गेली दहा वर्षे तेलंगणात सत्तेत असलेले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीला विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागली. चंद्रशेखर राव यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, घराणेशाही आणि सरकारच्या विरोधातील नाराजीचा सत्ताधारी पक्षाला फटका बसला. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या योजनेला खीळ बसली आहे. गेल्या मे महिन्यापर्यंत काँग्रेस कुठेच स्पर्धेत नव्हता. पण कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने सारे चित्र बदलले.
चंद्रशेखर राव यांच्या पराभवाची कारणे काय आहेत?
२०१४ मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून चंद्रशेखर राव हे सत्तेत होते. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी चळवळ उभारली होती. त्यासाठी त्यांनी उपोषण केले होते. त्यातूनच तत्कालीन यूपीए सरकारने तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखविला होता. सत्तेत आल्यापासून चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. सत्तेत येताच सिंचनावर अधिक खर्च करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणले. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि भाताचे उत्पादन वाढले. पण सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला. स्वत: चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र रामाराव हे मंत्री, भाचे हरीश राव मंत्री, मुलगी आमदार असा सारा घराण्याचा मामला झाला होता. सरकारने रयतु बंधू व दलित बंधू या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या. पण या योजनांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप झाले. दहा वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारच्या विरोधातील नाराजी वाढत गेली. काँग्रेस व भाजपने केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर राव हे उत्तर देण्यात कमी पडले. यातूनच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला.
हेही वाचा – विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश कसे मिळाले?
चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला खीळ?
मधल्या काळात काँग्रस पक्ष कमकुवत झाल्यावर चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची महत्त्वाकांक्षा वाढली होती. तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे त्यांनी भारत राष्ट्र समिती असे नामकरण केले. देशभर विविध राज्यांमध्ये दौरे केले. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. स्वत:चे राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला. भाजपला पर्याय म्हणून स्वत:चे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तेलंगणाबाहेर महाराष्ट्राकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांना फारसे यश मिळाले नव्हते. तेलंगणातील पराभवामुळे त्यांच्या एकूणच राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे. तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा आहेत. लोकसभेत चांगले यश मिळविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.
काँग्रेस पक्षाला कशामुळे यश मिळाले?
वास्तविक गेल्या मे महिन्यापर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेच्या स्पर्धेतही नव्हता. विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका जिंकल्याने भाजप तेलंगणा राष्ट्र समितीला आव्हान देणार असेच चित्र होते. पण गेल्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने तेलंगणातील राजकीय समीकरणे बदलत गेली. भाजपकडे जाणारा अन्य पक्षातील नेत्यांचा ओघ काँग्रेसकडे वळला. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसमध्ये पक्षाचे राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी समन्वय साधला. सर्व नेत्यांना एकत्र आणले. पक्षाअंतर्गत गटबाजी कमी झाली. भारत राष्ट्र समितीला पराभूत करू शकतो याचा काँग्रेस नेत्यांना अंदाज आल्यावर पक्षाने जोर लावला. त्याचा परिणाम झाला. लोकांमध्ये चंद्रशेखर राव यांच्या विरोधातील नाराजीचा काँग्रेसने फायदा उठविला.
हेही वाचा – विश्लेषण : राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव कसा झाला? भाजपला ध्रुवीकरणाचा फायदा?
एमआयएमला भाजपचे आव्हान कितपत?
मुस्लीमबहुल हैदराबाद शहरात एमआयएमचे वर्चस्व आहे. पक्षाचे प्रमुख असादुद्दिन ओवेसी हैदराबादमधूनच लोकसभेवर निवडून येतात. एमआयएमची भारत राष्ट्र समितीबरोबर आघाडी होती. हैदराबाद शहरात भाजपने एमआयएमला कडवे आव्हान दिले. हैदराबाद शहरातील दोन विधानसभा मतदारसंघात भाजपने विजय प्राप्त केला आहे.