उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. या अद्भुत वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने लोक येतात. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचा (युनेस्को) दर्जा असलेल्या जागतिक वारसा स्थळाला सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. ताजमहालला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत आणि पाण्याची गळतीही होत आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) या स्मारकाच्या देखभालीसाठी जबाबदार असलेली राष्ट्रीय संस्था आहे. काही दिवसांपूर्वी या वास्तूमधून वनस्पती उगवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले; ज्यानंतर या संस्थेवर टीका करण्यात येत आहे. या व्हिडीओवरून समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह काहींनी या व्हडिओवरून उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आहे. ताजमहालचे किती नुकसान झाले आहे? याचा अर्थ काय? जाणून घेऊ.

ताजमहाल धोक्यात?

ताजमहालच्या पांढऱ्या संगमरवरी भिंतींवर भेगा पडल्या आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (टीओआय) च्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला आग्रा येथे मुसळधार पाऊस पडल्यानंतर १७ व्या शतकातील या स्मारकाच्या भिंती, मजले आणि इतर भागांवर भेगा पडल्या. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये या स्मारकाला तडे गेल्याचे दिसून येते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुख्य घुमटावर कोरलेले कुराणचे श्लोकही फिकट होऊ लागले आहेत. ‘टीओआय’शी बोलताना, टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस शकील चौहान म्हणाले, “मुख्य घुमटाच्या सभोवतालच्या दरवाजांवर अरबी भाषेतील कुराणातील श्लोक कोरलेले आहेत, त्यांची अक्षरे हळूहळू फिकट होत आहेत.”

“पिएट्रा ड्युरा या क्लिष्ट तंत्राने भिंतींमध्ये घातलेले अर्ध-मौल्यवान दगडदेखील निखळत आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : मस्क यांचा नवीन निर्णय; ‘एक्स’वर एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही दिसणार पोस्ट, काय आहेत धोके?

“पिएट्रा ड्युरा या क्लिष्ट तंत्राने भिंतींमध्ये घातलेले अर्ध-मौल्यवान दगडदेखील निखळत आहेत. पश्चिम दिशेला, शाही मशिदीसमोरील मजल्यावरील दगड निखळले आहेत. मुख्य समाधीच्या काही भागांवर आणि प्रतिष्ठित घुमटाच्या भिंतींवर नुकसान झाल्याचे दिसून येते,” असे आरोप शकील चौहान यांनी केले आहेत. स्मारकामध्ये उगवलेल्या वनस्पतीच्या व्हिडीओंमुळे खराब देखभालीचा आरोपही सुरू झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ताजमहालच्या मध्यवर्ती घुमटातून पिंपळाच्या झाडाची पाने निघाल्याचे दिसून येत आहे. अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी ‘टीओआय’ला सांगितले की, स्मारकाच्या भिंतीवरील सर्व झाडे ऑगस्टमध्ये काढून टाकण्यात आली होती. व्हिडीओमध्ये दिसणारी वनस्पती काही महिन्यांपूर्वी दिसली होती; ज्याला तात्काळ काढून टाकण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

एका निवृत्त एएसआय अधिकाऱ्याने इशारा दिला आहे की, जर वनस्पती तात्काळ बाहेर काढली गेली नाही तर स्मारकाला दीर्घकालीन संरचनात्मक नुकसान होऊ शकते. ताजमहालच्या संगमरवरी भिंतीवर वनस्पती वाढल्याचे वृत्त हे तेथे पाण्याची गळती झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आले. ताजमहाल परिसरातील बाग पाण्याखाली गेली असल्याचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आग्रा येथील मुसळधार पावसामुळे संगमरवरी संरचनेतून स्मारकाच्या आत पाण्याची गळती होत आहे. मुख्य म्हणजे, मुघल सम्राट शाहजहान आणि त्यांची पत्नी मुमताज यांचे थडगे असलेल्या खालच्या खोलीपर्यंत पाण्याचे थेंब पोहोचले असल्याची माहिती आहे.

