-भक्ती बिसुरे
हवामान बदल आणि तापमान वाढ हे सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील परवलीचे शब्द ठरत आहेत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच नाही, तर जगातील सगळेच देश थोड्याफार प्रमाणात हवामान बदलांचे परिणाम सहन करत आहेत. हवामान बदल, तापमान वाढीला तोंड देण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. हवामान बदलांमुळे होत असलेल्या परिणामांशी दोन हात करण्यासाठी प्रामुख्याने मानसोपचारांची मदत होण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कारण हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा थेट परिणाम हा माणसाच्या मनोवस्थेवर होतो, याचा अनुभव मानवजातीने घेतला आहे. या मनोवस्थेला ‘क्लायमेट अँक्झायटी’ म्हणून संबोधले जाते. त्यामुळेच या परिणामांची तीव्रता रोखण्यासाठी मानसशास्त्र उपयुक्त ठरणार असल्याचे शास्त्रज्ञ स्पष्ट करत आहेत. ‘टाईम’ मासिकाने याबद्दल सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे.
शास्त्रज्ञ काय म्हणतात?
अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन कन्व्हेन्शनच्या निमित्ताने जगातील काही महत्त्वाच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन मानसोपचार हे हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता रोखण्यासाठीचे एक प्रमुख साधन असल्याचे म्हटले आहे. हवामान बदलाबाबत तुम्हाला काय वाटते या प्रश्नावर बहुतांश वेळा भीती, काळजी, चिंता, चिडचिड, नैराश्य येते अशी उत्तरे दिली जातात. मात्र, त्याच त्या विचारात अडकून राहून या गोष्टी मनाला लावून घेण्यापेक्षा मानसोपचारांची मदत घेणे हा सद्य:स्थितीत एक आशादायी पर्याय असू शकतो, असे मत हे शास्त्रज्ञ व्यक्त करतात.
हवामान बदलाचे मानसिक आरोग्यावर परिणाम?
हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा थेट संबंध नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी आहे. २०२१मध्ये लॅन्सेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जगातील १० देशांच्या लोकसंख्येपैकी १६ ते २५ वर्षे वयोगटातील सुमारे ८४ टक्के नागरिकांना तापमान वाढीबद्दल साधारण काळजी वाटते. ५९ टक्के तरुण मुलांना मात्र ही काळजी खूपच जास्त प्रमाणात वाटते. तापमान वाढीबद्दल अत्यंत टोकाचे आणि भावनिक प्रतिसाद काही नवे नाहीत असे अमेरिकेतील शास्त्रज्ञ सांगतात. ज्यांना चिंता किंवा भावनिक पातळीवर तापमान वाढीच्या प्रश्नाने ग्रासले आहे त्यांच्यासाठी समुपदेशन किंवा उपचारांची मदत घेण्यातून उपयोग होणे शक्य आहे. ‘क्लायमेट अँक्झायटी’ या मानसिक आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना या सर्व परिस्थितीला आपण जबाबदार आहोत असे वाटत असण्याची शक्यता आहे, मात्र तसे नाही. कोणीही एक किंवा दोन माणसे तापमान वाढीला जबाबदार नाहीत, असा निर्वाळा हे शास्त्रज्ञ देतात.
तरुणाईमध्ये संताप?
हवामान बदल आणि तापमान वाढ या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या वयोगटांमध्ये दिसणारे प्रतिसाद वेगळे आहेत. आपल्या आधीच्या पिढ्यांनी निर्माण केलेल्या समस्यांचे परिणाम आपण आणि आपल्या पुढील पिढ्या भोगणार याबद्दल विशेषतः तरुण वर्गामध्ये संतापाची भावना आहे. हा संताप पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी विशेष महत्त्वाचा असल्याची भावना शास्त्रज्ञ व्यक्त करतात. या संतापाचे रूपांतर पर्यावरण आणि तापमान वाढीबाबतच्या प्रश्नांबाबत जागृती करण्यामध्ये कसे करता येईल, यावर विचार करण्याची गरजही शास्त्रज्ञांकडून अधोरेखित करण्यात येत आहे. तरुणाईबरोबरच लहान मुलांची तापमान वाढीबाबतची समज काय आहे, याकडेही शास्त्रज्ञ लक्ष वेधतात. क्लायमेट अँक्झायटी मुलांमध्येही आहे, मात्र जगाचा अंत होणार आहे वगैरे नकारात्मक गोष्टी पालकांनी मुलांना सांगू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मानसोपचारांची भूमिका काय?
हवामान बदल आणि तापमान वाढ आणि त्यांचे मानव जातीच्या जगण्यावर आज दिसणारे आणि दीर्घकालीन परिणाम नाकारण्याची गरज नाही. त्यांचा स्वीकार आता आपण करणे आवश्यक आहे. तो स्वीकार केल्यानंतरच मानसशास्त्र आणि मानसोपचार यांची मदत घेणे शक्य आहे. तापमान वाढीचे आज दिसणारे आणि भविष्यातील संभाव्य दुष्परिणाम यांबाबत मुलांमध्ये आणि तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण करणे ही प्राथमिक गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. युनिसेफ सांगते, की संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे तापमान वाढ रोखण्यासाठीची आपल्या आवाक्यातील पावले उचलण्याचा उपयोग होणे शक्य आहे. उदाहरणार्थ पर्यावरण पूरक जीवनशैली, जुन्या गोष्टींचा पुनर्वापर, अन्नाचा कचरा कमी करणे, पाणी वाचवणे आणि झाडे लावणे या गोष्टी सहज करणे शक्य आहे. पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर, ऊर्जेची बचत या गोष्टी एकत्रितपणे केल्यानेही क्लायमेट अँक्झायटी रोखण्यास काही प्रमाणात हातभार लावणे शक्य असल्याचे वैज्ञानिक वर्तुळातून स्पष्ट होते.
तापमान वाढ का नाकारू नका?
डोळ्यांनी दिसत असलेल्या परिस्थितीला नाकारणे हे हवामान बदल आणि तापमान वाढीबाबत बहुतांश प्रमाणात दिसून येत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञ नोंदवतात. उदाहरणार्थ- उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा पाऊसच न पडणे, चक्रीवादळे, महापूर यांसारख्या संकटांचे बदललेले स्वरूप आणि तीव्रता पाहता तापमान वाढीसारखे बदल होत आहेत, हे मनोमन माहिती असूनही त्याचा स्वीकार न करणे किंवा वास्तव नाकारणे यांसारख्या गोष्टी दिसतात. मात्र, त्या नाकारणे योग्य नाही. हा नकार स्वीकारात बदलण्यासाठी मानसशास्त्र, मानसोपचार यांची मदत घेणे शक्य आणि आवश्यक आहे, असे शास्त्रज्ञांकडून अधोरेखित करण्यात येत आहे.