय अनेक ममी एकमेकांना का चिटकवून ठेवण्यात आल्या आहेत, हाही प्रश्न अनुत्तरित आहे, त्याचाही शोध घेतला जाईल!