इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकचे नाव भारताच्या वॉन्टेड यादीत आहे. भारतातून पळून गेलेला हा कट्टरपंथी इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक आता पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये पोहोचला आहे. भारताविरोधी गरळ ओकणार्‍या झाकीर नाईकचे पाकिस्तानने मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. २ ऑक्टोबर रोजी नाईकने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याबरोबरही एक छायाचित्र पोस्ट केले. मुख्य म्हणजे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही नाईक याचे कौतुक केले आणि त्याच्या व्याख्यानांचा वैयक्तिकरीत्या फायदा झाल्याचेही सांगितले. परंतु, नाईक पाकिस्तानात नक्की काय करत आहे? त्याचे नाव भारताच्या वॉन्टेड यादीत कसे आहे आणि त्याच्या पाकिस्तान भेटीमुळे दोन देशांमधील तणाव वाढेल का? त्याविषयी जाणून घेऊ.

कोण आहे झाकीर नाईक?

झाकीर नाईक व्यवसायाने डॉक्टर आहे. तो मुस्लीम धर्मगुरू असल्याचा दावा करतो. तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन आणि पीस टीव्ही नेटवर्कचा संस्थापक व अध्यक्ष आहे. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेचे इस्लामिक धर्मोपदेशक अहमद दीदात यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिल्यानंतर त्याने या क्षेत्रात प्रवेश घेतला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला त्याने सांगितले, “मी दीदात यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिल्यानंतर मला जाणवले की, मी वैद्यकीय डॉक्टर म्हणून फार पुढे जाणार नाही. मला त्यांच्यासारखे होण्याची इच्छा होती.” त्यानंतर नाईकने स्वतःला बदलण्यास सुरुवात केली. त्याच्या काही कौटुंबिक मित्रांना लक्षात आले की, तो दीदात यांच्याप्रमाणे स्वत:ला तयार करीत आहे. धर्मोपदेशक झाल्यापासून त्याने १९९४ पासून १५०० हून अधिक सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. नाईक याने अनेकदा ठामपणे सांगितले आहे की, इस्लाम हा एकमेव खरा धर्म आहे आणि त्याने इतर धर्मांवरही टीका केली आहे.

झाकीर नाईक व्यवसायाने डॉक्टर आहे. तो मुस्लीम धर्मगुरू असल्याचा दावा करतो. (छायाचित्र-पीएमएलएन डिजिटल/एक्स)

हेही वाचा : इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतातील विमान वाहतुकीवर, तिकिटं महागली अन् प्रवासाचं अंतरही वाढलं; कारण काय?

दहशतवादी गट अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनला पाठिंबा देण्यासाठीही तो ओळखला जातो. तो म्हणाला, “जर बिन लादेन इस्लामच्या शत्रूंशी लढत असेल, तर मी त्याच्याबरोबर आहे.” इस्लामवरील त्याच्या मतांव्यतिरिक्त, तो समलैंगिकता आणि महिलांच्या हक्कांबद्दलच्या त्याच्या मतांमुळेही चर्चेत आला होता. तो बहुपत्नीत्वाचे समर्थन करतो आणि घरगुती अत्याचाराचेही समर्थन करतो. पुरुषाला त्याच्या पत्नीला मारण्याचा अधिकार आहे, असेही त्याने कित्येकदा आपल्या व्याख्यानांमध्ये सांगितले आहे. त्याने आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याने एकदा असे म्हटले होते, “मुलींना अशा शाळांमध्ये पाठवू नये की, जिथे त्या उत्तीर्ण होईपर्यंत त्यांचे कौमार्य गमावतील. त्यांचे शाळेत जाणे बंद करावे आणि मुलींना सोन्याचे दागिने घालण्याचीही परवानगी देऊ नये.”

झाकीर नाईक पाकिस्तानात काय करतोय?

झाकीर नाईक सध्या मलेशियात वास्तव्यास आहे. २०१६ साली तो भारतातून पळून गेला. पाकिस्तान सरकारनेच त्याला आमंत्रण देऊन पाकिस्तानात बोलावले आहे. सोमवारी (३० सप्टेंबर) तो इस्लामाबादला पोहोचला. १९९२ नंतरची त्याची ही पहिलीच पाकिस्तान भेट आहे. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा फारिकदेखील आहे. झाकीर नाईक २८ ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानात असण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान तो पाकिस्तानात अनेक व्याख्याने देणार आहे आणि पाकिस्तानातील उच्चपदस्थांनाही भेटणार आहे. इस्लामाबाद येथे त्याचे आगमन होताच त्याचे धार्मिक व्यवहार व आंतरधर्म मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि धार्मिक व्यवहार संसदीय सचिव यांच्यासह वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्याने पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार यांचीही भेट घेतली.

