– भक्ती बिसुरे
करोना काळात लसीकरणाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. जानेवारी २०२१ पासून भारतात टप्प्या टप्प्याने करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण सुरू झाल्यापासून सर्वांचेच लक्ष जोखीम गट समजल्या जाणाऱ्या मुलांच्या लसीकरणाकडे लागले आहे. आजपासून देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी करोना लसीकरण खुले होत आहे. त्यानिमित्ताने या लसीकरण मोहिमेचा हा आढावा.
लसीकरण मोहिमेचा प्रवास
मागील वर्षी १६ जानेवारीला देशभरामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर, दुसऱ्या टप्प्यात सर्व आघाडीच्या क्षेत्रात काम करणारे म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधीग्रस्तांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. चौथ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांसाठी करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतरच्या टप्प्यात १५ ते १८ वर्षांच्या मुलांचा अंतर्भाव लसीकरण मोहिमेत करण्यात आला.
नवा लसीकरण टप्पा कोणासाठी?
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबरोबरच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी आजपासून वर्धक मात्रा देणे सुरू करण्यात येत आहे. वर्धक मात्रा लसीकरणासाठी सहव्याधी असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. देशात ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकारामुळे आलेली संसर्गाची तिसरी लाट नुकतीच ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनजीवनही मोठ्या प्रमाणावर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत असल्याने मुलांच्या पालकांमध्ये त्यांना शाळेत पाठवण्याबाबत असलेली धास्ती कमी होण्यास मदत होणार आहे.
मुलांसाठी कोणती लस?
१५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी सध्या हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीकडून विकसित करण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हैदराबादमधील बायोलॉजिकल इ लिमिटेड या कंपनीने तयार केलेली कोर्बिव्हॅक्स ही लस वापरण्यात येणार आहे. कोर्बिव्हॅक्स ही संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली पहिली रिसेप्टर बायंडिंग डोमेन प्रोटिन प्रकारातील लस आहे. २१ फेब्रुवारीला भारतीय औषध महानियंत्रक कार्यालयाने लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन मात्रा या स्वरूपात इंजेक्शनद्वारे ही लस टोचली जाणार आहे.
उत्पादक कंपनीने केंद्र सरकारला तब्बल पाच कोटी मात्रा पुरवल्या असून राज्यांना त्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
नावनोंदणी कशी करावी?
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी इतर सर्व वयोगटांप्रमाणे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची को-विन संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांवरदेखील थेट नावनोंदणी करून लस घेणे शक्य आहे. सरकारी केंद्रांवर लस पूर्णपणे मोफत असून खासगी केंद्रांवर लशीची उपलब्धता तपासून सशुल्क लस घेणे शक्य आहे.
लशीच्या सुरक्षिततेबाबत काय?
भारतात विकसित करण्यात आलेल्या कोर्बिव्हॅक्स लशीच्या सुरक्षिततेबाबत सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ही लस निवडण्यात आली आहे. या वयोगटातील मुलांवर केलेल्या चाचण्यांमध्ये कोर्बिव्हॅक्स लशीने करोना विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण केल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतरच लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. बायोलॉजिकल इ या कंपनीने तयार केलेली कोर्बिव्हॅक्स लस स्पाईक प्रोटिनवर बेतण्यात आली आहे. त्यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या शरीरात संसर्गाची तीव्रता कमी करणारी रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास ही लस प्रभावी ठरणार आहे. लशीच्या निर्मितीतील महत्त्वाचा प्रतिजन (अँटीजेन) टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिनेशन डेव्हलपमेंट आणि बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन यांच्यातर्फे विकसित करण्यात आला आहे.
कोणते परिणाम शक्य?
कोणत्याही लशीचे दिसतात तसे सौम्य परिणाम ही लस घेतल्यानंतर दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये लस टोचलेल्या जागी लाल होणे, किंचित सूज किंवा दुखणे, सौम्य ताप, अंगदुखी असे त्रास दिसणे शक्य आहे. हे सर्व त्रास लस घेतल्यानंतर दिसणारे सामान्य परिणाम असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. ही लस १२-१४ वयोगटातील मुलांना करोना विरुद्ध प्रतिकारशक्ती देण्यासाठी आवश्यक असून परिणामांच्या शक्यतेने घाबरून जाऊन लसीकरण टाळू नये, असेही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
bhakti.bisure@expressindia.com