सध्या जगभरात कॉन्सर्टचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढले आहेत. अनेक कॉन्सर्टमध्ये मद्यपान आणि अमली पदार्थ याचे सेवन करून लोक येतात असे सांगितले जाते. त्यामुळे कॉन्सर्ट आयोजकांना पूर्व संदेश दिले जातात आणि त्याचे पालन न केल्यास कारवाईही केली जाते. अशाच एका प्रकरणामुळे मलेशियाने एका राज्यात कॉन्सर्टला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना लघवीची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सुबांग जया शहरात एका कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहिल्यानंतर चार लोकांचा मृत्यू झाला आणि इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर मलेशियातील सेलांगॉर राज्याने हा प्रस्ताव दिला. पण, नेमके प्रकरण काय? कॉन्सर्टला जाणाऱ्यांना लघवी चाचणीची अट घालण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रकरण काय?
द इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका कॉन्सर्टमध्ये झालेल्या दुःखद घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुबांग जया येथील पिंकफिश कॉन्सर्टमध्ये सुरुवातीला सात जण बेशुद्ध पडले आणि त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. या व्यक्तींनी कॉन्सर्टमध्ये एक्स्टसीच्या गोळ्या घेतल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. सीएनएच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये लोक कॉन्सर्टमध्ये बेशुद्ध पडताना आणि त्यांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे. २० ते ४० या वयोगटातील दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सेलंगॉरचे पोलिस प्रमुख हुसेन उमर खान यांनी सांगितले की, या सर्वांनी एक्स्टसीच्या गोळ्या घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. हुसेन म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, या कॉन्सर्टमध्ये ड्रग विकणाऱ्या व्यक्ती होत्या, आम्ही या ड्रग विक्रेत्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहोत.” पोलिसांनी सांगितले की, त्यांना अंतिम टॉक्सिकॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बेशुद्ध झालेल्यांपैकी दोन जण रुग्णालयात अतिदक्षता विभागात आहेत तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा : १६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
काय आहे एक्स्टसी?
यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (डीईए) नुसार, एक्स्टसी हे उत्तेजक आणि हॅलुसिनोजेन आहे. याला मोठ्या प्रमाणावर पार्टी ड्रग म्हणून ओळखले जाते, त्याला एमडीएमए आणि मॉलीदेखील म्हणतात. याचे गोळी किंवा पावडर स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. याचा एक ‘उत्साही’ प्रभाव असल्याचे मानले जाते. याच्या सेवनाने वेळ आणि समज या संकल्पनेत अडथळा निर्माण होतो, यामुळे हृदय गती आणि रक्तदाब वाढू शकते. यामुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि मळमळ, घाम येणे आणि उत्साह आदी समस्या वाढू शकतात. एखाद्याला खूप थंडी वाजून येणे आणि अंधूक दिसणे तसेच चिंता, नैराश्य जाणवू शकते. त्यामुळे निर्जलीकरण, झोपेच्या समस्या आणि या ड्रगची लालसा यांसारखे सामान्य दुष्परिणाम दिसून येतात.
डीईए म्हणते की, एमडीएमएच्या ओव्हरडोजमुळे तापमान नियंत्रित करण्याच्या शरीराच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. कधीकधी शरीराच्या तापमानात ‘तीव्र वाढ’ होऊ शकते (हायपरथर्मिया). यामुळे यकृत, मूत्रपिंड किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली निकामी होणे, मेंदूला सूज येणे आणि मृत्यूदेखील होऊ शकतो. अधिकारी हे ड्रग्ज कॉन्सर्ट किंवा कार्यक्रमाच्या आधी मिळाले होते की नाही त्याचा तपास करत आहेत. त्यांनी या संदर्भात कॉन्सर्ट आयोजकांची तपासणी करत असल्याचे सांगितले.
‘युरिन टेस्ट’च्या आदेशामागील कारण काय?
अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कॉन्सर्टमध्ये जाणाऱ्यांची लघवी चाचणी करण्याच्या कल्पनेला मान्यता देत असल्याचे सरकारने म्हटले आहे. “आम्हाला एसओपी मजबूत करायची आहे आणि पोलिस व स्थानिक प्राधिकरणांबरोबर काय सहकार्य केले जाऊ शकते ते पाहायचे आहे; कारण जेव्हा परवाने दिले जातात तेव्हा आम्ही आयोजकांनी विशेषत: ड्रग्सची पूर्णपणे तपासणी केली पाहिजे हे सुनिश्चित करू इच्छितो,” असे स्थानिक सरकार आणि पर्यटन समितीचे अध्यक्ष दाटुक एनजी सुई लिम यांनी सांगितले. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सेलँगोर राज्यातील सर्व कॉन्सर्टचे परवाने आधीच तात्पुरते निलंबित केले आहेत. कॉन्सर्ट आयोजकांचे म्हणणे आहे की, १०० पोलिस अधिकारी, K9 युनिट्स आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सर्व योग्य सुरक्षा उपाय तैनात करण्यात आले आहेत. पिंकफिश कॉन्सर्टमध्ये सुमारे १६,००० लोक उपस्थित होते. “आजूबाजूच्या समुदायाची सुरक्षा हे आमच्या कर्मचाऱ्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि मृतांच्या कुटुंबासह प्रभावित झालेल्यांना आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आम्ही संबंधित एजन्सीसह जवळून काम करत आहोत,” असे आयोजकांनी एका पत्रात लिहिले आहे.
या निर्णयावर आयोजक आणि लोकांची प्रतिक्रिया काय?
प्रस्तावाचा आयोजक आणि कॉन्सर्टमधील लोकांना जोरदार धक्का बसला आहे. द स्टारशी बोलताना, शिराज प्रोजेक्ट्सचे कार्यकारी निर्माता शिराझदीन अब्दुल करीम यांनी ही कल्पना ‘अवास्तव’ असल्याचे म्हटले आहे. शिराझदीन यांनी कॅनेडियन बँड सिंपल प्लॅन आणि ब्रिटीश गायक ब्रुनो मेजर यांना मलेशियामध्ये आणले होते. “ड्रगचा वापर बहुतांशी डीजे शोमध्ये कायम असतो, त्यामुळे तेथे अधिक कठोर प्रक्रिया लागू केल्या जाऊ शकतात,” असे ते म्हणाले. लिव्हस्केप ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इक्बाल अमीर यांनी शिराझदीनच्या मताला दुजोरा दिला. “हा चाचणी खर्च कोण उचलणार आहे? ते पोलिस असतील की आयोजक?,” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
हेही वाचा : रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील झालेल्या माया आणि लेआ टाटा कोण आहेत?
“मला वाटते, कॉन्सर्टमधील सध्याच्या सुरक्षा तपासण्या पुरेशा आहेत. खरं तर, आधीच या तपासण्यांसाठी उस्थितांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अधिक तपासण्यांचा सहभाग यात करण्यात आला तरी ड्रगचा प्रश्न सुटणार नाही,” असेही ते पुढे म्हणाले. नेहमी कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारी कॅथरीन वोंग हिने चिंता व्यक्त केली. “आम्हाला कॉन्सर्टपूर्वी लवकर रांगेत उभे राहणे आवश्यक आहे. आम्हाला स्क्रीनिंगसाठी किती लवकर पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही आमचे निकाल किती लवकर मिळवू शकतो?,” असा प्रश्न तिने विचारला. “शौचालयांमध्येही लांबच लांब रांगा असतील,” असेही ती पुढे म्हणाली. ग्राफिक डिझायनर सॅम्युअल पांग यांनी म्हटले की, “काही चुकीच्या व्यक्तींच्या कृतीमुळे अशा कंटाळवाण्या आणि अव्यवहार्य प्रक्रियेतून जाणे आमच्यासाठी अयोग्य आहे.”