एएसआय आणि उत्तर प्रदेश सरकारसमोर प्रश्न

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या या स्मारकाच्या देखभालीचा मुद्दा जोर धरत आहे. त्यावरून एएसआय आणि उत्तर प्रदेश सरकारवर आरोप केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी ताजमहालच्या संगमरवरी भिंतींमधून वनस्पतींची वाढ दर्शवणारा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. “भाजपा सरकार आणि त्यांचे निष्क्रिय विभाग ताजमहालची देखभाल करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुख्य घुमटातून पाणी गळत आहे, झाडे वाढत आहेत; अशा झाडांची मुळे वाढली तर ताजमहालला तडे जाऊ शकतात,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

ताजमहाल येथे दरवर्षी सुमारे ८० लाख पर्यटक येतात. शाहजहानने त्याची पत्नी मुमताजसाठी बांधलेल्या या स्मारकाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. १७ व्या शतकातील या स्मारकाबद्दल टूर आयोजकांसह जनतेनेही चिंता व्यक्त केली आहे. टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चौहान यांनी ‘टीओआय’ला सांगितले की, “भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ताजमहालच्या जतनासाठी वार्षिक चार कोटी रुपये खर्च करते.” सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले की, या प्रतिष्ठित वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी स्मार्ट आर्किटेक्चरची आणि योग्य नियोजनाची गरज आहे.

ताजमहालच्या आवारात बुडलेल्या बागेचा व्हिडीओ पोस्ट करणारे स्थानिक राम यादव यांनी लिहिले, “मुसळधार पावसामुळे ताजमहाल पाण्याने वेढला गेला आहे. त्यातून स्पष्ट लक्षात येते की, आपल्या शहराला योग्य नियोजन करणे किती महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठित इमारतींनाही आता बदलत्या हवामानाचा धोका आहे. आपल्या आधुनिक इमारतींचे/स्मारकांचे संरक्षण करून अशा आव्हानांना तोंड देऊ शकतील अशा स्मार्ट आर्किटेक्चर आणि शहर नियोजनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.” काहींनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर मुस्लीम स्मारक असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या या स्मारकाच्या देखभालीचा मुद्दा आता उपस्थित करण्यात येत आहे. (छायाचित्र-पीटीआय)

यावर ‘एएसआय’ची प्रतिक्रिया काय?

‘एएसआय’ने दावा केला आहे की, ताजमहालमध्ये कोणत्याही गंभीर संरचनात्मक समस्या नाहीत. “आम्ही ताजमहालच्या मुख्य घुमटात गळती पाहिली. परंतु, जेव्हा आम्ही तपासले तेव्हा आम्हाला तिथे ओलावा दिसून आला आणि असेही दिसून आले की, मुख्य घुमटाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही ड्रोन कॅमेरा वापरून मुख्य घुमट तपासला आहे,” असे आग्रा एएसआय अधिकारी राजकुमार पटेल यांनी ‘द हिंदू’ला सांगितले. ‘टीओआय’च्या वृत्तानुसार, पावसाचे पाणी साचल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘एएसआय’च्या तज्ज्ञांनी थडग्याच्या छताचे आणि घुमटाचे सर्वेक्षण केले. “मुख्य घुमटाचे सर्वेक्षण ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आले, त्यावर काही प्रमाणात गंज दिसून आला. या गंजमुळे दगडात भेगा पडू शकतात; ज्यामुळे पाणी गळती होऊ शकते.

हेही वाचा : पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?

भविष्यात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी आता या तड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुख्य थडग्याच्या आत ओलावा दिसून आला आहे; ज्यामुळे घुमटाच्या दगडांवर बारीक तडे जाण्याची शक्यता आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले. राष्ट्रीय संस्था ‘एएसआय’वर भ्रष्टाचार आणि निधीच्या गैरव्यवस्थापनाचे आरोप केले जात आहेत. मात्र, एएसआयने हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे, ताजमहालच्या देखभालीसाठी खर्च केलेल्या निधीचे वेळोवेळी ऑडिट केले जाते. आतापर्यंत या ऑडिटमध्ये कोणतीही चूक दिसून आलेली नाही.”