अकबर आणि औरंगजेब हे दोघेही प्रसिद्ध मुघल शासक होते. इतिहासात अनेक कारणांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे त्यांनी केलेले धार्मिक राजकारण. भारताच्या इतिहासात धर्मनिरपेक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला अकबर हा पाकिस्तानच्या इतिहासात त्याच धर्मनिरपेक्षतेसाठी बदनाम आहे. तर याउलट औरंगजेब हा त्याच्या धार्मिक कट्टरतेसाठी प्रसिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या पायाभरणीत इतिहास का महत्त्वाचा?

एखाद्या देशाच्या पायाभरणीत इतिहास हा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. भारत व पाकिस्तान यांसारख्या देशांच्या बाबतीत इतिहास अधिक महत्त्वाचा मानला जातो. या दोन्ही देशांचा फाळणीपूर्वीचा इतिहास समान आहे. परंतु या दोन्ही देशांची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आहे. त्यामुळेच समान असलेल्या इतिहासाचे आकलन परस्परविरोधी झाल्याचे दिसते. हेच परस्परविरोधी आकलन समजून घेण्यासाठी अकबर व औरंगजेब या दोन मुघल शासकांचे उदाहरण उत्तम ठरू शकते. भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये अकबराला नेहमीच न्यायी- सहिष्णू राजा म्हणून दर्शविण्यात येते. इतिहासात लोकप्रिय, जनतेवर विश्वास ठेवणारा अशी प्रतिमा अकबराविषयी आढळते व त्याच वेळी त्याचा नातू औरंगजेब (अकबर पणजोबा) हा मुघल साम्राज्याच्या नाशासाठी कारणीभूत ठरला असे नमूद केले जाते. हे वर्णन भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये असले तरी पाकिस्तानमध्ये मात्र औरंगजेबला आदर्श मुस्लिम शासक म्हणून पूजले जाते. त्याच बरोबरीने पाकिस्तानच्या इतिहासात अकबराची एक विजेता आणि प्रशासक म्हणून त्याच्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली जात असली तरी त्याच वेळी त्याच्या धार्मिक धोरणांसाठी त्याचा तीव्र निषेध केला जातो.

पाकिस्तानी इतिहासकार मुबारक अली यांनी त्यांच्या ‘अकबर इन पाकिस्तानी टेक्स्टबुक्स (१९९२)’ (Ali, Mubarak. “Akbar in Pakistani Textbooks.” Social Scientist 20, no. 9/10 (1992): 73–76) या संशोधन प्रबंधामध्ये ‘अकबराने तयार केलेल्या मुस्लिमांच्या (धर्मनिरपेक्ष) वेगळ्या प्रतिमेमुळे आज मुस्लिम आणि हिंदू हे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये व विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये एकत्र आले, अशी टीका अकबरावर करण्यात येते’ असे मत नोंदविले आहे. म्हणजेच ‘ए हिस्ट्री ऑफ स्टेट अ‍ॅण्ड रिलिजन इन इंडिया (२०१३)’ (A History of State and Religion in India (Routledge Studies in South Asian History) या पुस्तकात इतिहासकार इयान कॉपलँड नमूद करतात की “अशा प्रकारचा भारत आणि पाकिस्तानसारखा दुहेरी दृष्टिकोन खरंतर क्लिष्ट गोष्टींना सोपे करतो. मुघल राजवटीत दक्षिण आशियाई लोकांच्या जीवनात धर्माने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचीच परिणीती ही आजच्या राजकारणावर दिसत आहे. हे आजचे राजकारण समजून घेण्यासाठी, आजच्या भारताच्या राजकारणात अकबराला निर्दोष ठरविले जाते तर औरंगजेबावर वारंवार टीका केली केली जाते, तर पाकिस्तानमध्ये या उलट घडते, असे का घडते हे आधी समजावून घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !

अकबराचा धर्म

इतिहासकार अकबराला धर्मनिरपेक्ष मानतात, त्याच्या या दृष्टीकोनाची पाळेमुळे १२ व्या शतकात होवून गेलेले गूढवादी विचारवंत सूफी इब्न अरबी यांनी मांडलेल्या संकल्पनेत आहे. या संकल्पनेनुसार राजा हा प्रजेशी विशिष्ट सामाजिक करारानुसार बांधला गेलेला असतो. त्यामुळे प्रजेला कुठल्याही धर्माचे पालन करण्याचा अधिकार असतो. कारण सर्व धर्म हे देवाकडे जाण्याचाच मार्ग आहेत. या तत्त्वज्ञानामुळेच, अकबर सर्व धार्मिक श्रद्धांचा आदर करणारा म्हणून ओळखला जात होता, त्याने या आपल्या विचारांचे धोरणात्मक रूपात परिवर्तन केले होते व राज्यात अमलात आणले. १५६४ साली, तो फक्त २२ वर्षांचा होता, तेव्हा अकबराने हिंदूंविरूद्ध सामान्य, दंडात्मक जिझिया कर रद्द केला, तसेच त्याने गायींच्या कत्तलीवरही बंदी घातली. वेद, महाभारत आणि रामायण यांचे पर्शियन भाषेत भाषांतर करण्याचे आदेश दिले आणि सुन्नी धर्मगुरूंच्या तिरस्कारामुळे शिया लोकांना दरबारात नमाज पाडण्याची परवानगी दिली. तो एक धार्मिक मुसलमान असूनही गंगाजल पिण्यासाठी ओळखला जात होता. तसेच राजपूत कुटुंबात लग्न करणारा तो पहिला मुघल शासक होता. अकबराची धार्मिक अनुज्ञेयता इतकी क्रांतिकारी होती की, त्याच्या आयुष्याच्या अखेरीस हिंदूंनी त्याला कट्टर मुस्लिम मानले आणि मुस्लिमांनी त्याला हिंदू धर्मांतरित मानले.

अकबराची प्राथमिक कालखंडातील विचारसरणी

इतिहासाच्या सुरुवातीच्या कालखंडात अकबराने चित्तौडगडच्या वेढ्यानंतर स्थानिकांच्या- हिंदूंच्या कत्तलींचे आदेश दिले होते. या काळात त्याला आपले मुस्लिम असल्याचे वेगळेपण सिद्ध करायचे होते, असे मत इतिहासकार पार्वती शर्मा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले. कालांतराने अकबर हा संयमी झाला व राज्यात त्याने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. दिवंगत विद्वान नाझिद अहमद यांनी इस्लामच्या विश्वकोशात अकबर हा कोणत्याही एका गटाचा नव्हता, इस्लामचे आशिया खंडात शुद्ध प्रतिनिधित्त्व करत होता, असे नमूद केले आहे.

औरंगजेबाचा धर्म

औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांवर इतिहासकारांमध्ये नेहमीच जोरदार चर्चा होते. इतिहासकार जदुनाथ सरकार यांसारखे काही अभ्यासक त्याला कट्टर धर्मांध मानतात, तर शिबली नौमानी सारखे काही अभ्यासक त्याचा हेतू धार्मिक नसून राजकीय होता असा युक्तिवाद करतात. उदाहरणार्थ जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाचा लघु इतिहास (A Short History of AURANGZIB) या पुस्तकात औरंगजेब ‘दार-उल-इस्लाम’ म्हणजे भारतात एक संपूर्ण इस्लामिक राज्य स्थापन करू इच्छित होता, ज्यामध्ये त्याला सर्व विरोधकांना फाशीची शिक्षा द्यायची होती, असे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, नौमानी त्यांच्या ‘औरंगजेब आलमगीर पर एक नजर’ या पुस्तकात नमूद करतात की “औरंगजेबाचा इस्लामसाठीचा आवेश संतापेक्षा राजकारणी होता ”. तथापि, औरंगजेबाची स्वतःची इस्लामवर असणारी भक्ती, बंगाली कवी मलय रॉय चौधरी यांनी हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल एका व्यापक शोधनिबंधात नमूद केली आहे. १६५९ सालामध्ये औरंगजेबाच्या दुसऱ्या राज्याभिषेकानंतर, औरंगजेबाने मुस्लिम धर्माच्या अनुषंगाने मद्यपान, जुगार आणि वेश्याव्यवसाय यांसारख्या प्रथांना मनाई करण्याचे आदेश जारी केले. त्याने इस्लामिक कायद्याने अधिकृत नसलेले अनेक कर रद्द केले आणि गमावलेल्या महसुलाची भरपाई करण्यासाठी बिगर मुस्लिमांवर पुन्हा जिझिया कर लागू केला.

आणखी वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?

औरंगबजेबाच्या कट्टरतेची मुळे त्याच्याच घरात

औरंगजेबाच्या कट्टरतेचे काही अंश त्याच्या संगोपनातून आणि सत्तेच्या गुंतागुंतीच्या वाढीवरून स्पष्ट केले जाऊ शकतात. शाहजहानच्या कारकिर्दीत, औरंगजेब आणि त्याचे तीन भाऊ, विशेषत: दारा शुकोह यांच्यात सत्तेसाठी प्रदीर्घ संघर्ष झाला. मुस्लिम आणि हिंदू यांच्यात सामंजस्यासाठी सार्वजनिकरित्या वकिली करणारा दारा हा सत्तेचा वारस होता, ज्याला त्याच्या वडिलांनी सिंहासनावर बसण्यास अनुकूलता दर्शविली होती. वारसाहक्क हडपण्यासाठी, औरंगजेबाने आपल्या भावांशी जोरदार लढाई केली, अखेरीस औरंगजेबाने आपल्या तीनही भावांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि वडिलांना सात वर्षे तुरुंगात बंद केले. इतिहासकार कॉपलँड यांच्या म्हणण्यानुसार, या क्रूर घटनांमुळे औरंगजेबच्या राजवटीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, त्यामुळेच त्याने सत्ता टिकवून ठेवण्याकरिता उलेमांचे समर्थन मिळविण्याकरिता धार्मिक धोरणे लागू करण्यास सुरूवात केली. इतर काही अभ्यासकांच्या मते औरंगजेबाचे धार्मिक वागणे हे स्वतःला दारा शुकोहपासून वेगळे दाखविण्याची सोय होती, जी आपल्याला त्याच्या राजकारणातही दिसून येते.

