करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोणताही गोंधळ उडू नये तसेच सर्व नागरिकांना लसीचे डोस लवकर आणि कमी वेळेत मिळावेत म्हणून केंद्र सरकारने कोविन या पोर्टलची निर्मिती केली होती. याच पोर्टलचे एक अॅपदेखील जारी करण्यात आले होते. या अॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून भारतातील कोट्यवधी लोकांनी लसीसाठी नावनोंदणी केली होती. देशातील कोट्यवधी लोकांची माहिती या कोविनच्या पोर्टल आणि अॅपमध्ये उपलब्ध आहे. या माहितीचा अॅक्सेस सर्वसामान्यांना नाही. मात्र टेलिग्रामवर हा सर्व डेटा लिक झाल्याचा दावा केला जातोय. टेलिग्रम बॉटवर नागरिकांचा सर्व तपशील उपलब्ध होत असल्याचे सांगितले जातेय आणि म्हणूनच देशभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोवीन पोर्टलवरून खरंच डेटा लीक झाला का? भारत सरकारने याबाबत काय स्पष्टीकरण दिले? हे जाणून घेऊ या…
टेलिग्रामवर कोविन पोर्टलवरील डेटा लीक?
कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दावा सोमवारी (१२ जून) करण्यात आला. या डेटा ब्रीचमुळे टेलिग्रामवर भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. या दाव्यानुसार ज्या लोकांनी लस घेण्यासाठी कोविन अॅपच्या माध्यमातून नावनोंदणी केली होती त्यांच्या सर्वांची माहिती टेलिग्रामवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून आमची टीम खरंच डेटा लीक झाला का? हे तपासत आहे, असे सांगितले आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : क्रांतिकारक आणि कवी राम प्रसाद बिस्मिल कोण होते? काकोरी रेल्वे अॅक्शन मध्ये त्यांना फाशी का देण्यात आली ?
खरंच डेटा लीक झाला?
टेलिग्रामवर कोविन संकेतस्थळावरील सर्व डेटा लीक झाल्याचा दावा केला जात आहे. टेलिग्राम बोटवर मोबाईल क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, पासपोर्ट नंबर, मतदार ओळखपत्र, जन्मतारीख तसेच संबंधित व्यक्तीने कोणत्या ठिकाणी लस घेतली आहे, अशी सर्व माहिती उपलब्ध होत आहे, असे ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने सांगितले आहे. एकाच मोबाईल क्रमांवरून संपूर्ण कुटुंबासाठी लसनोंदणी केलेली असेल तर संपूर्ण कुटुंबाचीदेखील माहिती टेलिग्रामवर दिली जात आहे.
अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची माहिती लीक? तृणमूलच्या नेत्याचा दावा
या कथित दाव्यानंतर तृणमूल काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले यांनी ट्वीटद्वारे मोदी सरकारवर टीका केली आहे. “मोदी सरकारच्या काळात हा सर्वांत मोठा डेटा लीक झालेला आहे. लस घेतलेल्या सर्वच लोकांची खासगी माहिती उघड झाली आहे. यामध्ये आधार कार्ड क्रमांक, मतदान ओळख पत्र क्रमांक, कुटुंबीय अशी सर्वच माहिती टेलिग्राम बॉटवर उपलब्ध आहे. यामध्ये काही विरोध पक्षातील नेत्यांचीही माहिती देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबम, काँग्रेसचे नेते जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, राज्यसभेचे खासदार तथा तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन अशा काही नेत्यांचा यामध्ये समावेश आहे,” असा दावा साकेत गोखले यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
हेही वाचा >> तामिळनाडूतील जवानाच्या पत्नीला अर्धनग्न करून मारहाण? व्हिडीओनंतर खळबळ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
“आम्ही कथित टेडा लीकचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत”
टेलिग्राम बॉटवर कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दाव्याची भारत सरकारने दखल घेतली आहे. हा डेटा नेमका कोठून लीक झाला, त्याचे मूळ कोठे आहे, याची चौकशी आणि तपास केला जात आहे, असे सरकारने सांगितले आहे. “आम्ही या प्रकरणाची निश्चितच दखल घेतली आहे. हा डेटा कोविन पोर्टलवरून लीक झाला आहे, की अन्य ठिकाणाहून त्याचा आम्ही शोध घेत आहोत,” अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर टेलिग्रावरील संबंधित ग्रुपने बॉट ऑफलाईन केले आहे. या ग्रुपवर आता मोबाईल क्रमांक अपडेट केल्यावर आधार कार्ड क्रमांक सर्च होऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा >> दहशतवादासाठी केला जातोय महिला आणि मुलांचा वापर; जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैन्य अधिकाऱ्याने काय सांगितले?
