सर्वसाधारणपणे पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, लेप्टोचा, तर हिवाळ्यात इन्फ्लुएन्झाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. मात्र गेल्या संपूर्ण वर्षभरात या सर्वच आजारांचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून आला. वातावरणातील बदलांबरोबरच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि काही प्रमाणात विषाणूंचे उत्परिवर्तन याला कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. यासंदर्भात घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्फ्लुएन्झात कसा बदल झाला?

एच १ एन १ आणि एच ३ एन २ हे इन्फ्लुएन्झाचे उपप्रकार. संसर्गजन्य आजार असलेला एच १ एन १ हा स्वाइन फ्लू नावाने, तर एच ३ एन २ हा हाँगकाँग फ्लू नावाने ओळखला जातो. या दोघांच्या लक्षणांमध्ये साम्य आहे. स्वाइन फ्लूचे रुग्ण साधारणपणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूमध्ये उत्परिवर्तन घडून एच ३ एन २ हा नवा विषाणू समोर आला. नुकत्याच सरलेल्या २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत इन्फ्लुएन्झाचे अधिक रुग्ण सापडले. राज्यात २०२३ मध्ये इन्फ्लुएन्झाचे १२३१ रुग्ण सापडले होते, तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. इन्फ्लुएन्झाचे २०२४ मध्ये २३४६ रुग्ण सापडले आणि ७२ जणांचा मृत्यू झाला. मात्र २०२४ च्या रुग्णांमध्ये एच १ एन १ पेक्षा एच ३ एन २ बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच संपूर्ण वर्षभर एच ३ एन २ चे रुग्ण कमी – अधिक प्रमाणात सापडतच होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 

हिवताप व डेंग्यूचे रुग्णही वर्षभर?

पावसाळा व त्यानंतरच्या दोन महिन्यांच्या कालावधीत साधारणपणे हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण सापडतात. मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. थंडीत पडणारे कडक ऊन आणि उन्हाळ्यामध्ये पडणारा पाऊस या निसर्गाच्या बदललेल्या ऋतुचक्रामुळे हिवताप व डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे, विकासकामे सुरू आहेत. वातावरणातील बदलाबरोबरच बांधकाम स्थळी साचणारे पाणी या आजारांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरत आहे. साधारणत: पावसाळा व त्यानंतर काही काळ हिवताप, डेंग्यूचे रुग्ण आढळत होते. परंतु आता संपूर्ण वर्षभर हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. राज्यात २०२४ मध्ये हिवतापाचे १५ हजार ६७० रुग्ण सापडले होते. यापैकी सर्वाधिक ७ हजार ८०६ रुग्ण मुंबईत होते, त्याखालोखाल गडचिरोलीमध्ये ६ हजार ५७६ रुग्ण सापडले. तसेच राज्यात डेंग्यूचे १९ हजार १६० रुग्ण सापडले असून त्यापैकी सर्वाधिक ५ हजार ८५१ रुग्ण मुंबईत सापडले होते.

हेही वाचा >>> Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?

चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ?

हिवताप व डेंग्यूप्रमाणेच चिकुनगुन्या हा आजारही डासांमुळेच होतो. वातावरणात होत असलेल्या बदलाचा परिणामही चिकुनगुन्याच्या डासांमध्ये दिसून आला आहे. परिणामी, चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये यंदा वाढ झाली आहे. राज्यामध्ये चिकुनगुन्याचे ५ हजार ७५७ रुग्ण सापडले होते. नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ८८ रुग्ण आढळले. त्याखालोखाल पुण्यामध्ये ७५१, तर  मुंबईमध्ये ७३५ रुग्ण सापडले होते.

लेप्टोच्या रुग्णांमध्येही वाढ?

लेप्टो हा साधारणपणे प्राण्यांच्या मलमूत्रापासून होतो. प्राण्याचे मलमूत्र मिसळलेल्या पाण्याशी शरीरावरील जखम किंवा ओरखड्याचा संपर्क आल्यास लेप्टोचा संसर्ग होतो. कुत्रा, उंदीर, डुक्कर यांच्याशी संबंध असणाऱ्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. संपूर्ण वर्षामध्ये अधूनमधून पाऊस पडतो. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचते. काही वेळा साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे मलमूूत्र मिसळलेले असते. या पाण्याशी नागरिकांचा संपर्क आल्यास लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका संभवतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change creating favorable environment for mosquito borne diseases print exp zws