What’s the best time to drink coffee : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरमा गरम चहाने करतात. तर काहीजणांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. एक कप कॉफी प्यायल्याने दिवसभर ताजेपणा राहतो. म्हणूनच कॉफी प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दररोज कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु, कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. दरम्यान, युरोपियन हार्ट जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, त्यापासून कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : केरळच्या मंदिरात शर्ट काढण्याची प्रथा कशी सुरू झाली?

कॉफी प्यायल्याने होतात आरोग्यदायी फायदे

अहवालानुसार, एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, दररोज सकाळी लवकर कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये उशिरा कॉफी पिणाऱ्या व्यक्तींपेक्षा अनेक आरोग्यदायी फायदे दिसून येतात. ४२ हजारांहून अधिक अमेरिकन प्रौढ व्यक्तींवर केलेला हा पहिलाच अभ्यास आहे. ज्यामध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे तसेच त्याचे नुकसान याबाबत सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. ब्रिटिश कॉफी असोसिएशनच्या मते, कॉफी हे जगातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. दररोज सुमारे दोन अब्जाहून अधिक व्यक्ती कॉफी पितात. नियमित कॉफी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, तर अतिसेवनामुळे नुकसान देखील होते.

कॉफी पिणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचा धोका कमी

‘कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि अमेरिकेतील प्रौढांमधील मृत्यू दर’ या शीर्षकाखाली युरोपियन हार्ट जर्नलमध्ये बुधवारी (८ जानेवारी) एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात असं नमूद करण्यात आलं की, सकाळी कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका १६ टक्क्यांनी कमी आहे. तसेच जे व्यक्ती सकाळी कॉफी पित नाहीत, त्या व्यक्तींपेक्षा नियमित कॉफी पिणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ३१ टक्के कमी आहे. परंतु, वैद्यकीय नोदींमध्ये असं दिसून आलं आहे की, दररोज कॉफी पिणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूदरात कॉफी न पिणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूदरापेक्षा कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही.

दररोज किती कप कॉफी प्यायला हवी?

अमेरिकेतील ट्युलेन विद्यापीठातील पोषण आणि आरोग्यतज्ज्ञ लू क्यू यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, “तुम्ही दररोज कॉफी पिता की नाही हे महत्वाचे नाही. तर तुम्ही कोणत्या वेळेत आणि किती प्रमाणात कॉफी पिता हे महत्वाचं आहे.” अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, दररोज सकाळी कॉफी पिणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूदराचं प्रमाण कमी आहे. सकाळी फक्त एक कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तीला जास्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींपेक्षा कमी आरोग्यदायी फायदे होतात, असंही अभ्यासातून समोर आलं आहे.

१९९९ ते २०१८ या कालावधीत अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ४० हजार २७५ प्रौढ व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि पुरुषांची दररोजची आहार पद्धती तसेच जीवशैलीवरअभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर अमेरिकेतील १ हजार ४६३ प्रौढ व्यक्तींच्या ७ दिवसांच्या आहाराबाबत नोंदीही घेण्यात आल्या.

हेही वाचा : Trump on Canada: कॅनडा अमेरिकेत विलीन होणार का? इतिहास काय सांगतो?

अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?

या अभ्यासात सकाळी कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा मृत्युदर कमी का झाला हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, इतर संशोधनातून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०१३ मध्ये ‘The Journal of Clinical Sleep and Medicine’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं म्हटलं होतं की, झोपण्याच्या ६ तास आधी कॉफी घेतल्यास त्यामध्ये असलेले कॅफीन झोपेवर परिणाम करतात. ज्यामुळे हृदयावर आणि एकूण आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

२०२३ मध्ये ‘Sleep Medicine Reviews’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास असे आढळून आले की, झोपेच्या ८ तास आधी कॉफी प्यायल्याने त्यातील कॅफिनमुळे झोपेचा वेळ ४५ मिनिटांनी कमी होतो. त्याचबरोबर अंथरुणावर घालवलेल्या एकूण वेळेचे प्रमाण ७ टक्याने कमी होते. तसेच झोप येण्यासाठी लागणारा वेळ जवळपास ९ मिनिटांनी वाढतो. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

कॉफीमध्ये जैविक दृष्ट्या महत्त्वाचे इतर शेकडो संयुगे देखील असतात. यामुळे कॉफीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला दररोज सकाळी आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तातील जळजळ वाढवणारे काही पदार्थ अनेकदा अंगावर सूज निर्माण करतात. सकाळी नियमित कॉफीचे सेवन केल्याने त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. अभ्यासाबरोबरच प्रा. थॉमस एफ. ल्युशर यांनी कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे देखील समजून सांगितले आहेत. “कॉफी फक्त सकाळीच प्यायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coffee drinking benefits drink your coffee but only in the morning what a new study says sdp