हवामान बदलामुळे माणसाला अनेक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. कुठे पाणी संकट, कुठे पूर, तर कुठे भूकंप अशी सध्या जगाची परिस्थिती आहे. मात्र, आता वैज्ञानिकांच्या संशोधनात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या महितीनुसार रात्रीपेक्षा दिवसच मोठा होत जाणार आहे. अनेकांच्या कदाचित हे लक्षातही आले असावे की, काही वर्षांच्या तुलनेत आता रात्र ही छोटी झाली आहे आणि दिवस मोठा झाला आहे. पुढेही हे प्रमाण वाढत जाणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. काय आहे यामागचे कारण? हे पृथ्वीसाठी धोकादायक असू शकतं का? याचा माणसावर काय परिणाम होणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
मानवी वर्तनामुळेच हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट ओढवले आहे; ज्याचा नकारात्मक परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो आहे. हवामान बदलामुळे हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याच्या स्थितीवर परिणाम होत आहे. आता संशोधनात समोर आलेल्या महितीनुसार वेळेवरदेखील याचा परिणाम होत आहे. हवामानातील बदलामुळे दिवस कसा मोठा होतोय? त्याचा वेळेवर काय परिणाम होत आहे? हे संकट पृथ्वीसाठी धोकादायक आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : चांदीपुरा व्हायरसचा कहर; ५ दिवसांत ६ मुलांचा मृत्यू, हा व्हायरस किती घातक? काय आहेत याची लक्षणे?
दिवस मोठा अन् रात्र छोटी
जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि ईटीएच झुरिचच्या संशोधकांनी केलेला अभ्यास प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ध्रुवीय बर्फाच्या वितळण्यामुळे पृथ्वीचा वेग मंदावला आहे आणि त्यामुळेच रात्रीपेक्षा दिवस मोठा होत आहे. यावर नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेचे सह-लेखक सुरेंद्र अधिकारी यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामधून वाहणाऱ्या पाण्यामुळे विषुववृत्ताभोवती अधिक वस्तुमान निर्माण होत आहे; ज्यामुळे पृथ्वीचे जडत्व वाढते.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक येथे वितळणाऱ्या हिमनगामुळे पाणी विषुववृत्ताजवळील समुद्रात येते. त्यामुळे समुद्राची पातळी हळूहळू वाढत जाते. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने पृथ्वी अधिक जड होते आणि पृथ्वीचा वेग मंदावतो. संशोधकांच्या गटाने १९०० ते २१०० या कालावधीतील अंदाजाचा अभ्यास केला. त्यात भूतकाळातील पूर्वीची स्थिती आणि हवामान बदलामुळे भविष्यावर होणारा परिणाम, याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, एका दशकाहून अधिक काळापासून पृथ्वीचा वेग मंदावला आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे २० व्या शतकात एका दिवसाची लांबी ०.३ ते १ मिलीसेकंद दरम्यान वाढली. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये, दिवसाची लांबी प्रति दशक १.३३ मिलीसेकंद वाढली आहे. ही वाढ २०व्या शतकातील वाढीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.”
शास्त्रज्ञांनीच केले आश्चर्य व्यक्त
‘वॉशिंग्टन पोस्ट’नुसार, काही शास्त्रज्ञांना या अभ्यासाने आश्चर्य वाटले नाही. टोरंटो विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड पेल्टियर यांनी एक दशकापूर्वीचा एक अभ्यास प्रकाशित केला होता; ज्यामध्ये असे म्हटले होते की, “ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या परिभ्रमणात बदल झाले आहेत.” आणखी एका अलीकडील अभ्यासातही हे दिसून आले आहे की हवामान बदलामुळे वेळेवर कसा परिणाम होतो.
परंतु, नवीन संशोधन दर्शविते की, हवामानातील बदलाचा प्रभाव पूर्वीपेक्षा वाढला आहे. हवमानाची स्थिती आणखी बिघडल्यास आणि ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढल्यास ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते. पृथ्वीचा वेग असाच मंद राहिल्यास दिवसाचा कालावधी आणखी वाढू शकतो. त्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाचे नियमही बदलू शकतात, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. संशोधकांनी यावर प्रकाश टाकला की, या बदलामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
बदलत्या वेळेचा तंत्रज्ञानावर परिणाम
शास्त्रज्ञांच्या टीमने असेही नमूद केले की, या अतिरिक्त सेकंदांचा तंत्रज्ञानावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. ‘जीपीएस’साठी अचूक टाइमकीपिंग अत्यावश्यक आहे. जीपीएसचा वापर स्मार्टफोन असणारा प्रत्येक व्यक्ती करतो. नेव्हिगेशन सिस्टमही यात महत्त्वाचे आह. याचा अंतराळ प्रवासावरही परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. ते म्हणाले की, स्पेसशिपशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना पृथ्वी गोलाकार फिरण्याचा अचूक वेग जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यात थोड्या बदलानेही अडचणी निर्माण होऊ शकतात.
हिमनद्यांचे वितळणे पृथ्वीसाठी धोकादायक
शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की, १९०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून जगभरातील अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. मानवी क्रियाकलापांमुळे ही आपत्तीजनक स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: औद्योगिक क्रांतीपासून कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू उत्सर्जनामुळे तापमानात वाढ झाली आहे आणि परिणामी हिमनद्या वेगाने वितळत आहेत; ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, येत्या काही दशकांमध्ये आपण उत्सर्जनावर उपाययोजना केल्या नाहीत तर २१०० च्या आधी जगातील एक तृतीयांश पेक्षा जास्त हिमनद्या वितळतील. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रदूषणाचे प्रमाण असेच राहिल्यास समुद्राची पातळी आणखी वाढेल. सह-लेखक अधिकारी यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “फक्त २०० वर्षांमध्ये आम्ही पृथ्वीच्या हवामान प्रणालीमध्ये इतका बदल केला आहे की, आम्ही पृथ्वीच्या फिरण्याच्या मार्गावर त्याचा प्रभाव पाहत आहोत.”
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे टीकाकार जेडी व्हॅन्स अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचे दावेदार; काय आहे भारताशी कनेक्शन?
वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होते, ज्यामुळे किनारपट्टीची धूप वाढते आणि मोठमोठी वादळे तयार होतात. त्यामुळे जगभरातील हवामान पद्धतींमध्येदेखील व्यत्यय निर्माण होतो आणि मत्स्यव्यवसायावरदेखील परिणाम होतो. आर्क्टिकमध्ये समुद्राचा बर्फ वितळल्याने वॉलरससारखे वन्यजीवांना त्यांचे निवासस्थान गमवावे लागते. ध्रुवीय अस्वल जमिनीवर अधिक वेळ घालवू लागले आहेत; ज्यामुळे लोक आणि अस्वल यांच्यातील संघर्षाचे प्रमाण वाढत चालले आहे.