संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून बुधवारी प्रारंभ होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ही यात्रा काढली हे स्पष्टच आहे. देशाच्या राजकारणात माजी पंतप्रधान चंद्रशेखर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी व एन. टी. रामाराव, विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेत्यांच्या यात्रांमुळे पक्षाला किंवा नेत्याला फायदा झाला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या यात्रेचा काँग्रेस किंवा गांधी यांना राजकीय लाभ होतो का, याचे उत्तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मिळेल.

पदयात्रा काढण्याचा उद्देश आणि त्यासाठी राजकीय नेत्यांचा खटाटोप…

यात्रांचे दोन प्रकार असतात. एक असते पदयात्रा तर दुसरी यात्रा ही वाहनातून काढण्यात येणारी यात्रा. सत्तेतील नेतेमंडळी सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता यात्रा काढत असतात. विरोधी नेते सत्ताधाऱ्यांचे अपयश लोकांसमोर मांडण्याकरिता यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पदयात्रेच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती होऊन लोकांशी थेट संवाद साधता येतो. काही नेतेमंडळी यात्रेच्या माध्यमातून लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधतात. पदयात्रांच्या माध्यमातून एन. टी. रामाराव, वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी व त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी नेत्यांनी पदयात्रा काढल्यास त्याचा त्यांना राजकीय फायदा होतो.

देशातील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या पदयात्रा कोणत्या?

देशाच्या इतिहासात महात्मा गांधी यांची ‘दांडी यात्रा’ ही लक्षणीय ठरली. १९८३मध्ये जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटपर्यंत ‘भारत यात्रा’ काढली होती. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत चंद्रशेखर यांनी चार हजार कि.मी.पेक्षा अधिक अंतर कापले होते. पुढे १९९१मध्ये अल्प काळासाठी चंद्रशेखर यांना पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली होती. भाजप नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या आंदोलनाचा भाग म्हणून रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा सारा पोत बदलला. अडवाणी यांची यात्रा बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडविली व अडवाणी यांना अटक केली होती. त्यातून देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचार उसळला होता.

विश्लेषण : खरी शिवसेना कोणाची? निर्णय घटनापीठापुढे की त्रिसदस्यीय पीठापुढे?

अडवाणी यांच्या अटकेनंतर भाजपने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळले होते. या रथयात्रेचा भाजपला राजकीय लाभ मिळाला. अडवाणी यांच्या रथयात्रेमुळेच रामजन्मभूमीचा मुद्दा अधिक तीव्र झाला. १९८२मध्ये आंध्र प्रदेशात तेलुगू बिड्डा म्हणजेच अस्मितेच्या मुद्द्यावर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते एन. टी. रामाराव यांनी तेगुलू देशम पक्षाची स्थापना केली. निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेल्या ‘चैतन्य रथयात्रे’मुळे आंध्रचे राजकारणच पार बदलले. आगामी निवडणुकीत एन. टी. रामाराव यांच्या पक्षाला भरघोस यश मिळाले आणि काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला होता. भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तिरंगा फडकविण्यासाठी काढलेल्या एकता यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे पदाधिकारी म्हणून या यात्रेत सहभागी झाले होते.

आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांची सत्ता असताना हैदराबाद व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाकडे त्यांनी अधिक लक्ष दिले होते. तेलुगू देशम सरकारचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी राज्यभर यात्रा काढली होती. त्याचा राजशेखर रेड्डी यांना फायदा झाला आणि काँग्रेसला सत्ता मिळाली होती. राजशेखर रेड्डी यांच्या यात्रेवर आधारित ‘यात्रा’ हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता व या चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. २०११च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याकरिता पदयात्रा काढली होती. त्याचा राजकीय लाभ होऊन ममता यांच्या पक्षाला बहुमत मिळाले होते.

विश्लेषण : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, झारखंडमधील सत्तासंघर्षाचं नेमकं कारण काय?

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशात जनगमोहन रेड्डी यांनी पदयात्रा काढली होती. निवडणुकीत जगनमोहन यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले होते. याशिवाय अनेक नेत्यांनी विविध यात्रा काढल्या होत्या. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रा काढली होती. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, पण शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळ‌वणी केल्याने फडण‌वीस यांचे मुख्यमंत्रीपद हुकले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi bharat jodo yatra indina political history print exp pmw
Show comments