करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा जगभरात सध्या सर्वाधिक संसर्ग सुरू आहे. त्याच जातकुळीतील आधीचा उपप्रकार असलेला पिरोला अथवा बीए.२.८६ हा इतर उपप्रकारांपेक्षा धोकादायक असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. तो पहिल्यांदा जुलै २०२३ मध्ये आढळला होता. अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. बीए.२.८६ हा मानवी पेशींना अधिक प्रभावीपणे संसर्ग करून शकतो. त्याचबरोबर तो फुफ्फुसातील पेशींना हानी पोहोचवू शकतो. ओमायक्रॉनच्या आधीच्या करोना उपप्रकारांप्रमाणे तो जीवघेणा असल्याचेही संशोधनातून उघड झाले आहे.
संशोधन नेमके काय?
ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी प्रयोगशाळेत बीए.२.८६चा नवीन विषाणू तयार केला. तो अजिबात संसर्गजन्य नव्हता. त्यावर त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यात तो मानवासाठी अधिक धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. जर्मनी आणि फ्रान्समधील संशोधकांनीही हाच निष्कर्ष काढला आहे. करोनाचे आधीचे उपप्रकार हे प्रामुख्याने फुफ्फुसातील पेशींना हानी पोहोचवत होते. बीए.२.८६ हा उपप्रकारही त्याचप्रमाणे फुफ्फुसातील पेशींवर हल्ला करीत आहे. तो वेगाने पसरतो आणि प्रतिकारक शक्तीला दाद देत नाही. त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ओमायक्रॉनच्या जातकुळीतील इतर उपप्रकारांपेक्षा हा अधिक धोकादायक आहे.
हेही वाचा : विश्लेषण : कापसाचे अर्थकारण कसे बिघडले? शेतकरी कापूस का पेटवून देत आहेत?
संसर्गाची तीव्रता किती?
ओमायक्रॉनच्या जातकुळीतील सुरुवातीचे उपप्रकार हे आधीच्या करोना उपप्रकारांपेक्षा तुलनेने सौम्य मानले जातात. मात्र, सर्व संशोधकांचे यावर एकमत नाही. कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आधीच्या उपप्रकारांचा संसर्ग होऊन गेलेला असतो. त्यामुळे ओमायक्रॉनच्या उपप्रकारांची तीव्रता एवढी जाणवत नाहीत. याचबरोबर लसीकरण झाल्यामुळेही त्यांची तीव्रता कमी दिसून येते. ओमायक्रॉनचे उपप्रकार वरच्या श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करीत होते. खालील श्वसन मार्गांमध्ये त्यांचा संसर्ग दिसून येत नव्हता. त्याआधीचे उपप्रकार अधिक धोकादायक स्वरूपाचे होते. आता ओमायक्रॉनच्या बीए.२.८६ उपप्रकाराची तीव्रता जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यापासून उत्परिवर्तित झालेला उपप्रकार जेएन.१ हा जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. अमेरिकेत एकूण करोना रुग्णांमध्ये जेएन.१चे ६२ टक्के रुग्ण आहेत. आधीच्या डेल्टा प्रकाराएवढाच बीए.२.८६ धोकादायक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
लसीकरणाचा फायदा किती?
ओमायक्रॉनच्या जातकुळीतील अधिक धोकादायक नवीन उपप्रकार तयार होत आहेत. त्यामुळे अमेरिकेसह जगभरात करोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. करोना संसर्गानंतरच एखाद्या व्यक्तीला विशिष्ट आजार सुरू झाला, असे निदान करणेही अवघड असते. कारण लसीकरणाचा प्रभाव कमी झालेला असतो. आधी झालेला संसर्ग आणि लसीकरण यामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती नवीन संसर्ग रोखत असते अथवा त्याची तीव्रता कमी करीत असते. करोना लशीची बूस्टर मात्रा घेण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. लसीकरणामुळे मिळालेली रोगप्रतिकारकशक्ती तीन ते सहा महिन्यांनंतर कमी होत जाते.
मानव, प्राण्यांतील करोना एकत्र आल्यास?
मानवातील करोना विषाणू आणि प्राण्यांतील करोना विषाणू एकत्र येऊन नवीन विषाणूची निर्मिती झाल्यास आणखी एक महासाथ येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. करोनाच्या आधीच्या प्रकारांपेक्षा ओमायक्रॉन हा अधिक वेळा उत्परिवर्तित झालेला आहे. तो प्राण्यांमधून आला असून, नंतर मानवात पसरला आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. करोनाचे इतर प्रकार हे मानवात दीर्घकालीन संसर्गातून विकसित झाले आहेत. ओहायोमध्ये काही हरणांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आला होता. त्यामुळे प्राण्यातून हा विषाणू आणखी उत्परिवर्तित होऊन पुन्हा मानवाला संसर्ग होण्याचा धोका संशोधकांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर करोना विषाणू आणि इतर एखादा विषाणू एकत्र येऊन नवीन धोकादायक विषाणूची निर्मिती होण्याची भीतीही आहे.
हेही वाचा : विश्लेषण : गुटखाबंदी यशस्वी का होत नाही?
जेएन.१चा धोका किती?
जेएन.१ नेमका किती धोकादायक यावर अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. मात्र, बीए.२.८६ प्रमाणे तो फुफ्फुसातील पेशींना हानी पोहोचवणारा असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. ओमायक्रॉनच्या बीए.२.८६ उपप्रकारामध्येही हीच वैशिष्ट्ये काही प्रमाणात दिसून आली होती. त्यामुळे जेएन.१ हा फफ्फुसातील पेशींना संसर्ग करून रोगाची तीव्रता वाढवू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे जेएन.१चा संसर्ग वाढला असला, तरी त्याचे मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम किती होतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
sanjay.jadhav@expressindia.com