गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये करोना विषाणूचा प्रसार वाढताना दिसतोय. परिणामी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना एन्फ्लुएंझासारखे आजार झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल आहेत. अशा रुग्णांची योग्य ती चाचणी करून या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. करोना विषाणूच्या जेएन-१ या नव्या उपप्रकारामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचे जेएन-१ (JN-1) हे रुप नेमके काय आहे? करोनाची महासाथ पुन्हा येण्याची शक्यता आहे का? अशा स्थितीत सामान्य नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? हे जाणून घेऊ या…
केंद्र सरकारचे राज्य सरकारांना निर्देश
केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. तसा आदेश जारी केला जाईल, असे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. करोना विषाणूच्या जेएन-१ नावाच्या उपप्रकराचा संसर्ग वाढल्यामुळे सध्या ही काळजी घेतली जात आहे. केरळ राज्यामध्ये नियमित चाचण्यांदरम्यान करोनाचा हा उपप्रकार समोर आला आहे. तशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सिंगापूरहून तामिळनाडू राज्यात आलेल्या काही प्रवाशांची चाचणी केल्यानंतर त्यांच्याही शरीरात करोनाच्या जेएन-१ या उपप्रकराचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. गोव्यातही जेएन-१ उपप्रकाराचा संसर्ग झालेले एकूण १५ रुग्ण आढळले आहेत.
जेएन-१ उपप्रकार काय आहे?
जेएन-१ हा करोना विषाणूच्या बीए.२.८६ (BA.2.86 ) या उपप्रकाराचाच एक भाग म्हणता येईल. खरं म्हणजे जेएन-१ हा उपप्रकार नवा नाही. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जेएन-१ या उपप्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता. जगात हा उपप्रकार २०२३ सालाच्या जानेवारी महिन्यातच आढळला होता.
जेएन-१ या उपप्रकारावर संशोधकांचे लक्ष
करोना विषाणूच्या पिरोला या उपप्रकारशी तुलना करायची झाल्यास जेएन-१ या या विषाणूच्या स्पाईक प्रोटीनवर फक्त एक अतिरिक्त उत्परिवर्तन (म्यूटेशन) झालेले आहे. सध्या जेएन-१ या उपप्रकारावर संशोधक नजर ठेवून असून त्यांचा अभ्यास सुरू आहे. करोनाच्या पिरोला उपप्रकाराने आपल्यात एकूण ३० उत्परिवर्तन घडवून आणलेले आहेत.
जेएन-१ मुळे करोना रुग्णांत वाढ होऊ शकते का?
करोना विषाणूच्या जेएन-१ उपप्रकारामुळे करोनाचा प्रसार अधिक वेगाने होईल किंवा गंभीर लक्षणांचे प्रमाण वाढेल, हे सांगणारा कोणाताही पुरावा सध्यातरी आढळलेला नाही. उत्परिवर्तनामुळे पिरोला विषाणू मानाच्या शरीरात असलेल्या प्रतिकार शक्तीवर मात करेल, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट ज्या लोकांना करोना विषाणूची एकदा लागण झालेली आहे किंवा ज्या लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे, त्यांनी पिरोला आणि जेएन-१ उपप्रकारावर मात केलेली आहे, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पिरोला आणि जेएन-१ हे उपप्रकार चिंताजनक या प्रकारात मोडत नाहीत.
अमेरिका, सिंगापूर, चीनमध्ये करोना संसर्ग वाढला
जगभरात गेल्या काही दिवसांपासून पिरोला आणि जेएन-१ या उपप्रकारामुळे करोना रुग्णांच्या संख्येत निश्चितपणे वाढ झालेली आहे. अमेरिका, सिंगापूर, चीन तसेच काही युरोपीन देशांत या दोन्ही उपप्रकारांमुळे करोना संसर्ग झालेले अनेक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत करोना संसर्गाच्या प्रसारामागे जेएन-१ उपप्रकाराचा ससंर्ग होण्याचे प्रमाण हे १५ ते २९ टक्के आहे.
“…असे ठोसपणे सांगता येणार नाही”
सिंगापूरमध्ये ४ ते १० डिसेंबर या काळात एकूण ५६ हजार ४३ करोना रुग्ण आढळले आहेत. या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढलेले आहे. यातही ज्या लोकांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने तेथील करोना स्थितीबद्दल सविस्तर सांगितले आहे. “जेएन-१ किंवा बीए.२.८६ या उपप्रकारांमुळे करोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागतिक तसेच स्थानिक डेटानुसार बीए.२.८६ किंवा जेएन-१ हे दोन्ही उपप्रकार अधिक संसर्गजन्य आहेत किंवा या उपप्रकारांमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे, असे ठोसपणे सांगता येणार नाही,” असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
पुन्हा लसीकरणाची गरज आहे का?
करोनाच्या जेएन-१ उपप्रकारामुळे पुन्हा एकदा नव्याने करोना लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. ज्या लोकांनी करोना लस एका वर्षापूर्वी घेतलेली आहे, अशा लोकांना करोना संसर्गामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात जाण्याची शक्यता ही १.६ पट अधिक आहे. तसे सिंगापूरच्या डेटातून स्पष्ट झाले आहे. भारतात मात्र मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे. तसेच अनेकांना कोणतेही लक्षणं नसलेल्या करोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे. त्यामुळे भारतात लोकांचे करोनाच्या या नव्या विषाणूपासून संरक्षण होण्याचे प्रमाण अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
“भारतात आणखी अद्ययावत लसीची गरज नाही”
“भारतातील प्रत्येक नागरिकाला कमीत कमी दोन किंवा तीन वेळा करोनाची लागण झालेली आहेत. बऱ्याच नागरिकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे भारतातील बऱ्याच लोकांत करोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. भारतात आणखी अद्ययावत लसीची गरज नाही,” असे अशोका विद्यापीठाच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसमध्ये बायोसायन्स अँण्ड हेल्थ रिसर्चचे अधिष्ठाता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्स-कोव्ह-२ विषाणू उत्क्रांतीच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.
स्वत:चे संरक्षण कसे करावे?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार Sars-CoV-२ ची नवनवी रुपे भविष्यातही येतच राहतील. मात्र श्वसनयंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण करण्यासाची पद्धत एकच राहील. तुमच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढल्यास गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावे. मोगळी हवा असलेल्या ठिकाणी राहिल्यास करोना संसर्गाची शक्यता कमी होते. वारंवार हात धुवायला हवेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.