केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १२ जुलै रोजी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मरणार्थी नाणे जारी केले. “कलाईगनर डॉ. एम. करुणानिधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टकसालमध्ये शंभर रुपयांचे नाणे तयार केले जाईल,” असे वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. किती नाणी तयार केली जातील किंवा ही नाणी मोठ्या प्रमाणावर चलनात असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. स्मरणार्थी नाणी का जारी केली जातात? स्मरणार्थी नाणी प्रसिद्धीचे सर्वात प्रभावी माध्यम का मानले जाते? त्यांचे महत्त्व काय? जाणून घेऊ या.

स्मरणार्थी नाणी म्हणजे काय?

नावाप्रमाणेच एखाद्या विशिष्ट घटनेच्या स्मरणार्थ, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सन्मानार्थ किंवा एखाद्या विशिष्ट संदेशासाठी स्मरणार्थी नाणी जारी केली जातात. या नाण्यांवर विशिष्ट प्रकारची रचना असते, जी त्या-त्या प्रसंगाचा संदर्भ देते. ही नाणी नेहमीच्या नाण्यांपेक्षा पुर्णपणे वेगळी असतात. स्मरणार्थी नाणी बहुधा फारच कमी प्रमाणात जारी केली जातात. काही नाणी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) द्वारे संग्रहित केलेल्या वस्तू म्हणूनदेखील ठेवली जातात. काहीवेळा, ही नाणी मोठ्या प्रमाणात चलनातही आणली जातात. या सर्व बाबी, हे विशिष्ट नाणे जारी करण्यामागील केंद्राच्या हेतूवर अवलंबून असतात.

हेही वाचा : Frozen Future मृ्त्यूनंतर शरीर गोठवण्याचा ट्रेण्ड अब्जाधीशांमध्ये का रूढ होतोय? खरंच माणूस परत जिवंत होणार?

स्मरणार्थी नाणी जारी करण्यामागचा उद्देश काय?

प्राचीन काळापासून, नाण्यांचा उपयोग राज्यकर्त्यांचा संदेश प्रसारित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा पुढे नेण्यासाठी आणि अनेकदा प्रसिद्धीसाठी केला गेला आहे. फिलॉलॉजिस्ट थॉमस आर मार्टिन यांनी असे सांगितले आहे की, नाण्यांची गतिशीलता आणि त्यांचे टिकाऊ स्वरूप या नाण्यांना प्रसिद्धीच्या सर्वात प्रभावी साधनांपैकी एक करते. (“सुल्ला इम्पेरेटर इटेरम: सामनाइट्स अँड रोमन रिपब्लिकन कॉइन प्रोपगंडा”, १९८९).

स्मरणार्थी नाण्यांमुळे एखाद्या विशिष्ट थीम किंवा मुद्द्याला प्रसिद्धी मिळते; ज्यावर सरकारला विशेष भर द्यायचा असतो. उदाहरणार्थ, १९७४ मध्ये इंदिरा गांधी सरकारने ‘कुटुंब नियोजन’ ही थीम असलेले नाणे जारी केले होते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचा हा त्यांच्या सरकारद्वारे करण्यात आलेला एक प्रयत्न होता. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सन्मानार्थही नाणी जारी केली जातात. जसे की, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर भारतातील पहिले स्मरणार्थी नाणे १९६४ मध्ये जारी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे १९६९ मध्ये सरकारने महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी करणारी नाणी जारी करण्यास सुरुवात केली होती.

रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, लाल बहादूर शास्त्री, लाला लजपत राय, श्यामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यासह अनेक भारतीय दिग्गजांच्या सन्मानार्थ स्मरणार्थी नाणी जारी करण्यात आली आहेत. २०१७ मध्ये, सरकारने दिवंगत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते एम. जी. रामचंद्रन आणि दिवंगत कर्नाटक संगीत वादक एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या सन्मानार्थ स्मरणार्थी नाणी जारी केली होती. काही नाणी संस्था (जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड) किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी (जसे की भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त) जारी केली जातात.

स्मरणार्थी नाणी कोण जारी करतात?

कोणतेही भारतीय चलन छापण्याचा किंवा चलनात आणण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे, जी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्यामुळे स्मरणार्थी नाणे जारी करायचे की नाही याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयच घेतो. परंतु, राज्य सरकारे, सरकारी सांस्कृतिक संस्था किंवा अगदी खाजगी संस्था सरकारला स्मरणार्थी नाणी जारी करण्याची विनंती करू शकतात. उदाहरणार्थ, सुब्बलक्ष्मी यांचे नाणे जारी करण्यासाठी श्री.षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने विनंती केली होती. करुणानिधींच्या स्मरणार्थी नाण्यांसाठी तामिळनाडू सरकारकडून गेल्या वर्षी विनंती करण्यात आली होती.

कोण होते करुणानिधी? त्यांच्या सन्मानार्थ जारी केलेल्या नाण्याची वैशिष्ट्ये कोणती?

मुथुवेल करुणानिधी (जून ३, १९२४ ते ७ ऑगस्ट २०१८) हे एक लेखक आणि राजकारणी होते. त्यांनी १९६९ ते २०११ या कालावधीत सुमारे दोन दशके तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांना कलाईगनर म्हटले जाते. ते द्रविड चळवळीतील वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. करुणानिधी यांनी डीएमके पक्षाचे नेतृत्व केले. आता त्यांचा मुलगा स्टॅलिन या पक्षाचे नेतृत्त्व करत असून तामिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून सत्तेत आहेत.

हेही वाचा : जपानमध्ये चक्क हसण्यासाठी कायदा? काय आहे कारण?

मुथुवेल करुणानिधी यांच्या सन्मानार्थ जारी करण्यात आलेल्या १०० रुपयांच्या नाण्याचे वजन जवळ जवळ ३५ ग्रॅम असेल, हे नाणे ४४ मिलिमीटर गोल असेल. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त अशा मिश्रधातूंनी तयार केले जाईल. त्याच्या दुसर्‍या बाजूस करुणानिधींचे पोर्ट्रेट कोरले असेल आणि त्याच्याच खाली करुणानिधी यांची स्वाक्षरी असेल. नाण्याच्या उजव्या बाजूस इंग्रजीमध्ये ‘कलैगनर एम. करुणानिधी यांची जन्मशताब्दी’ असे कोरलेले असेल; ज्याच्या तळाशी ‘१९२४ ते २०२४’ असे लिहिलेले असेल.