देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा एक मार्चपासून सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली. अद्यापही सर्वसामान्यांच्या मनामध्ये लसीच्या दुष्परिणामांचा म्हणजेच साईड इफेक्टचा संभ्रम कायम आहे. लसीच्या साईड इफेक्टची भीती अनेकांच्या मनात आहेत. भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र ‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेण्याआधी या दोन्ही लसींचे साईड इफेक्ट काय आहेत हे लोकांना जाणून घ्यायचे आहेत. ‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’ घेतल्यानंतर त्याचे शरीरावर काय परिणाम दिसून येतात हे अनेकांना जाणून घ्याचं आहे. त्याचसंदर्भातील हा विशेष लेख ज्यामध्ये कंपन्यांनी तसेच सरकारने लस कोणी घ्यावी किंवा कोणी घेऊ नये याबद्दलची माहिती दिली आहे.
सरकारने ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ दोन्ही लसी या सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. मात्र या दोन्ही लसींचे काही सर्वसामान्य साईड इफेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर लस घेतल्यानंतर काय साईड इफेक्ट दिसून येतात यासंदर्भात फॅक्ट शीट म्हणजेच माहितीपत्रक शेअर केलं आहे.
‘कोव्हॅक्सिन’ कोणी घेऊ नये?
> ज्या लोकांना एलर्जी, ताप, रक्ताशी संबंधित आजार असणाऱ्यांनी किंवा रक्तची घनता कमी (पातळ रक्त) असणाऱ्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ घेऊ नये.
> रोगप्रतिकारशक्तीवर प्रभाव टाकणारी कोणतीही औषधं सुरु असणाऱ्या व्यक्तींनी ही लस घेऊ नये.
> गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनी किंवा नुकतीच इतर कोणतीही लस घेतलेल्या माहिलेने किंवा कोणत्याही व्यक्तीने ही लस घेऊ नये असा सल्ला देण्यात आलाय.
> लसीकरण केंद्रावर ज्यांच्या देखरेखीखाली लसीकरण केलं जात आहे त्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीनंतर त्यांनी लस घेऊ नये असं सांगितल्यास लस घेणे टाळावे.
‘कोव्हॅक्सिन’चे साइड इफेक्ट काय आहेत?
> ‘कोव्हॅक्सिन’चे सौम्य साइड इफेक्ट दिसून येतात. यामध्ये लसीचे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणं, सूज येणं, लाल रंगाचा डाग पडणं, दंड ठणकणे, इंजेक्शन लावण्यात आलेला हात अशक्त होणं, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अस्वस्थ वाटणं, अशक्तपणा, उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात.
> लस घेतल्याने एखाद्या व्यक्तीवर गंभीर प्रकारचे दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता कमी असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. गंभीर परिणांमध्ये श्वास घेण्यास तार्स होणे, चेहरा सुजणे, हृदयाची धडधड वाढणे, अंगदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसू शकतात.
‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?
> सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने शेअर केलेल्या फॅक्टशीटमध्ये ज्या व्यक्तींना कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थामुळे किंंवा लसीमुळे एलर्जीचा गंभीर (एनाफिलेक्सिसचा) त्रास होतो त्यांनी लस घेऊ नये असं म्हटलं आहे.
> ज्यांना वारंवार ताप येते किंवा ज्यांच्या रक्तामध्ये ताप उतरलेला असतो किंवा रक्त पातळ असण्याची समस्या असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ घेणं टाळावं.
> इम्यूनोकॉम्प्रमाइज लोकांनी म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होणारी औषधं घेणाऱ्यांनाही ‘कोव्हिशिल्ड’ घेऊ नये.
> जी महिला गरोदर आहे किंवा गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहेत त्यांची लस घेऊ नये.
> गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनी ‘कोव्हिशिल्ड’चा डोस घेऊ नये
> ज्या लोकांनी आधीच करोनाची दुसरी लस घेतली आहे त्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ घेऊ नये
> ज्या व्यक्तींना ‘कोव्हिशिल्ड’च्या पहिल्या डोसमुळे एलर्जीचा त्रास झाला होता त्यांनी पुढचा डोस घेऊ नये. यासंदर्भातील माहिती केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांना द्यावी
‘कोव्हिशिल्ड’चे साइड इफेक्ट काय आहेत?
> ‘कोव्हिशिल्ड’च्या सर्वसामान्य साइड इफेक्ट्समध्ये अंगदुखी, ताप, लस घेतलेल्या ठिकाणी सुजणे, खाज येणे, त्वचा लाल पडणे या लक्षणांचा समावेश आहे.
> सामान्यपणे लस घेणाऱ्यांना अशक्तपणा, थकवा जाणवतो. थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी, आजारी असल्यासारखं वाटणं, सांधेदुखी किंवा स्नायू दुखणे यासारखा त्रास होऊ शकतो.
> इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी गाठ आल्याप्रमाणे सूजणे, ताप, उलट्या, फ्लूसारखी लक्षणंही काहीजणांना दिसू शकतात.
> फ्लू सारख्या लक्षणांमध्ये ताप येणे, घशात खवखवणे, वाहते नाक, खोकला, थंडी यासारखी लक्षणं जाणवतात.
> अगदीच गंभीर साइड इफेक्टमध्ये चक्कर येणे, कमी भूम लागणे, पोटात दुखणे, जास्त घाम येणे, सतत खाज येणे अशी लक्षणं दिसतात.
साइड इफेक्ट दिसल्यास काय कराल
‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेंन्शन’ने दिलेल्या माहितीनुसार जर अंगदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर संबंधित व्यक्तीने त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ओव्हर द काऊण्टर औषधे घेण्यासंदर्भात म्हणजेच इबुप्रोफेन, अॅस्पिरिन, अॅण्टीथिस्टेमाइस किंवा एसिटामिनोफेनसारख्या कोणत्याही पेन किलर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्या घ्याव्यात की नाही याबद्दलचा निर्णय घेऊ शकता. लस घेण्याआधीच अशाप्रकारच्या गोळ्या घेऊ नये कारण यामुळे गंभीर स्वरुपाचे साइड इफेक्ट होऊ शकतात.