प्राचीन भारतीय इतिहासाचे व्यापक दर्शन घडविणारी संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. ही संस्कृती हडप्पा, सरस्वती या नावांनीदेखील ओळखली जाते. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर या संस्कृतीचे आद्य पुरावे देणारी हडप्पा आणि मोहेंजोदारो हीप्राचीन स्थळे पाकिस्तानमध्ये गेली. या स्थळांचा शोध १९२१-२२ साली ब्रिटिशकालीन भारतात लागला होता. हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन्ही स्थळांची गणना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये होते. आज पुन्हा एकदा यातील मोहेंजोदारो हे नाव चर्चेत आले आहे. तब्बल ९३ वर्षांनी या स्थळावरील एका स्तूपातून तांब्याच्या नाण्यांनी भरलेले भांडे सापडले. मोहेंजोदारो या नावाचा अर्थ ‘मृतांचा डोंगर’ असे आहे. हे प्राचीन सिंधू संस्कृतीचे शहर असून, हे शहर इसवी सन पूर्व २६०० ते १९०० या कालखंडात विकसित झाले होते. मोहेंजोदारो या विशाल शहराचे अवशेष सिंधू खोऱ्यात आहेत. मोहेंजोदारो ही दक्षिण आशियातील महत्त्वाची नगर रचना मानली जाते. हे शहर आपल्या तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या ५००० वर्षे जुन्या शहरातून तांब्याच्या नाण्यांनी भरलेल्या भांड्याच्या शोधाचे मूल्यमापन तज्ज्ञांनी ‘९३ वर्षांनंतर उघडकीस आलेली महत्त्वपूर्ण कलाकृती’ म्हणून केला आहे. मूलतः हे भांडे या शहरात असलेल्या पुरातन स्तूपाच्या अवषेशातून  सापडले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाण्यांचा हंडा कसा सापडला?

या नाण्यांचा हंडा मिळाल्याची पुष्टी डॉ. सय्यद शाकीर शाह (मोहेंजोदारोच्या पुरातत्व संशोधनाचे संचालक) यांनी केली. शाह सांगतात, मजुरांनी उत्खननादरम्यान नाण्यांचे भांडे मिळाले होते परंतु ते त्यांनी पुन्हा पुरले. त्यानंतर काहींनी पुराभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर खोदून ते पुन्हा बाहेर काढण्यात आले. यासाठी टीमने तीन तास अविरत काम सुरु ठेवले. आणि ज्या भांड्यात नाणी होती ते भांडे सुखरूप बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे साडेपाच किलोग्रॅम वजनाचे नाण्यांनी भरलेले भांडे नंतर घटनास्थळावरील माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाला होते ख्रिश्चन धर्माविषयी कुतूहल! त्याचा भारतीय कलापरंपरेवर काय परिणाम झाला?

या ठिकाणी संशोधनात गुंतलेले शेख जावेद सिंधी म्हणाले, यापूर्वी १९२२ ते १९३१ या काळात आर.डी. बॅनर्जी, सर जॉन मार्शल आणि मॅके यांना तब्बल ४,३४८ तांब्याची नाणी उत्खननात सापडली. ही नाणी इसवी सन दुसऱ्या ते पाचव्या शतकातील असून कुशाण साम्राज्याशी संबंधित होती. “सध्याचा शोध तब्बल ९३ वर्षांनंतर लागलेला असून म्हणूनच तो उल्लेखनीय आहे आणि त्याचे श्रेय मोहेंजोदारो टीमला जाते,” असे ते म्हणाले. शाकीर शाह यांनी आता मिळालेली नाणी कुशाण कालखंडातील असावीत असे पत्रकारांना सांगितले. “सध्या नाणी प्रयोगशाळेत हलवली असली तरी आम्ही नाण्यांवरील लेखांवरून ती कोणत्या कालखंडातील असावीत हे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल. ही नाणी कुशाण कालखंडातील आहेत असा प्राथमिक अंदाज असून नेमक्या कोणत्या राजाच्या राजवटीतील आहेत ते मात्र शोधावे लागेल,” असेही ते म्हणाले. प्रयोगशाळेचे प्रभारी रुस्तम भुट्टो यांनी, सध्या ही नाणी एकमेकांना चिकटलेली आहेत, ती वेगळी करण्यासाठी त्याचप्रमाणे नाण्यांवरील आकृत्या तसेच भाषा दृश्यमान होण्यासाठी किमान एक महिना लागेल, असे नमूद केले. 