मंगळवारी (१ ऑक्टोबर) झाकीर नाईक याने नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांचीही भेट घेतली आणि बैठकीत त्यांना देशात मिळालेल्या प्रेम व आदरातिथ्याची प्रशंसा केली. वादग्रस्त धर्मोपदेशकाने आपल्या सभेत मुस्लीम देशांना मतभेद टाळून एकत्र येण्याचे आवाहन केले आणि इस्लामच्या खऱ्या शिकवणींना चालना देण्यासाठी व मुस्लिमांमध्ये एकता वाढविण्यासाठी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक केले. नाईक याने जमियत उलेमा-ए-इस्लाम फझल (JUI-F) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांची इस्लामाबाद येथील त्यांच्या घरी भेट घेतली. मुलींसाठी असलेल्या अनाथाश्रमालाही त्याने भेट दिली. परंतु, या भेटीने वाद निर्माण झाला. कारण, जेव्हा अनाथ मुलींना सत्कारासाठी मंचावर आमंत्रित करण्यात आले तेव्हा नाईक मंचावरून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी बुधवारी नाईक याने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचीही भेट घेतली. इस्लामची खरी प्रतिमा जगभरात मांडल्याबद्दल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नाईकचे कौतुक केले. ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान म्हणाले, “बहुसंख्य तरुणांनी त्यांची व्याख्याने ऐकली ही आनंददायक बाब आहे.” सामाजिक कार्यकर्ते परवेझ हुडभॉय यांनी सांगितले, “झाकीर नाईक याला पाकिस्तानी पाहुणा म्हणून आमंत्रित करतोय याचे मला दु:ख झाले आहे; परंतु धक्का बसलेला नाही. हे आगीत आणखी तेल टाकण्यासारखे आहे.”

झाकीर नाईकचे नाव भारताच्या वॉन्टेड यादीत कसे आले?

झाकीर नाईकच्या पाकिस्तान दौऱ्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे. भारतातील सक्तवसुली संचालनालय, तसेच राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तो हवा आहे. त्याच्यावर कथित मनी लाँडरिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांनी लोकांच्या भावना भडकावल्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्या पीस चॅनेलवर भारतविरोधी गरळ ओकतो. त्या चॅनेललाही भारतात बंदी आहे. त्याशिवाय त्याच्यावर भारतात मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी २८ दशलक्ष डॉलर्स किमतीची गुन्हेगारी मालमत्ता मिळविल्याचा आरोप आहे. त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. कारण- या संस्थेकडून शत्रुत्व आणि द्वेषाला प्रोत्साहन दिले जाते.

त्याचा दहशतवादाशी संबंधित कारवायांशीही संबंध आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सामील झालेल्या केरळमधील दोन व्यक्तींनी धर्मोपदेशकाला भेटल्यानंतर आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले. मात्र, त्याने यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे म्हटले आहे. जुलै २०१६ मध्ये बांगलादेशातील ढाका येथील एका कॅफेमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्या कथित बॉम्बर्सनी ते नाईकचे प्रशंसक असल्याचे सांगितले होते. त्या स्फोटात २९ जण ठार झाले होते. बॉम्बस्फोट करणाऱ्यांपैकी एकाने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याने यूट्यूबवर नाईकचे उपदेश ऐकले होते. स्फोटात त्याचे नाव समोर आल्यानंतर नाईकने देश सोडून २०१६ मध्ये मलेशियामध्ये पळ काढला आणि तेव्हापासून तो परतलेला नाही.

२०२० च्या दिल्ली दंगलीच्या तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींपैकी एक जण काहलीद सैफी हा नाईकला परदेशात भेटला आणि त्याने त्याचा अजेंडा पसरविण्यासाठी नाईककडे पाठिंबा मागितला. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिराबाहेर दोन हवालदारांवर धारदार शस्त्राने हल्ला करणारा आयआयटी पदवीधर मुर्तझा अहमद अब्बासीदेखील नाईकचे व्हिडीओ पाहायचा. भारताव्यतिरिक्त नाईकवर युनायटेड किंग्डम, कॅनडा, बांगलादेश, श्रीलंका येथेही त्याच्यावर भाषणांतून द्वेष भडकवल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : ऑक्टोबर हिटला संक्रमण काळ का म्हणतात? याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

नाईकच्या पाकिस्तान भेटीमुळे दोन्ही देशांत तणाव वाढण्याची शक्यता?

झाकीर नाईकला निमंत्रित करण्याची पाकिस्तानची ही कृती भारत आणि पाकिस्तानातील तणावाचे कारण ठरू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. कारण- तो भारताच्या वॉन्टेड यादीत आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीजचे रिसर्च फेलो अमित रंजन यांनी सांगितले, “पाकिस्तानला आधीच सामाजिक आणि राजकीय समस्यांशी संबंधित हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे आणि नाईक यांना आमंत्रित करणे म्हणजे सध्याच्या तणावात भर घालण्याशिवाय दुसरे काहीही नाही.” माजी भारतीय मुत्सद्दी कंवल सिब्बल यांनीही नमूद केले की, नाईक याचे भव्य स्वागत करणे इस्लामाबादशी शांततापूर्ण संबंधांचे समर्थन करणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे.