काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी (१३ जुलै) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे की, मोदी सरकार त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचा मोबाइल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना त्यांच्या आयफोन मोबाइलवर ॲपल कंपनीकडून यासंदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठीचा मेल प्राप्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटमध्ये मेलद्वारे प्राप्त झालेल्या सूचनेचे स्क्रीनशॉट छायाचित्रही जोडले आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, “तुम्हाला स्पायवेअर हल्ल्याद्वारे लक्ष्य केले जात आहे. हा हल्ला तुमच्या ॲपल आयडीशी लिंक केलेल्या आयफोनवर केला जात आहे. आज अशी सूचना ९८ देशांमधील वापरकर्त्यांना पाठवली जात आहे. आतापर्यंत ॲपलने १५० हून अधिक देशांमधील वापरकर्त्यांना यासंदर्भात सावध केले आहे.” ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या या सावधगिरीच्या इशाऱ्यामध्ये ‘भाडोत्री स्पायवेअर’ (Mercenary Spyware) हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये पेगाससचा (Pegasus) देखील उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी एनएसओ या इस्रायली कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर बरेच चर्चेत आले होते. भारतात या स्पायवेअरचा वापर करून केंद्र सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून देशातील राजकीय वातावरण बरेच तापलेले होते. आता वेणुगोपाल यांनी पुन्हा एकदा याचप्रकारचा आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. ॲपलने याआधीही भारतातील आणि इतर ९१ देशांमधील आपल्या वापरकर्त्यांना एप्रिलमध्ये पेगॅसससह इतर काही ‘भाडोत्री स्पायवेअर’कडून होऊ शकणाऱ्या अशा संभाव्य हल्ल्यांबद्दल सावध केले होते.

हेही वाचा : शहरी नक्षलींचा बीमोड म्हणून महाराष्ट्र सरकारने आणलेले नवे विधेयक जनतेचा आवाज दडपणारे आहे का?

पाळत ठेवण्यासाठी मोबाइलवर असा हल्ला कोण करू शकतो?

असा हल्ला कोण करू शकतो, याबाबत ॲपलने काहीही भाष्य केलेले नाही. पेगासस वापरून होणारे हल्ले फारच दुर्मीळ आहेत, असे ॲपलने म्हटले आहे. हे हल्ले नियमित सायबर गुन्हेगारी कारवायांपेक्षा खूपच अत्याधुनिक असतात. ते खूप कमी लोकांवर केले जातात, असे आपल्या सूचनेमध्ये ॲपलने म्हटले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्येही ॲपलने अशीच सूचना काही वापरकर्त्यांना पाठवली होती. त्यावेळी ॲपलने म्हटले होते की, ‘राज्य पुरस्कृत हल्लेखोरांकडून’ आयफोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर या विधानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारने ॲपलवर दबाव आणला होता. त्यानंतर ॲपलने असे स्पष्टीकरण दिले होते की, ते हल्ल्यांसाठी कोणत्याही एका सरकारला दोषी ठरवत नाहीत. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतातील काही जणांना असाच सावधगिरीचा इशारा देणारा इमेल प्राप्त झाला होता, त्यामध्ये बहुतांश विरोधकांचाच समावेश होता. काँग्रेसचे नेते शशी थरूर, आपचे नेते राघव चढ्ढा आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचाही त्यामध्ये समावेश होता. काही पत्रकारांच्या मोबाइलवरही पाळत ठेवण्यासाठी असा हल्ला झाल्याचा मेल प्राप्त झाला होता.

ॲपलने २०२३ मध्ये पहिल्यांदाच या सूचना पाठवल्या होत्या का?

२०२१ पासूनच ॲपलने अशाप्रकारच्या सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. सावधगिरीचा इशारा देणाऱ्या या सूचना ऑटोमेटेड आहेत. ज्यांच्या मोबाइलवर अशा प्रकारचा धोका दिसून येतो, त्यांना असे मेल आपोआपच पाठवले जातील, अशी व्यवस्था ॲपलने केलेली आहे. त्याद्वारे २०२१ पासून असे मेल प्राप्त होत आहेत. इमेल आणि आयमेसेजद्वारे (iMessage) सावधगिरीचा इशारा देणारी ही सूचना पाठवली जाते. ही सूचना वापरकर्त्याच्या ॲपल आयडीशी लिंक केलेल्या ईमेलवर आणि फोन नंबरवर जाते. ॲपल म्हणते की, ते अशा सावधगिरीच्या सूचना का पाठवतात याबद्दलचा तपशील देऊ शकत नाहीत. असा तपशील देऊ केल्यास हल्लेखोर आक्रमण करण्याच्या त्यांच्या पद्धती बदलू शकतात. ऑक्टोबर २०२३ च्या अधिसूचनेपूर्वी ॲपलने एक छोटी सूचना जारी करून म्हटले होते की, पाठवण्यात आलेले सावधगिरीचे काही इशारे खोटेही ठरू शकतात. इशारा प्राप्त झाला म्हणजे प्रत्येकवेळी तुमच्या मोबाइलवर हल्ला झालेला असेलच असे नाही.

हेही वाचा : १६ वर्षांत तब्बल १३ सरकारे! नेपाळमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या के. पी. शर्मा ओलींची कशी आहे राजकीय कारकिर्द?

अशी सूचना प्राप्त झालेल्या व्यक्तीने काय करावे?

अशी सूचना प्राप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मोबाइलची सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठीची काही पावले उचलणे गरजेचे असते. मोबाइलमधील सॉफ्टवेअर अद्ययावत करणे, चांगला पासवर्ड लावणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे तसेच ॲपल आयडीसाठी मजबूत पासवर्डचा वापर करणे हे काही उपाय तातडीने करणे गरजेचे असते. फक्त ॲप स्टोअरवरूनच घेतलेले ॲप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करावेत. सगळीकडे एकच पासवर्ड न वापरता प्रत्येक ऑनलाइन अकाउंटला वेगवेगळे पासवर्ड ठेवावेत. माहिती नसलेल्या ठिकाणाहून प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. अशाप्रकारच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ॲपलने ‘लॉकडाउन मोड’ नावाचा नवा पर्यायही आणला असून तो देखील तातडीने सक्रिय करण्याचा फायदा होऊ शकतो.