हिंदू मंदिरांची तोडफोड

औरंगजेबाच्या राजवटीच्या तथ्यात्मक पैलूंवरही इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे. लोकप्रिय समजुतीनुसार, औरंगजेबच्या कारकिर्दीत १८ व्या शतकात अनेक हिंदू मंदिरे नष्ट झाली. काही अभ्यासकांच्या मते या काळात फक्त काही डझनभर मंदिरे नष्ट झाली, त्यातील मोजकीच मंदिरे औरंगजेबाने पाडली. इतिहासकार कोपलँड यांनी नमूद केल्याप्रमाणे औरंगजेबाने ज्या मंदिरांचा नाश केला त्यापेक्षा जास्त मंदिरे बांधली. याव्यतिरिक्त, काही अभ्यासकांनी असा दावा केला आहे की या काळात हिंदूंना अधिकृत सेवेपासून प्रतिबंधित करण्यात आले होते, तर इतर अभ्यासक औरंगजेबाच्या अंतर्गत इतर कोणत्याही मुघल सम्राटांपेक्षा जास्त हिंदू अधिकारी होते असे नमूद करतात. औरंगजेबाचे दरबारी इतिहासकार, खाफी खान आणि साकी खान यांनी लिहिलेला इतिहास लक्षात घेता, भारत व पाकिस्तान यांच्यातील या परस्परविरोधी मतांचे निश्चितपणे निराकरण होण्याची शक्यता नाही. हे दोन्ही स्रोत औरंगजेबच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी लिहिण्यात आले होते, त्यामुळे यात अनेक चुका आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधील अकबर आणि औरंगजेब समजून घेणे

जोधा अकबरसारख्या लोकप्रिय चित्रपटांनी अकबर आणि त्याची हिंदू पत्नी यांच्यातील प्रेमाचा उत्सव साजरा करून भारतीय इतिहासात अकबरला न्यायी आणि सहिष्णू मुस्लिम नेत्याचे स्थान दिले. याउलट, औरंगजेबाला गैर-मुस्लिमांवरील कथित क्रूरता, आधुनिक काळातील जिहादींवर त्याचा प्रभाव आणि ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा पायंडा पाडणाऱ्या मुघल साम्राज्याच्या पतनात त्याची भूमिका यासाठी दोषी धरले जाते. औरंगजेब आणि मोठ्या मुघल साम्राज्याचे हे चित्रण ब्रिटिशांनी वसाहतवादी शासनाच्या सुरुवातीच्या काळात मांडले होते. अलेक्झांडर डाऊ (स्कॉटिश प्राच्यविद्यावादी आणि लेखक) यांनी त्यांच्या १७७२ सालच्या ‘द हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान’ या पुस्तकात लिहिले आहे की, “मुस्लिम शासक हे क्रूरतेसाठी ओळखले जात होते. भारतावर ब्रिटिशांची सत्ता लादणे हा त्यावरचा उपाय आहे असे वसाहतवादी काळातील विचारवंतांना वाटत होते. मात्र भारतीय राष्ट्रवादी नेत्यांना हा उपाय अमान्य होता.”

जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात औरंगजेबचे वर्णन एक “धर्मांध आणि कठोर प्युरिटन” म्हणून केले आहे, ज्याने “भारतीय शासकापेक्षा मुस्लिम म्हणून अधिक कार्य केले”. ७० वर्षांहून अधिक काळ उलटूनही हे चित्र बदललेले नाही. २०२० मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे एका कार्यक्रमात औरंगजेबच्या “अत्याचार” आणि “धर्मांध” वृत्तीबद्दल त्यांच्या भाषणात कठोर टीका केली. एप्रिल २०२२ मध्ये, शीख गुरू तेग बहादूर यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान मोदी म्हणाले शीख गुरू “औरंगजेबच्या अत्याचारी विचारसरणीसमोर पहाडासारखे” उभे राहिले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने औरंगजेबाच्या आदेशानुसार गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला, असे मत व्यक्त केले होते.

