Sajjan Kumar Delhi riots 1984 : पंजाबमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारनंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १ नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत शिखांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं. यावेळी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाची बुधवारी (१२ फेब्रुवारी) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर येत्या १८ फेब्रुवारीला न्यायालय शिक्षेबाबत निर्णय घेणार आहे. दरम्यान, सज्जन कुमार कोण आहेत, दंगलीत त्यांची भूमिका काय होती? न्यायालयाने त्यांना दोषी का ठरवलं? सविस्तर जाणून घेऊ.

कोण आहेत सज्जन कुमार

सज्जन कुमार हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते तीनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेलेले आहेत. सज्जन कुमार यांनी १९७७ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिलांदा दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत कमी कालावधीतच त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचा विश्वास संपादित केला होता. शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर सज्जन कुमार यांनी शीखांविरोधात दंगल भडकवण्याचे काम केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. शीख दंगलीनंतर १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही सज्जन कुमार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

आणखी वाचा : Who is Tulsi Gabbard : कोण आहेत तुलसी गॅबार्ड? अमेरिकेत दाखल होताच मोदींनी त्यांची भेट का घेतली?

सज्जन कुमार यांच्यावर कोणकोणते आरोप?

१ नोव्हेंबर १९८४ रोजी उसळलेल्या दिल्ली दंगलीत सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग या दोन शीख व्यक्तींची हत्या झाली. याप्रकरणी पीडितांच्या पत्नी आणि आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्या जमावाने जसवंत आणि तरुणदीप सिंग यांची हत्या केली, त्याचे नेतृत्व सज्जन कुमार करत होते, असा आरोप करण्यात आला. ९ सप्टेंबर १९८५ रोजी तक्रारदारांनी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला जबाब नोंदवला. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिल्लीतील संघटित हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती केली होती.

एसआयटीचा दावा काय होता?

हिंसाचाराच्या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माजी पंतप्रधानांनी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. सुनावणीवेळी न्यायालयासमोरील मुख्य प्रश्न हा साक्षीदारांच्या साक्षीच्या विश्वासार्हतेशी संबंधित होता. या प्रकरणात फिर्यादी, तिची १४ वर्षांची मुलगी आणि २१ वर्षांची भाची असे तीन साक्षीदार होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) साक्षीदारांचे म्हणणे विश्वासार्ह असल्याचा युक्तिवाद केला होता. दुसरीकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, तक्रारदार महिला ३२ वर्षांच्या विलंबानंतर प्रत्यक्षदर्शी म्हणून पुढे आली होती, ज्यामुळे तिची साक्ष अविश्वसनीय ठरते.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

सज्जन कुमार यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारदार महिला शिक्षित असल्याने तिला आरोपीची ओळख माहिती होती. सज्जन कुमार हे त्यावेळी दिल्लीत काँग्रेसचे खासदार होते. सुरुवातीला तक्रारदाराने त्यांचे नाव घेतले नाही. मात्र, नंतर त्यांच्यावर जाणून बुजून आरोप केले. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. तक्रारदाराने घटनेच्या काही महिन्यांनंतर एका मासिकात आरोपीचा फोटो पाहिला होता, त्यामुळे शीखविरोधी दंगलीनंतर पाच दिवसांनी घेतलेल्या तिच्या जबाबात ती त्याला ओळखू शकली नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. छायाचित्रे पाहिल्यानंतरच तक्रारदाराने आरोपीची ओळख पटवली, असंही न्यायालयाने सांगितलं.

न्यायमूर्ती कावेरी बावेजा काय म्हणाल्या?

न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी निर्णय दिला की, फिर्यादीने ९ सप्टेंबर १९८५ रोजी सज्जन कुमार यांचे नाव घेतले होते, ज्यामुळे घटनेच्या ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच नाव घेतल्याचा आरोपीचा युक्तिवाद स्वीकारता येणार नाही. तक्रारदाराच्या मुलीच्या जबाबाची दखल घेत न्यायमूर्ती बावेजा म्हणाल्या, “तिच्या वडिलांना आणि भावाला जिवंत जाळल्याची घटना १४ वर्षांची मुलगी कधी विसरू शकत नाही. न्यायालयाला तिच्या साक्षीवर विश्वास न ठेवण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”

“तक्रारदार महिलेने तिचा पती आणि मुलाची क्रूर हत्या पाहिली होती, त्यामुळे ती जमावाला खून आणि लुटमार करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कधीही विसरू शकत नाही,” असंही न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. दुहेरी हत्याकांडातील तिन्ही साक्षीदारांचे जबाब सुसंगत आणि अविवादित होते, असंही न्यायमूर्ती कावेरी बावेजा म्हणाल्या. “आरोपी (सज्जन कुमार) प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या जमावाला भडकावत होता हे सिद्ध झाले आहे. जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग यांची हत्या केल्याबद्दल ते दोषी असल्याचं सिद्ध होत आहे,” असे न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.”

हेही वाचा : ईव्हीएममधील डेटा सुरक्षित ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना; कारण काय?

सज्जन कुमार यांच्याविरुद्ध कोणकोणते खटले?

सज्जन कुमार हे सध्या तिहारच्या तुरुंगात आहेत. नोव्हेंबर १९८४ रोजी पालम कॉलनीतील राज नगर भाग १ मध्ये पाच जणांच्या हत्येप्रकरणी आणि राज नगर भाग २ मधील गुरुद्वारा जाळल्याप्रकरणी २०१८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९८४ च्या दंगलीदरम्यान सुलतानपुरी येथे शीख समुदायातील सात लोकांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही सज्जनकुमार यांच्यावर करण्यात आला. मात्र, सप्टेंबर २०२३ मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं.

सज्जन कुमार यांचे वकील उच्च न्यायालयात जाणार?

सज्जन कुमार यांच्याविरुद्ध राऊस अव्हेन्यू कोर्टात एक खटला प्रलंबित आहे, तर दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या दोषमुक्तीविरोधात दोन याचिकेवरील सुनावणी होणे बाकी आहे. एका प्रकरणात त्यांच्या शिक्षा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीही प्रलंबित आहे. बुधवारच्या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर, सज्जन कुमार यांचे वकील या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसने एका वृतात दिली आहे.