-भक्ती बिसुरे
सध्या जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या बीए.४ आणि बीए.५ या प्रकारांमुळे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या पहिल्या दोन मात्रा आणि त्यानंतर उपलब्ध करून देण्यात आलेली तिसरी किंवा वर्धक मात्रा यामुळे बीए.४ आणि बीए.५ चा संसर्ग झालेल्या रुग्णांना असलेली लक्षणे सौम्य आहेत. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या लशी संसर्ग होण्यास प्रतिबंध करण्यासाठी पुऱ्या पडत नसल्याचे या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी, सध्या उपलब्ध असलेल्या करोना लशींमध्ये काही सुधारणा (‘अपडेट’) घडवून आणण्याची गरज व्यक्त होत आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन (अमेरिकन एफडीए) करोना लशींच्या अद्ययावतीकरणाची गरज आणि स्वरूप या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन करत आहे. जागतिक स्तरावरील अनेक तज्ज्ञांनी ‘व्हॅक्सिन अपडेट’ची गरज अधोरेखित केली आहे.
लस अद्ययावतीकरण म्हणजे काय?
विज्ञानाच्या आधारावर विषाणू प्रतिबंधात्मक लशी आणि विषाणूंना अवरोध करणाऱ्या औषधांची निर्मिती मानवाकडून करण्यात आली आहे. मात्र, या दोन्हींना तोंड देऊन विषाणूही स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी स्वत:च्या स्वरूपामध्ये बदल म्हणजेच म्युटेशन करत असतो, हे आपण करोना काळात पाहिले आहे. विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे त्या विषाणूने निर्माण केलेल्या आजाराचे स्वरूप, लक्षणे आणि तीव्रताही बदलते. उदाहरणार्थ, करोना विषाणूच्या डेल्टा या उत्परिवर्तनाने निर्माण केलेली दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत किती तरी अधिक तीव्र स्वरूपाची आणि गंभीर झालेली आपण अनुभवली. विषाणूतील बदलांमुळे आजाराचे स्वरूप, त्याची तीव्रता यांमध्ये होणाऱ्या बदलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी लशी अद्ययावत करण्याचा उपाय वैद्यक शास्त्राने शोधला आहे. गेली अनेक वर्षे इन्फ्लूएन्झाच्या बदलत्या स्वरूपात दरवर्षी होणारे बदल टिपून त्या बदलांना अवरोध करणारी इन्फ्लूएन्झाची लस जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्ययावत केली जाते. हे करताना त्या त्या लशीचा नागरिकांवर आणि कालांतराने त्या आजाराच्या स्वरूपावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. त्यातून दरवर्षी होणाऱ्या विषाणूच्या संभाव्य संक्रमणाला अवरोध करणारे अद्ययावतीकरण इन्फ्लूएन्झा लशीमध्ये केले जाते. त्याचा परिणाम म्हणून वर्षभर नागरिकांना इन्फ्लूएन्झाच्या सर्वात नवीन प्रकारांपासून संरक्षण मिळते. तशाच धर्तीवर करोना विषाणू प्रतिबंधात्मक लशीचे अद्ययावतीकरण करण्याची गरज सध्या व्यक्त होत आहे.
गरज नेमकी कशासाठी?
‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकाने करोना विषाणू बदल आणि त्या अनुषंगाने लशींचे अद्ययावतीकरण याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्या शोधनिबंधात ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड स्कूल ऑफ मेडिसिन’च्या विषाणूशास्त्रज्ञ मेगन डेमिंग यांनी लशीच्या अद्ययावतीकरणाची गरज अधोरेखित केली आहे. विषाणू आपल्या स्वरूपामध्ये सातत्याने बदल करत आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी विकसित केलेली लस ही करोना संसर्गावर कायमस्वरूपी संपूर्ण गुणकारी ठरेल असे नाही. त्याचवेळी सध्या उपलब्ध लशी या चीनमधील वुहानमध्ये सापडलेल्या विषाणूच्या रचनेवर बेतलेल्या असल्याने लशींचे अद्ययावतीकरण सोपे नसल्याचा इशाराही त्या देतात. सध्या ओमायक्रॉनचे प्रकार बीए.४ आणि बीए.५ सर्वत्र संसर्ग निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्याचा धोका कमी करण्यासाठी लस अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे ते अधोरेखित करतात.
अद्ययावतीकरण आव्हानात्मक?
करोना विषाणूचा स्वत:मध्ये बदल करण्याचा वेग विलक्षण आहे. त्यामुळे त्या वेगाशी जुळवून घेत, लशी अद्ययावत करणे हे खरे आव्हान असल्याचे जागतिक स्तरावरील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सांगतात. सध्या उपलब्ध लशी या करोनाच्या मूळ वुहान विषाणूवर आधारित आहेत. आगामी लस जर ओमायक्रॉन प्रकारावर आधारित असेल तर वर्षाअखेरीस त्या वापरात येईपर्यंत विषाणूचे स्वरूप आणखी कितीतरी बदललेले असण्याची शक्यता ‘यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी ॲण्ड इन्फेक्शिअस डिसिजेस’चे तज्ज्ञ जॉन बेगेल व्यक्त करतात. बेगेल हे व्हॅक्सिन अपडेट प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. भविष्यातील लशींची निर्मिती किंवा अद्ययावतीकरण करताना विषाणू उत्परिवर्तने आणि प्रतिबंध या विषयांचा व्यापक विचार करण्याची गरज ते व्यक्त करतात.
पर्याय काय?
साथरोग आणि लस क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते संक्रमण होत असलेल्या विषाणूच्या अधिकाधिक जवळची लस निर्माण करणे ही साथरोगाची तीव्रता आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वात आदर्श गोष्ट असेल. मात्र, लस अद्ययावत करताना तिची व्याप्ती वाढवण्यासाठी काय करायला हवे, यावर सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन आणि प्रयत्न सुरू आहेत. मॉडर्ना आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी ॲण्ड इन्फेक्शिअस डिसिजेसच्या संयुक्त प्रयत्नांतून मूळ करोना विषाणू आणि ओमायक्रॉनच्या बीए.१ वरील स्पाईक प्रोटिनच्या मिश्रणातून लस चाचणी करण्यात येत आहे. दुसऱ्या एका अद्ययावत लस चाचणीतून निर्माण झालेली प्रतिपिंडे ही बीए.१ विरोधात ७५ टक्के रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अद्ययावत करण्याचे प्रयत्न किती?
करोना प्रतिबंधासाठी निर्माण करण्यात आलेली पहिली मूळ लस ही सर्व अद्ययावत ओमायक्रॉन व्यतिरिक्त उत्परिवर्तनांविरुद्ध उपयुक्त ठरेल असे मानणे योग्य नाही. मॉडर्ना आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी ॲण्ड इन्फेक्शिअस डिसिजेसतर्फे लस अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेतील फायझर आणि जर्मनीतील बायोएनटेकतर्फे केवळ ओमायक्रॉनकेंद्री लस विकसित करण्यात आली असून त्याच्या चाचण्याही सुरू आहेत. सातत्याने बदलणाऱ्या विषाणूच्या रचनेमुळे हे अद्ययावतीकरण अवघड असले तरी अशक्य नाही. शिवाय येणाऱ्या काळात करोनाचे आव्हान रोखण्यासाठी सातत्याने हे अद्ययावतीकरण गरजेचे असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून सातत्याने अधोरेखित करण्यात येत आहे.