आणखी वाचा : विश्लेषण: मोहम्मद बिन तुघलकला ‘लहरी मोहम्मद’ का म्हणायचे? जितेंद्र आव्हाडांनी थेट नोटबंदीच्या निर्णयाशी त्याचा संबंध का लावलाय?

पाकिस्तानमध्ये, औरंगजेब हा एक आदर्श मुस्लिम नेत्याचा अवतार मानला जातो, ज्याने इस्लामिक विचारसरणीचे व नैतिकतेचे धोरण सामाजिक स्तरावर रुजविण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील प्रसिद्ध वकील अल्लामा इक्बाल यांनी औरंगजेब याचा “भारतातील मुस्लिम राष्ट्रीयतेचे संस्थापक” म्हणून गौरव केला आहे. तर प्रसिद्ध पाकिस्तानी राजकारणी मौलाना अबुल अला मौदुदी यांनी औरंगजेबाच्या इस्लामशी असलेल्या बांधिलकीबद्दल प्रशंसा केली आहे तसेच पाकिस्तानच्या राजकीय भविष्याचा मार्ग मोकळा करण्यासाठीचे श्रेय त्याला दिले आहे. पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांमध्ये, मुघल साम्राज्याचे पतन केल्याचा आरोप औरंगजेबवर नव्हे तर अकबरावर ठेवण्यात आला आहे.

अकबर हा धर्माभिमानी मुस्लिम नव्हता ही कल्पना त्याच्या दीन-ए-इलाहीच्या धोरणात रुजलेली आहे, ज्यात इस्लाम, कॅथलिक आणि जैन धर्म यासह विविध धर्मांच्या पैलूंचा संयोग होतो. अकबराने आपल्या प्रजेमध्ये या विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्याचा कोणताही पुरावा नसला तरी (त्याच्या कारकिर्दीत त्याच्या अनुयायांची संख्या अंदाजे १९ होती), दीन-ए-इलाहीचा वापर करून त्याचे टीकाकार त्याच्यावर टीका करतात.

अली लिहितात की, मुघल साम्राज्याच्या पतनासाठी पाकिस्तानी इतिहासकार आय. एच. कुरेशी अकबराला दोषी ठरवतात, ते म्हणतात. अकबराने राजकारणाचे स्वरूप गंभीरपणे बदलले होते, अकबराने आपल्या धोरणांद्वारे इस्लामला कमकुवत केले. अकबराच्या राजपुतांबद्दलच्या धोरणांवर पाकिस्तानातील इतिहासकारांनी जहरी टीका केली आहे. शेख मुहम्मद रकीफ ‘तारीख-ए-पाकिस्तान-वा-हिंद’ (१९९२) मध्ये लिहितात, “अकबराने राजपूतांची एवढी बाजू घेतली की त्याच्या विश्वासू अधिकाऱ्यांचाही त्याच्यावरील विश्वास उडाला होता. त्यांनी मुघल राजवटीला इस्लामिक मानले नाही. ”एम. इकराम रब्बानी सारखे काही लेखक, हिंदू आणि मुस्लिमांच्या विभाजनासाठी अकबरच्या धर्मनिरपेक्षतेला दोष देतात आणि ते द्वि-राष्ट्र सिद्धांताच्या उत्पत्तीचे कारण असल्याचा दावा करतात.

दुसरीकडे, औरंगजेबला इस्लामचा एक अग्रगण्य म्हणून पाहिले जाते, या व्यक्तीचे चित्रण पाकिस्तानमध्ये जेवढे राष्ट्रवादी राजकारणाने प्रभावित आहे तितकेच भारतातील त्याचे चरित्र नकारात्मक आहे. तथापि, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की पाकिस्तानमध्ये औरंगजेबचा वारसा निरपेक्ष नाही. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, दारा आणि त्याचे इस्लामचे उदारमतवादी स्पष्टीकरण सुशिक्षित उच्चभ्रूंच्या वर्तुळाबाहेर फारसे ज्ञात नाही तर औरंगजेबचे कथित विचार मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहात आहे. जनरल झिया उल-हक हे सद्यस्थितीतील पाकिस्तानमध्ये असलेल्या इस्लामिक कट्टरतेचीमुळे औरंगजेबाच्या विचारसरणीतून प्रेरित झाल्याचे मानत होते.

अकबर आणि औरंगजेब दोघेही मुस्लिम होते. विशाल आणि शक्तिशाली साम्राज्याचे दोन्ही शासक. त्यांची भयानक कृत्ये आणि चांगली कृत्ये दोन्ही समोर आहेत. दोघांचाही काही जण तिरस्कार करतात तर काहींना ते आवडतात. प्रत्येक जण त्यांच्याकडे आपापल्या नजरेतून पाहातो म्हणूनच आजही त्या दोघांचा पुरस्कार आणि तिरस्कार करणारे दोन्ही देशांमध्ये आढळतात.