आज जग वेगाने पुढे जात आहे. पूर्वी काळ वेगळा होता. पूर्वी पती नोकरी किंवा व्यवसाय करायचा, तर पत्नी घर आणि मुलाबाळांना सांभाळायची. पण, आता काळ बदलतो आहे. आज पती आणि पत्नी दोघेही आपल्या करिअरसह मुलांचा सांभाळ करताना दिसत आहेत. मुलांचा सांभाळ करणे नक्कीच एक आव्हान आहे. एकत्रित कुटुंबात आजी-आजोबांच्या आणि परिवारातील इतर सदस्यांच्या सानिध्यात आज अनेक मुले लहानाची मोठी होत आहेत. परंतु, कोणावरही विसंबून राहणे पसंत न करणारे जोडपे आज मुलांचा सांभाळ करण्यासाठी भाड्याने पालक ठेवत आहेत. चीनमधील ‘प्रोफेशनल पॅरेंट’ ही संकल्पना नक्की काय आहे? त्यामागील नेमके कारण काय? त्याचा मुलांवर कसा प्रभाव होतो? याविषयी जाणून घेऊ.
‘प्रोफेशनल पॅरेंट’ म्हणजे नक्की काय?
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या मते, देशातील उच्चभ्रू लोक आपल्या मुलांसाठी ‘प्रोफेशनल पॅरेंट’चा पर्याय निवडत आहेत. ‘प्रोफेशनल पॅरेंट’ मुलांची काळजी घेतात आणि त्यांच्या शैक्षणिक व भावनिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे ‘प्रोफेशनल पॅरेंट’ आया किंवा शिक्षकांच्या भूमिकांच्या पलीकडे जाणारे कर्तव्ये पार पाडतात. उदाहरणार्थ, चोंगक्विंगमधील सॉन्ग सियू नावाच्या लहान मुलासाठी भाड्याने ठेवलेले पालक संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३० पर्यंत काम करतात, गृहपाठात मदत करतात आणि मुलाला फुटबॉल, तलवारबाजी, पोहणेआदींमध्येही मदत करतात.
चीनमध्ये यांना मुलांचे साथीदार म्हणजेच ‘बाल साथीदार’ असे नाव देण्यात आले आहे. भाड्याने ठेवले जाणारे पालक खर्या पालकांच्या जबाबदाऱ्यादेखील सांभाळतात. जसे की, भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय भेटींमध्ये उपस्थित राहणे. त्यांच्या कामाची वेळ खरे पालक निर्धारित करतात आणि त्यांच्या सोयीनुसार वेळेत बदलही करतात. एका मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याने शेकडो मुलांच्या साथीदारांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आश्चर्यकारक माहिती उघड केली. मुलांच्या अनेक साथीदारांनी हार्वर्ड, केंब्रिज, सिंघुआ आणि पेकिंग विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याकडे प्रगत पदव्या आहेत, त्यांना वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे खेळांमधील कौशल्याचे ज्ञानही आहे. त्यांच्यापैकी काहींना बाल मानसशास्त्राविषयीचीही माहिती आहे.
पगारही लाखांच्या घरात
भाड्याने ठेवण्यात येणार्या पालकांचे पगारही लाखांच्या घरात आहेत. त्यांचे वेतन दरमहा १,४०० डॉलर्स ते ४,१०० डॉलर्सपर्यंत आहे (अंदाजे १,१७,००० रुपये ते ३,४३,००० रुपये), अशी माहिती ‘फिनिक्स न्यूज’च्या वृत्तात देण्यात आली आहे. नॅशनल टीव्ही ब्रॉडकास्टर ‘सीसीटीव्ही’च्या वृत्तानुसार, त्यांची एक विशिष्ट यंत्रणा आहे. श्रीमंत कुटुंबांद्वारे थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांना नियुक्त केले जाते. सामान्यत: १.४ दशलक्ष डॉलर्स (११ कोटी रुपये) पेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या उच्चभ्रू कुटुंबांद्वारे या सेवांची मागणी केली जाते. हे पालक आपल्या मुलांसाठी उच्च दर्जाची काळजी घेण्याच्या उद्देशाने आणि कोणावरही अवलंबून न राहण्याच्या उद्देशाने, हा पर्याय निवडत असल्याची माहिती आहे.
महिलांची मागणी जास्त
चायनीज वृत्तपत्र ‘सदर्न वीकली’च्या वृत्तानुसार, यात महिला व्यावसायिकांना जास्त मागणी आहे. शूरा नावाच्या एका ‘बाल साथीदार’ महिलेने वृत्तपत्राला सांगितले की, मुलांचे संगोपन आई जास्त चांगले करू शकते, असा आजही लोकांचा समज आहे. त्यामुळे या व्यवसायात महिलांचे वर्चस्व जास्त आहे आणि वडिलांच्या भूमिकेसाठी पुरुषांची मागणी कमी आहे. ती म्हणाली, “सहसा मुलांच्या क्रीडा विकासासाठी म्हणून कुटुंब पुरुषांची निवड करतात. परंतु, अनेक पालक पुरुषांना नकार देतात. कारण त्यांना वाटते की, पुरुष त्यांच्या मुलींची काळजी घेण्यासाठी योग्य नसतील.” परंतु, चीनमधील या संकल्पनेचा तोटाही आहे. कारण मुले त्यांच्या स्वतःच्या पालकांपेक्षा त्यांच्या साथीदारांशी भावनिकरित्या जोडले जाऊ शकतात.
अशाच एका प्रकरणात, सुसू नावाच्या महिलेने एका मुलाची बाल साथीदार म्हणून काम केले. ती मुलाच्या जेवणाचे नियोजन करायची, गृहपाठात मदत करायची, त्याला सायकल चालवायला, बास्केटबॉल खेळायला शिकवायची आणि त्यांच्यात अनेकदा भावनिक संभाषणही व्हायचे. एकदा त्याच्या आईशी भांडण झाल्यावर मुलाने या महिलेला सांगितले, “मला माझी आई आवडत नाही, तू माझी आई व्हावी अशी माझी इच्छा आहे.”
हेही वाचा : ‘या’ देशात एक कात्री गायब झाल्याने ३० हून अधिक उड्डाणे रद्द; नेमकं प्रकरण काय?
‘प्रोफेशनल पॅरेंट’ खर्या पालकांची जागा घेऊ शकतात का?
‘प्रोफेशनल पॅरेंट’ खर्या पालकांची जागा घेऊ शकतात की नाही, या विषयावर लोकांचे मतमतांतर पाहायला मिळाले. ‘वेबो’ नावाच्या एका सोशल मीडिया वेबसाईटवर एका वापरकर्त्याने लिहिले की, “आपण त्यांना ‘प्रोफेशनल पॅरेंट’ म्हणू नये. ते काही विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ‘पालक’ या शब्दाचा खूप खोल आणि भावनिक अर्थ आहे.” मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील कौटुंबिक शिक्षणतज्ज्ञ पॅन लॅन यांनी ‘एससीएमपी’ला दिलेल्या मुलाखतीत ही भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “असे बाल साथीदार खऱ्या पालकांच्या सहवासाची जागा घेऊ शकत नाहीत. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या निरोगी विकासासाठी त्यांच्या खर्या पालकांचे प्रेम आवश्यक आहे.”