– भक्ती बिसुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
करोना काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या माणसांसह लहान मुले घरात कोंडली गेली. शाळेसह बाहेरच्या जगाशी तुटलेला संपर्क, पालक कामात असल्याने पुरेसा वेळ न देऊ शकणे अशा अनेक कारणांनी मुले एकलकोंडी आणि चिडचिडी झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. मुलांमधील हे वर्तनबदल कसे हाताळावेत ही चिंता शिक्षक आणि पालकांमध्ये सध्या आहे.
मुलांमध्ये वर्तन बदल कशामुळे?
करोना महासाथीदरम्यान प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा अनेक क्षेत्रांवर थेट परिणाम झाला. याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असे अनेक पैलू आहेत. महामारीमुळे करोना आणि करोनानंतरचे दीर्घकाळ राहिलेले आजार हा एक भाग सोडल्यास मानसिक आरोग्यावरही महामारीचे अनेक परिणाम दिसून आले. शाळांना अचानक आणि दीर्घकाळ सुट्टी मिळाल्यामुळे सर्व वयोगटातील मुले घरात अडकून पडली. कधीही शाळा किंवा घराबाहेरच्या जगाशी संपर्क न आलेली प्रथमच शाळेत जाणारी मुले, शाळेत जाणारी मात्र दोन वर्षे शाळेपासून दुरावलेली मुले अशा सर्वांनाच घरात कोंडून राहण्याचा फटका बसला. त्यातून त्यांच्यात अनेक प्रकारचे वर्तन बदल दिसून आले.
वर्तनात बदल नेमके काय?
टाळेबंदीच्या काळात घरी अडकून पडलेल्या मुलांचा बाहेरील जग, शाळा, मैदान, मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांशी संपर्क तुटला. ज्या मुलांना रोज शाळेत जाण्याची सवय होती त्यांच्यासाठी घरी बसणे ही शिक्षा ठरली. त्यामुळे मुलांमध्ये वर्तनाशी संबंधित कंडक्ट डिसऑर्डर, अपोजिशनल डिफाइएंट डिसऑर्डर अशा समस्या दिसत आहेत. दीर्घकाळानंतर आता शाळा सुरू होताच खोटे बोलणे, घर किंवा शाळेतील शिस्त मोडणे, कुणाच्याही सांगण्याला न जुमानणे याकडे त्यांचा कल असतो. शाळेतील अभ्यास किंवा इतर उपक्रमांबाबत नावड, एकाग्रतेचा अभाव, एका जागी बसण्याबाबत असहकार, चंचलपणा तसेच चिंता आणि सतत एकच एक गोष्ट करत राहण्याचा वर्तनातील बदलही अनेक डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर येत आहे. काही मुले अतिक्रियाशील असल्याने लक्ष वेधून घेतात. किशोरवयीन मुलांमध्ये हिंसाचार आणि गुंडगिरी यांमध्ये वाढ झाली आहे. ज्या मुलांच्या आयुष्यात अद्याप शाळा हे दालनच उघडलेले नाही त्यांच्यामध्ये अकारण रडणे, व्यत्यय आणणे, घराबाहेरील जगाबाबत भीती, संकोच अशा गोष्टीही दिसून येत आहेत. काही लहान मुलांनी प्रथमच घरातील जवळच्या व्यक्तीच्या निधनाचा धक्का पचवला आहे. त्यामुळे एकटेपणा, दु:ख या गोष्टीही मुलांच्या वर्तनबदलाला कारणीभूत ठरत आहेत. वाद घालणे, चिडचिड, पालकांना दोष देणे, आरोग्याच्या तक्रारी अशा अनेक गोष्टींचा वर्तनबदलामध्ये समावेश आहे. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय दुखण्याच्या तक्रारी, पोटाचे विकार, झोप किंवा भूकेच्या तक्रारी या गोष्टीही वर्तनबदलांमध्ये दिसून येत आहेत.
मदत कोणाची घ्यावी?
मुलांमधील वर्तन बदलांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या भवतालाची मदत होणे शक्य आहे. आई-वडिल, कुटुंबीय, शेजारी, मित्रमैत्रिणी, भावंडे यांची मुलांना त्यांच्या कोषातून बाहेर काढण्यासाठी मदत होईल. मुलांचे दैनंदिन आयुष्य लवकरात लवकर करोनापूर्व आयुष्यासारखे होणे त्यांना वर्तन बदलाच्या समस्येतून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरेल. त्यासाठी घराबाहेर पडणे, क्रीडांगणे, बागांमध्ये जाणे यांसारख्या गोष्टी पुन्हा सुरु करणे, मुलांना त्यांच्या मित्र-मैत्रिणी, भावडांच्या भेटी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, वाचन, संगीत, कला, खेळ, व्यायाम यांसारख्या गोष्टींमध्ये मुलांचे मन रमवल्यास त्याचा उपयोग मुलांची मनःस्थिती पूर्ववत करण्यास होऊ शकेल असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
यावर उपाय काय?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख म्हणतात, की दोन वर्षांमध्ये विस्कळीत झालेली घडी बसण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल याचे भान पालक आणि शिक्षक दोघांनीही ठेवणे आवश्यक आहे. जी मुले शाळेत जात होती त्यांची शाळेत बसण्याची सवय मोडली आहे. ती पूर्ववत होईपर्यंत थोडा वेळ जाणार आहे. मुलांना शाळेत रुळण्यास वेळ देणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच परीक्षा, अभ्यास, गुण, श्रेणी याबाबत पाठपुरावा करत त्यांच्यावरील ताण वाढणार नाही हे पालकांनी पहावे. मुले वर्गात बसत नाहीत, टाळाटाळ करतात याबाबत शिक्षकांनी आपण शिकवलेले मुलांना कळत नसेल का, असा विचार करून स्वत:ला अपराधीपण देऊ नये. शाळेतील तासांमध्ये मुले गुंतलेली राहतील, त्यांना कंटाळा येणार नाही हे पाहावे. पालकांनी मुलांना योगासने, खेळ यांची गोडी लावावी. त्यांच्या झोपेच्या वेळा निश्चित ठेवाव्यात. गरज पडल्यास डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशक यांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
bhakti.bisure@expressindia.com