यापूर्वी सापडलेली नाणी 

अली हैदर गढी, हे ज्येष्ठ संरक्षक-संवर्धक आहेत, यांनी सांगितले की, बॅनर्जी यांनी सुमारे २००० नाणी शोधून काढली होती, त्यापैकी ३३८ नाणी कुशाण शासक वासुदेव पहिला याच्या काळातील होती, या नाण्यांच्या समोरील बाजूला  राजघराण्यातील व्यक्तीची प्रतिमा असून मागच्या बाजूस शिवाची प्रतिमा आहे. याशिवाय यूएन असं कोरलेली १८२३ कास्ट कॉपर नाणी  आहेत. तर इतर नऊ जणांच्या समोरच्या बाजूला अग्नीवेदी आणि उलट्या बाजूला एक ठाशीव पण ढोबळ आकृती आहे,” असे त्यांनी नमूद केले. नंतरच्या संशोधनात सिंधू संस्कृती आणि कुशाण कालखंड यांच्यादरम्यान या स्थळावर कोणत्याही प्रकारची संस्कृती नव्हती असे उघडकीस आले, यामागे मुख्य कारण पूर हे होते. परंतु मोहेंजोदारो बाबतीत त्याच्या उंच स्थानामुळे ही जागा पूर्णतः निर्मनुष्य झाली नसावी, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा: तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

कुशाणांचे अस्तित्व साधारण पहिल्या शतकापासून ते तिसऱ्या शतकापर्यंत होते, त्यांनी व्यापार, मुत्सद्दीपणा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याद्वारे विविध प्रदेशांना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.पहिला कुशाण शासक कुजुला कडफिसेस होता, कुजुला कडफिसेसने मध्य अफगाणिस्तानातील शेवटच्या इंडो-ग्रीक शासकांच्या नाण्यांचे अनुकरण करणे सुरूच ठेवले होते, असे अंकीय पुरावे दाखवतात.

कुजुला कडफिसेसने पाडलेली तांब्याची नाणी रोमन सम्राट ऑगस्टसच्या (इसवी सनपूर्व ३१ – इसवी सन १४) सोन्याच्या नाण्यांवरील रॉयल पोर्ट्रेटची प्रतिकृती होती. या नाण्यांमध्ये बसलेल्या रोमन सम्राटाची जागा कुशाण शासकाने घेतली, ज्याचा संदर्भ ग्रीक आणि खरोष्टी दंतकथांमध्ये देखील सापडतो. जसजसे कुशाण वायव्य भारतात पुढे जात होते, तसतसे कुजुला कडफिसेसने शक आणि पार्थियन शासकांच्या नाण्यांवर असलेले “महान राजा, राजांचा राजा” ही पदवी स्वीकारली. रबाटक (Rabatak) आणि सुर्ख कोटल (Surkh Kotal) येथील नाणी आणि शिलालेखांवरून दिसून येते की, कुशाणांनी इराणी धार्मिक श्रद्धा आणि प्रथा जपल्या होत्या, तर इतर शिलालेखांवरून असे दिसून येते की कनिष्क आणि त्याच्या उत्तराधिकार्‍यांनी बौद्ध धर्माला संरक्षण दिले होते. पूर्वी सापडलेल्या नाण्यांवरील अग्निवेदीवर इराणी प्रभाव आहे.

त्यामुळेच (स्तूपात सापडलेली) नव्याने उघडकीस आलेली नाणी देखील कुशाण कालखंडातीलच असावीत असा तर्क प्रथमदर्शनी अभ्यासक मांडत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coins pot found at mohenjodaro after 93 years svs
Show comments