करोना विषाणूशी लढा देण्यासाठी अनेक प्रकारच्या लशी बाजारात आणल्या गेल्या होत्या. त्यातील कोव्हिशिल्ड ही भारतीय बनावटीची लस फक्त भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांमध्येही पुरविण्यात आली होती. मात्र, या कोव्हिशिल्ड लशीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या चार वर्षांत अ‍ॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. भारतामध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती. AZD1222 असे या लशीचे शास्त्रीय नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅस्ट्राझेनेकाने ही लस आणि ‘थ्रोब्मोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया’ (TTS) या शारीरिक समस्येमध्ये सहसबंध असल्याचे मान्य केले आहे. थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजेच TSS ही एक वैद्यकीय स्थिती असते. त्यामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची पातळी कमी होते आणि रक्तात गुठळ्या तयार होतात.

भारतात तयार करण्यात आलेल्या या लशीचे १७५ कोटींहून अधिक डोस भारतीयांना देण्यात आले आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेकाला न्यायालयामध्ये अशी कबुली देण्याची वेळ का आली? या लशीबाबत आणि TTS या वैद्यकीय स्थितीबाबत आतापर्यंत कोणत्या गोष्टी माहिती आहेत? ज्या भारतीयांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे; त्यांनी चिंता करण्याची खरेच गरज आहे का? याबाबत आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

हेही वाचा : विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?

अ‍ॅस्ट्राझेनेकाने नेमके काय म्हटले आहे?

ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या लशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. कोव्हिशिल्ड लशीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर कंपनीला उत्तर द्यावे लागले. या याचिकेवर उत्तर देताना कंपनीने स्पष्ट केले की, कोव्हिशिल्ड लशीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते. मात्र, हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

युनायटेड किंग्डममधील ‘द टेलीग्राफ’ या माध्यमसमूहाने अशी बातमी दिली आहे, “या प्रकरणी जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. एप्रिल २०२१ मध्ये लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्यामुळे मेंदूविकाराचे निदान झाले. त्यानंतर त्यांचे आयुष्य विस्कळित होऊन कामावर जाणेही बंद झाले.”

याच बातमीमध्ये पुढे असे नमूद करण्यात आले आहे, “ब्रिटनमधील उच्च न्यायालयामध्ये असे ५१ खटले दाखल करण्यात आले आहेत. लस घेतल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून पीडित अथवा त्यांच्या नातेवाइकांनी कंपनीकडे जवळपास १०० दशलक्ष पाऊंडची मागणी केली आहे.”

याआधी अ‍ॅस्ट्राझेनेकाने या दाव्यामधून आपले अंग काढून घेतले होते. “TSS ही समस्या जनुकांशी संबंधित आहे,” असा खुलासा त्यांनी केला होता. मात्र, सरतेशेवटी कंपनीने मान्य केले आहे की, क्वचित प्रसंगी लशीमुळेही TSS ची समस्या उदभवण्याची शक्यता आहे.

TTS ची लक्षणे काय आहेत?

TSS मध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे, छातीत अथवा हाता-पायांमध्ये वेदना होणे, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूला त्वचेवर लाल ठिपके येणे किंवा जखमा होणे, डोकेदुखी, शरीराच्या काही भागांमध्ये बधीरपणा येणे इत्यादी लक्षणे आहेत. TSS म्हणजे थोडक्यात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात आणि त्यातून ही लक्षणे दिसून येतात.

जॉन्स हॉपकिन्स मेडिसीन या वेबसाईटने, “रक्त गोठण्यामुळे धमन्या आणि शिरांमधील रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो. रक्ताच्या गुठळ्या नेमक्या कोणत्या भागात आहेत, यावर या समस्येची तीव्रता अवलंबून असते. या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक व श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.”

करोनाच्या तब्बल चार वर्षांनंतर या समस्या आताच का दिसत आहेत?

या समस्या येत असल्याच्या बातम्या याआधीही येत होत्या. मात्र, कोव्हिशिल्ड लशीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने पहिल्यांदाच दिली आहे. भारतामध्ये करोना लस वितरित करण्यापूर्वी सरकारने जानेवारी २०२१ मध्ये एक पत्रक जाहीर करून असे म्हटले होते, “ज्या व्यक्तींना थ्रोम्बोसायटोपेनियाची समस्या आहे त्यांना खबरदारी बाळगून ही लस दिली पाहिजे.”

कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लशी भारतामध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काहींना रक्तामध्ये गुठळ्या होण्याची समस्या जाणवल्यानंतर फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, बल्गेरिया, रोमानिया, एस्टोनिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग व लॅटव्हिया अशा काही युरोपियन देशांनी मार्च २०२१ मध्ये ही लस देणे तात्पुरते थांबविले होते.

त्यापुढील महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की, कोव्हिशिल्ड आणि वॅक्सझेव्हरिया या दोन लशी दिल्यानंतर TSS ची समस्या काहींना निर्माण होत आहे. मात्र, उपलब्ध डेटानुसार, कोव्हिशिल्ड व वॅक्सझेव्हरिया लशीमुळे TSS ची समस्या निर्माण होण्याचा हा धोका अत्यंत कमी वाटतो आहे. ब्रिटनमधील डेटा असे सांगतो की, लस घेतलेल्या २,५०,००० व्यक्तींपैकी एका व्यक्तीस हा धोका निर्माण होऊ शकतो; तर युरोपियन युनियन देशांमधील डेटानुसार १,००,००० पैकी एका व्यक्तीस ही समस्या येऊ शकते.

हेही वाचा : विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…

भारतातही अशी समस्या आढळून आली आहे का?

मे २०२१ मध्ये लस घेतल्यानंतर थ्रोम्बोइम्बोलिकची समस्या २६ लोकांमध्ये आढळून आल्याचे भारत सरकारने सांगितले होते. १६ जानेवारी २०२१ पासून भारतात लसीकरणास सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत जितक्या लशी दिल्या गेल्या आहेत; त्यामध्ये थ्रोम्बोइम्बोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. लस घेतलेल्या एक दशलक्ष व्यक्तींपैकी 0.00006 टक्के लोकांना ही समस्या निर्माण झाली आहे. लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांविषयीची माहिती गोळा करणाऱ्या सरकारी समितीने अशी माहिती दिली आहे की, कोव्हिशिल्डमुळे TTS झाल्याची किमान ३६ प्रकरणे नोंद झाली आहेत. या समितीने गेल्या वर्षी जूनमध्ये दिलेल्या शेवटच्या अहवालानुसार या ३६ पैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही शक्यता अत्यंत ‘क्वचित प्रसंगी’ उदभवू शकते, असे म्हटले होते. करोना लशीचा संसर्ग आणि त्यातून उदभवणारे मृत्यू कमी करण्याची क्षमता या लशीमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे अशा प्रकारची थ्रोम्बोइम्बोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अद्याप समोर आलेली नाही. पुढे आरोग्य मंत्रालयाने असेही नमूद केले होते की, दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या निर्माण होण्याची समस्या युरोपियन देशांच्या तुलनेत ७० टक्के कमी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covishield blood clots manufacturer astrazeneca thrombosis vsh