कोविड १९ म्हणजे करोनाच्या आजारावर सध्या तरी कुठलीही लस दृष्टिपथात नाही, त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. करोना विषाणू नवीन नाही कारण याआधी सार्स सीओव्ही १ विषाणूचा प्रसार आपण अनुभवलेला आहे, त्यामुळे करोनाच्या प्रतिबंधासाठी लशी तयार करण्यात माणसे गाफील राहिली त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत या परिस्थितीतही बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तद्रवाचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे अर्थात ही युक्ती नवीन नाही. विषाणूजन्य आजारात पूर्वीही त्याचा वापर केला जात होता, युक्ती जुनी असली तरी ती नव्या विषाणूत वापरताना त्याची शहानिशा करावी लागते. त्यामुळे करोनावर ही युक्ती वापरताना कुठले नियम पाळायचे हे आता ठरलेले आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव थेट गंभीर रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर तो लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो फक्त यात बऱ्या झालेल्या रुग्णांचे रक्तगट जुळणे व त्या दात्याची रक्तद्रव देण्याची तयारी महत्वाची असते. जगात आता दीड लाखाहून अधिक बळी गेले असून २२ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. भारतातही मुंबई, इंदूरसह काही शहरात परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपचारांसाठी बऱ्या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्यात येणार आहे. या पद्धतीला रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे ब्लड प्लाझ्मा थेरपी म्हणतात. १६ एप्रिल रोजी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. तशी पहिली चाचणी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अ‍ॅड टेक्नॉलॉजी या संस्थेत होणार आहे. दिल्ली, गुजरात, केरळ व महाराष्ट्र ही राज्ये ही उपचार पद्धत वापरण्यास सज्ज आहेत. ही रक्तद्राव (प्लाझ्मा) उपचार पद्धती नेमकी काय आहे हे आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे काय ?
करोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बरे झालेल्या रुग्णातील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसºया रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. यालाच रक्तद्रव उपचार पद्धती म्हणतात. बºया झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेले प्रतिपिंड नवीन रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते.

करोना विषाणू विरोधात ही पद्धत उपयुक्त आहे काय ?
या उपचार पद्धतीने चीनमध्ये तर फायदा झाला आहेच पण अमेरिकेत अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण बरे झाले आहेत त्यात भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश आहे. या उपचार पद्धतीत बºया झालेल्या रुग्णाचे ८०० मि.ली रक्त घेतले जाते त्यातून रक्तद्रव वेगळा काढून तो गंभीर रुग्णास टोचला जातो पण तसे करण्यापूर्वी रक्त देणारा रुग्ण बरा होऊन त्याची पंधरा दिवसांनी परत चाचणी करुन ती सकारात्मक येणे गरजेचे असते शिवाय त्याच्या रक्तात विषाणू मारणारे प्रतिपिंड आहेत का याचा शोध घेतला जातो. जेव्हा एखादा विषाणू मानवी शरीरात घुसून हल्ला करतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती प्रणाली त्याविषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार करते, बºया झालेल्या रुग्णात हे प्रतिपिंड तयार झालेले असतात त्यामुळे त्या व्यक्तीचा रक्तद्रव हे दुसºया गंभीर रुग्णांसाठी परिणामकारक औषध ठरते. रुग्णाच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण होण्याची क्षमता ही त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती किती आहे यावर ठरते, असे गुरगाव येथील फॉर्टिस मेमोरियल रीसर्च इन्स्टिट्यूटच्या सल्लागार नेहा गुप्ता यांनी म्हटले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णातही हे प्रतिपिंड तयार होत असतात नंतर रोग तीव्र होतो तेव्हा प्रतिकारशक्ती कमी पडू शकते.

बऱ्या झालेल्या रुग्णाचाच रक्तद्रव का वापरतात ?
जेव्हा संसर्ग होतो तेव्हा माणसाच्या रक्तात प्रथिनांच्या रुपात काही प्रतिपिंड तयार होतात ते विषाणूवर हल्ला करतात. हे प्रतिपिंड बºया झालेल्या रुग्णाच्या रक्तात तरंगत असतात. काही महिने हे प्रतिपिंड त्या व्यक्तीच्या रक्तद्रवात असतात. त्यांच्यात विषाणू मारक क्षमता असते त्यामुळे बºया झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव वापरतात.

करोनातून वाचलेल्या रुग्णात प्रतिपिंड किती काळ राहतात?
बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंड किती काळ राहतात हे माहिती नाही. सध्या तरी त्याबाबत प्रयोग चालू आहेत.

रक्तद्रव कसा दिला जातो?
रक्तदानासारखीच रक्तद्रव दान करणे ही एक क्रिया असते. त्याला तासभर लागतो. रक्तद्रव दात्याला एक छोटेसे यंत्र लावले जाते त्यातून रक्त द्रव घेतला जातो. त्याजोडीला तांबड्या रक्तपेशी परत शरीरात सोडल्या जातात. नेहमीच्या रक्तदानासारखा हा प्रकार नाही कारण रक्तदान कितीवेळा करावे याला मर्यादा असतात. तांबड्या रक्तपेशी पूर्ववत झाल्याशिवाय पुन्हा रक्तदान करायचे नसते रक्तद्रवाचे दान आठवड्यातून दोनदा करता येते.

रक्तद्रव उपचार पद्धती इतर उपचारांपेक्षा करोनात फलदायी आहे का ?
या पद्धतीने रुग्णाला बरे वाटते याचे पुरावे नसले तरी अमेरिकेत या पद्धतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. चीनमध्येही ही पद्धत यशस्वी ठरली आहे. कोविड १९ रुग्णांमध्ये सध्या तरी हे प्रयोगच चालू आहेत.

ही पद्धत यापूर्वी केव्हा वापरली गेली होती का ?
रक्तद्रव उपचार पद्धत ही १९१८ मधील स्पॅनिश फ्लूमध्ये वापरण्यात आली होती. इबोला साथीच्या वेळीही २०१३ मध्ये ती वापरण्यात आली. २००३ मध्ये सिव्हीयर अ‍ॅक्युट रिस्पेरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्सच्या साथीतही त्याचा वापर झाला. अजूनही सार्सवर लस निर्माण करता आलेली नाही. रक्तद्रव उपचारांचा वापर गोवर, जीवाणूजन्य न्यूमोनिया. इतर संसर्गात या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक उपचार उपलब्ध होईपर्यंत ही उपचार पद्धती वापरणे योग्य ठरते.

करोना विषाणूवर रक्तद्रव वापराच्या चाचण्या कशा होत आहेत ?
आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांच्यात करोना संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यांच्यासाठीही ही पद्धत वापरली जाऊ शकते. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्था वाचलेल्या लोकांमधील प्रतिपिंडांची पातळी अभ्यासत आहेत. प्रतिपिंडांचा अभ्यास करून लसही तयार करण्याचे प्रयत्न बीजिंगमधील सिंगहुआ विद्यापीठाने केले आहेत. त्या प्रतिपिंडाची नक्कल करून औषधेही तयार करता येतात.

आतापर्यंत कुठल्या देशात ही पद्धत वापरण्यात आली आहे ?
अमेरिका, चीन, स्पेन, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, इटली, ब्रिटन यांनी ही पद्धत वापरली आहे. भारतात त्याचा वापर लवकरच सुरू होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 what is plasma therepy in coronavirus