हृषिकेश देशपांडे
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ३७० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या पक्षाच्या धोरणाशी हा ३७० जागांचा संदर्भ दिला जातो. सर्वच जनमत चाचण्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येईल असे भाकीत वर्तवले. विरोधी इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. यामुळेच भाजपला अपेक्षित उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास दिसतो. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ३३ विद्यमान खासदारांना वगळण्यात आले. इतर मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) ५७ उमेदवार भाजपने पहिल्या यादीत जाहीर केले. गेल्या काही वर्षांत ही भाजपची मतपेढी बनली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना तसेच इतर मुद्द्यावर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने पहिल्या उमेदवारी यादीत ३० टक्के ओबीसी उमेदवार देत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडून येण्याचा निकष

नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या काळात भाजपचे स्वरूप पूर्णपणे बदलले. उमेदवारी यादीत निवडून येण्याची ताकद, पक्षासाठी काम करण्याची क्षमता या बाबींना प्राधान्य देण्यात आले. बाहेरील पक्षातून आलेल्यांना संधी देताना संघ परिवारातील जुने कार्यकर्ते दुखावणार नाहीत याची काळजीही पक्षाने घेतली. हिंदुत्व हा भाजपचा आधार आहे, त्याचा विचारही पक्षाने केलाय. भाजपशी मित्र पक्षांशी जागावाटपाची चर्चा सुरू असून, तेथे उमेदवार जाहीर केले नाहीत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश तसेच पंजाबमध्ये उमेदवारांची प्रतीक्षा आहे. ८० जागा असलेला उत्तर प्रदेश सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तेथे भाजपने ५१ जागा जाहीर केल्यात. यात काही बाहेरून आलेले उमेदवार आहेत. उदा. जौनपूर या यादवबहुल मतदारसंघातून मुंबईचे पूर्वीचे काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांना रिंगणात उतरवले गेले आहे. हा यादवबहुल मतदारसंघ भाजपसाठी बिकट मानला जातो. राष्ट्रीय स्तरावरील जुन्या नेत्यांपैकी राजनाथ सिंह हेच २००९ पूर्वी निवडून आलेले आहेत. भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील एकाही विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारली नाही. पण मीनाक्षी लेखी, जॉन बरला, प्रतिमा भौमिक, रामेश्वर तेली या केंद्रीय मंत्र्यांना डावलण्यात आले.

आणखी वाचा-विश्लेषण : प्रेमळ लॅब्रडॉरऐवजी कणखर बेल्जियन मालिनोआस… भारतीय सैन्यदलांचे श्वानप्राधान्य का बदलले?

दिल्लीत मोठे बदल

दिल्लीत लोकसभेच्या सर्व सात जागा भाजपच्या ताब्यात आहेत. यंदा आम आदमी पक्ष व काँग्रेस यांची आघाडी भाजपपुढे आव्हानात्मक आहे. रमेश बिधुडी, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, हंसराज हंस, परवेश वर्मा यांना डावलण्यात आले. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांच्या बरोबर पक्ष संघटनेत दीर्घ काळ कार्यरत असलेल्या व्यक्तींना संधी दिली. त्याचबरोबर चांदणी चौक मतदारसंघातून व्यापारी समुदायावर पकड असणारे प्रवीण खंडेलवाल हे उमेदवार असतील. दिल्लीत केवळ मनोज तिवारी हेच पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले. परवेश वर्मा तसेच रमेश बिधुडी यांना दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या तोडीचा नेता भाजपकडे नाही. यामुळे विधानसभेला गेल्या दोन-तीन निवडणुकींत भाजपचा दारुण पराभव झाला.

दक्षिणेवर भिस्त

केरळमधील एकूण २० जागांपैकी १४ जागांवर उमेदवार घोषित करत पक्षाने या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ दिला. राजधानी तिरुअनंतपुरमच्या जागेवर भाजप गेल्या दोन निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना उतरवून ही लढत चुरशीची केली आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी होईल. मलपुरममधून अब्दुल सालेम हे एकमेव मुस्लीम उमेदवार भाजपच्या यादीत आहेत. तर पथ्थन्नमथीट्टा या अनिल अँटनी या युवा कार्यकर्त्याला संधी दिली. या मतदारसंघातील ख्रिश्चनांची संख्या घेता ही उमेदवारी महत्त्वपूर्ण ठरते. अँटनी हे अलीकडेच भाजपमध्ये आले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र आहेत. केरळमध्ये भाजपला दोन ते तीन जागांची अपेक्षा असून, त्यातील या दोन जागा महत्त्वाच्या आहेत.

आणखी वाचा-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते आता थेट भारताचे नवे लोकपाल; जाणून घ्या मराठमोळ्या अजय खानविलकरांचा प्रवास!

आयारामांनाही संधी

तेलंगणमधील भारत राष्ट्र समितीमधून आलेले दोन खासदार, उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षातून आलेले रितेश पांडे यांच्यासह किमान आठ जणांना संधी मिळाली. यात काँग्रेसमधून आलेल्या ज्योती मिर्धा यांना राजस्थानमधून, गीता कोडा यांना झारखंडमधून संधी मिळाली. याखेरीज सुवेंदु अधिकारी यांच्या बंधूनाही भाजपची उमेदवारी मिळाली. यादीत २८ महिला उमेदवार आहेत. शिवराजसिंह चौहान, बिप्लब देव हे माजी मुख्यमंत्री लोकसभा लढतील. शिवराजमामांना मध्य प्रदेशातून उतरवत त्यांना दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी दिली जाईल हे संकेत आहेत. सहा मार्च रोजी भाजपच्या निवडणूक समितीची दुसरी बैठक होत आहे. एकूणच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच १० मार्चपूर्वी भाजप सत्तर टक्के उमेदवार जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. भाजप यंदा एकूण लोकसभेच्या ५४३ पैकी ४४० च्या आसपास जागा लढवेल अशी शक्यता आहे. काँग्रेससह इतर प्रमुख विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपने पहिली यादी जाहीर करत पक्षाची यंत्रणा लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consideration of social equations in bjps first list intend to strengthen the vote bank print exp mrj
Show comments