भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) सामना करण्यासाठी जुन २०२३ मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नेतृत्व करावे अशी मागणी काही जणांनी केली. यात काँग्रेसचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांचा समावेश आहे. त्यातून विरोधकांमधील मतभेद तर पुढे आलेच, पण या आघाडीच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
वर्षभरात आघाडीत दुभंग
एखादी देशव्यापी अशी राजकीय पक्षांची आघाडी उभी करायची असेल तर, त्यासाठी एक मध्यवर्ती घटक गरजेचा असतो. रालोआत जसा भाजप आहे, तशीच इंडिया आघाडीत काँग्रेसवर जबाबदारी आली. मात्र सुरुवातीपासूनच या आघाडीचे नेतृत्व नक्की कोणाकडे, यावरून संभ्रम दिसतो. हरियाणातील राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौताला यांनी २५ सप्टेंबर २०२२ रोजी माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त हरियाणात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथेच विरोधकांच्या एकत्रित आघाडीची कल्पना पुढे आली. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी व्यासपीठावरून विरोधकांना भाजपविरोधी आघाडीसाठी आवाहन केले. पुढे सहा महिन्यांनी नितीश यांच्याच पुढाकाराने पाटण्यातील बैठकीला १६ पक्ष उपस्थित होते. महिनाभरानंतर बंगळुरुमध्ये दुसऱ्या बैठकीत ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) असे त्याचे नामकरण करण्यात आले. तिसरी बैठक ३१ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढाकाराने मुंबईत झाली. तर चौथी बैठक १९ डिसेंबरला दिल्लीत झाली. यात लोकसभेचे जागावाटप, किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. मात्र पुढच्या पाचव्या दूरदृश्य पद्धतीने झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे मुख्य म्हणून घोषित करण्यात आले. तेथेत आघाडीला तडे गेले. त्यानंतर या आघाडीसाठी पुढाकार घेणारे नितीशकुमार हे भाजपबरोबर गेले. एकूण वर्षभरात ही भाजपविरोधी आघाडी फुटली. आता बिहार विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी असतानाच राष्ट्रीय जनता दलाने ममतांना पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केल्याने तेथील आघाडीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या क्षमतेवर शंका?
लोकसभेला सलग तिसऱ्यांदा भाजपला रोखण्याची जबाबदारी प्रामुख्याने काँग्रेसवर होती. कारण देशभरात किमान दोनशे जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा लोकसभेला थेट सामना असतो. यंदा म्हणजे जून २०२४ मध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी, मध्य प्रदेश, गुजरात काही प्रमाणात राजस्थान या मोठ्या राज्यांसह छत्तीसगढ, उत्तराखंडमध्ये भाजपने काँग्रेसला सहज नमवले. उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्र या देशातील दोन मोठ्या राज्यातील कामगिरीने इंडिया आघाडीने भाजपला बहुमत मिळू दिले नाही. मात्र पुढे चारच महिन्यांत विधासभा निवडणुकीत सुरुवातीला हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात काँग्रेसला भाजपला सत्तेतून हटविता आले नाही. हरियाणात तर काँग्रेस जिंकेल असे चित्र होते. मात्र भाजपने उत्तम रणनीती आखत काँग्रेसचा धुव्वा उडविला. महाराष्ट्रातही भाजपने प्रचाराचे उत्तम नियोजन केल्याने महाविकास आघाडीला २८८ मध्ये जेमतेम ५० जागाच मिळवता आल्या. काश्मीर किंवा झारखंडमध्ये यश मिळाले असले तरी ‘इंडिया’च्या यशात काँग्रेसचा फारसा वाटा नाही. या निकालांनंतर काँग्रेसमध्ये थेट लढतींमध्ये भाजपला रोखण्याची क्षमता आहे काय, असा प्रश्न त्यांच्या मित्र पक्षांनीच उपस्थित केला. यातूनच ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करावे या मागणीने जोर धरला.