केंद्र सरकारची भूमिका काय?
कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याच्या दाव्याला कोणताही आधार नाही. खोडसाळपणाने तशी अफवा पसरवली जात आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. “कोविन पोर्टल हे अत्यंत सुरक्षित आहे. या पोर्टलवरील डेटा सुरक्षित राहावा यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. याशिवाय पोर्टलवरील डेटा सुरक्षित राहावा यासाठी वेब अॅप्लिकेशन फायरवाल, अँटी- डीडीओएस, एसएसएल/टीएलएस, रेग्यूलार व्हलनेरेबिलीटी असेसेमेंट, आयडेन्टीटी अँड अॅक्सेस मॅनेजमेंट अशी खबरदारी घेण्यात आली आहे,” असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे.
ओटीपी असल्याशिवाय डेटा शेअर करता येत नाही, सरकारचा दावा
“प्रौढांच्या लसीकरणासाठी फक्त जन्म कोणत्या साली झालेला आहे, एवढीच माहिती घेण्यात आली होती. मात्र माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार टेलिग्राम बॉटवर लीक झालेल्या डेटामध्ये संपूर्ण जन्मतारखेचा उल्लेख करण्यात येत आहे. ओटीपी असल्याशिवाय लस दिलेल्या व्यक्तीचा डेटा कोणालाही शेअर करता येत नाही,” असा दावा सरकारने केला आहे. यासह कोविन पोर्टलवर कोणत्याही व्यक्तीचा पत्ता मागवण्यात आलेला नाही, असेही सरकारने सांगितले आहे.
हेही वाचा >> जयप्रकाश नारायण ते अरविंद केजरीवाल; रामलीला मैदानाने पाहिलेली लोकशाहीवादी आंदोलने कोणती?
टेलिग्राम बॉटवर अन्य ठिकाणाहून टेडा मिळवला जातोय- राजीव चंद्रशेखर
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. थेट कोविन पोर्टल, अॅपवरील डेटा लीक झाल्याचे वाटत नाही, असे चंद्रशेखर म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणाची इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआटी-इन) दखल घेतली आहे. टेलिग्राम बॉटवर अन्य ठिकाणाहून हा डेटा मिळवण्यात येत आहे. अगोदरच लीक झालेल्या डेटाच्या माध्यमातून टेलिग्रामवर डेटा लीक केला जात आहे. थेट कोविन अॅप किंवा डेटाबेसची सुरक्षा तोडण्यात आल्याचे मला वाटत नाही, असेही चंद्रशेखर म्हणाले.
टेटा लीक होऊ नये यासाठी त्रुटींवर काम करणे गरजेचे- पवन दुग्गल
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोविन पोर्टलच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. यातील सुरक्षा व्यवस्था कधीही तोडली जाऊ शकत नाही, असा दावा जानेवारी २०२२ मध्ये नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरएस शर्मा यांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात वकील असलेले आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. पवन दुग्गल यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “आमची व्यवस्था १०० टक्के सुरक्षित आहे, असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. त्यापेक्षा डेटाची असलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर काम करणे गरजेचे आहे,” असे पवन दुग्गल यांनी सांगितले.