आधी लांबलेला पाऊस, नंतर उशिरा पडलेली थंडी आणि आता अचानक वाढलेली उष्णता यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हवामानातील बदलामुळे यंदा हापूस आंबाच्या पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या सद्यःस्थितीचा थोडक्यात घेतलेला आढावा.

कोकणातील हापूस आंबा लागवड क्षेत्र किती?

कोकणात १ लाख २६ हजार २४१ हेक्टर आंबा लागवडीखालील क्षेत्र आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यात ६२ हजार २८०, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ हजार ९२०, रायगड जिल्ह्यात १५ हजार ५४७, पालघर जिल्ह्यात ११ हजार ७८३ तर ठाणे जिल्ह्यात २ हजार ७११ हेक्टर आंबा लागवडीखालचे क्षेत्र आहे. यातून दरवर्षी २ लाख १९ हजार ५८९ मेट्रिक टन इतके आंबा उत्पादन घेतले जाते. यात रत्नागिरी जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४२ हजार, रायगडमधून २९ हजार, पालघरमधून १२ हजार तर ठाणे जिल्ह्यातून अडीच हजार मेट्रिक टन आंबा उत्पादनाचा समावेश असतो. प्रति हेक्टर आंब्याची उत्पादकता ही १.७९ मेट्रिक टन असते.

हापूस नाव कसे पडले ? वैशिष्ट्य काय?

देशभरात विविध राज्यांत आंब्याचे उत्पादन घेतले जाते. ५० हून अधिक देशांत आंब्याची निर्यातही होते, मात्र कोकणातील हापूस आंबा इतर आंब्यांच्या तुलनेत भाव खाऊन जातो हे नक्की. तेजस्वी पिवळा रंग, मधूर वास, गोड चव आणि दीर्घ काळ टिकणारा असल्याने कोकणातील आंबा देशात इतरत्र उत्पादित होणाऱ्या आंब्यांच्या तुलनेत वरचढ ठरतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन बहाल केले आहे. कोकणातील आंबा हापूस आणि अल्फान्सो या नावाने ओळखला जातो. याबाबत रंजक इतिहास सांगितला जातो. जिऑलॉजिकल इंडिकेटर जर्नल्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो अल्बुकर्क नावाचे एक अधिकारी होते. त्यांनी गोवा आणि कोकणात बरीच भटकंती केली. आंब्याच्या जातींवर बरेच संशोधन केले. केले. त्यातून हापूसची जात विकसित झाली. त्यामुळे हा आंबा त्यांच्या नावाने अर्थात अल्फान्सो या नावाने ओळखला जाऊ लागला. गोव्यातील ग्रामीण भागात या आंब्याला अपूस असे संबोधले जायचे, कोकणात त्याचा उच्चार हापूस असा होत गेला. त्यामुळे कोकणातील आंब्याला पुढे हेच नाव रूढ झाले.

आंब्याचा हंगाम कसा असतो?

कोकणात साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पहिल्या टप्प्यातील आंबा जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होतो. या आंब्याची अतिशय चढ्या दराने विक्री होते. दुसऱ्या टप्प्यातील आंबा साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात येतो. आवक वाढल्याने, आंब्याचे दर कमी होण्यास सुरुवात होतात. तिसऱ्या टप्प्यातील आंबा साधारणपणे एप्रिल महिन्यात बाजारात येतो. मुबलक प्रमाणात आंबा या कालावधीत दाखल होत असल्याने, हा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतो.

यावर्षी काय?

कोकणात पावसाचा मुक्काम लांबल्याने यंदा मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. कोकणात २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहिला. त्यामुळे मोहोर येण्यास जवळपास एक महिन्याचा विलंब झाला. यानंतरही हवामानातील चढ-उतार सुरू राहिले. उशिरा सुरू झालेली थंडी मध्येच काही काळ गायब झाली. त्यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला. या सर्व घटकांचा आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील यंदा आंबा बाजारात उशिराने दाखल झाला. हवामानातील बदलांमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील आंबाही यंदा बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे. मोहोर येण्यास उशीर झाल्याने, शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.

वाढत्या उष्णतेचा परिणाम कसा?

गेल्या काही दिवसात कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळते. या उष्णतेचाही आंब्यावर विपरीत परिणाम होतो. मोहर जळणे, फळधारणा खंडित होणे, लहान फळे गळून पडणे, तयार होत आलेले आंबे डागाळणे आणि आतून साकावणे यासारखे परिणाम आंब्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. आंब्याला नियंत्रित पाणी देऊन उष्णतेचा प्रकोप थोपविण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्यात आंब्यावर रायगड जिल्ह्यात फुलकिडे आणि तुडतुडे याचाही प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळेही आंबा पिकाला फटका बसला. त्यामुळे यंदा ४० ते ४५ टक्के आंबा हाती लागेल अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

बाजारातील सध्याची आवक कशी?

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुबलक प्रमाणात आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवसाआड आंब्याची आवक बाजारात होत होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात दर दिवशी ४० ते ५० हजार पेट्या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये येत होत्या. यंदा मात्र मार्च महिन्यात तीन ते चार हजार पेट्या दर दिवशी बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे आंब्याचे दर अजूनही चढे आहेत. चार डझनाची पेटी चार ते सहा हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा हंगाम कमी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. harshad.kashalkar@expressindia.com

Story img Loader