ममतांची लढाऊ वृत्ती
पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात शिरकाव करण्याचे प्रयत्न करूनही ममतांनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक असेल की किंवा लोकसभा तसेच अगदी अलीकडे झालेली पोटनिवडणूक यात भाजपचा पराभव झाला. यातून भाजपला ममतांच्याच नेतृत्वाखाली पराभूत करता येऊ शकते असा संदेशच एक प्रकारे गेला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ संसद सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी ममता या विरोधकांच्या आघाडीचे उत्तम नेतृत्व करू शकतील असे सुचवले. पाठोपाठ याच पक्षाचे लोकसभा सदस्य कीर्ती आझाद यांनीही ममता या स्पष्टवक्त्या असून, कुशल संघटक असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. यातून ममतांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे या चर्चेने जोर धरला. ममतांनीही संधी मिळाली तर नेतृत्व करू असे नमूद केले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद व इंडिया आघाडीचे प्रमुख या दोन्ही जबाबदाऱ्या संभाळू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. सध्याच्या संसद अधिवेशनात तृणमूल काँग्रेस तसेच तसेच काही प्रमाणात समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी इंडिया आघाडीपासून थोडे अंतर ठेवले आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह आहे. ममतांचा पक्ष जरी देशव्यापी नसला, तरी त्यांची भाजपला वारंवार रोखून दाखवले. भाजपविरोधातील संघर्षात त्या पुढे आहेत. त्यामुळे विरोधी आघाडीतील अनेक पक्ष ममतांच्या नावाला अनुकूल आहेत. ममता या विरोधकांच्या आघाडीच्या एक प्रमुख नेत्या आहेत असा सर्वांचाच सूर आहे. अर्थात नेतृत्वाच्या मुद्द्यावर अनेकांनी थेट भाष्य केले नाही. मात्र विधानसभा निवडणुकांनंतर विरोधी आघाडीतून काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत मुद्दे उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा : सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
काँग्रेसची भूमिका काय?
मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर शंका नाही. मात्र भाजपला रोखण्यात काँग्रसला यश येत नाही हे अनेकवेळा सिद्ध झाले. हरियाणात तर समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष यांना काही जागा सोडल्या असत्या तर, निकालात फरक पडला असता अशी मांडणी विश्लेषकांनी केली. काँग्रेस थोडीही जागा (स्पेस) मित्र पक्षांना देण्यास तयार का नाही, असा प्रश्न या पक्षाच्या नेत्यांनी केला. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून खडाखडी झाली. याबाबी लक्षात घेता आता काँग्रेसची भूमिका काय असेल? ममतांना ते आघाडीचे प्रमुख म्हणून स्वीकारणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधात काँग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी आहे. ममतांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा असलेले अधीररंजन चौधरी हे पश्चिम बंगाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून दूर झाले. यातून काँग्रेसने ममतांच्या विषयी थोडी नरमाई दाखविल्याचा संदेश जरूर गेला. मात्र बंगालमध्ये ते डाव्यांची साथ सोडण्यास अद्याप तयार नाहीत. अशा परिस्थितीत विरोधकांत एकी राखण्याच्या दृष्टीने अन्य नेत्यांना काँग्रेस पक्ष पुढे करणार काय? अर्थात या आघाडीतील प्रमुख घटक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व मान्य होणार नाही. अशा स्थितीत विरोधकांमधील दुही स्पष्ट होईल. त्या तुलनेत केंद्रात सत्ता असल्याने आणि मोठी राज्ये भाजप राखत असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तूर्त तरी ऐक्य आहे. देशातील राजकीय स्थिती पाहता काँग्रेसला आणखी लवचिक भूमिका स्वीकारावी लागेल. आता तीन महिन्यांत होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधक ऐकीने लढतात का, ते पाहावे लागेल. त्या निकालानंतर ‘इंडिया’ आघाडीची वाटचाल स्पष्ट होईल.
hrishikesh.deshpande@expressindia.com