नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (एनपीसीआय) डिजिटल व्यवहार मंच असलेल्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमुळे (यूपीआय) रोकडविरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले आहे. रिझर्व्ह बँकेने नागरिकांना सुरुवातीला त्यांचे ‘रुपे’ क्रेडिट कार्ड यूपीआयशी संलग्न करण्याची परवानगी दिली होती. आता सर्वच कंपन्यांची क्रेडिट कार्डे यूपीआयशी संलग्न करता येणार आहेत. त्यामुळे त्याद्वारे थेट व्यवहार करता येतील. ते केवळ क्यूआर कोड स्कॅन करून क्रेडिट कार्डचे व्यवहार करू शकतील. यूपीआयशी रुपे क्रेडिट कार्ड संलग्न करण्यामुळे व्यवहार करणे सोपे झाले. डिजिटल व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण या बाबी सहजसोप्या झाल्या. मात्र, याचे काही फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या गोष्टी शक्य झाल्या?

क्रेडिट कार्ड यूपीआयशी संलग्न करण्यात आल्याने ग्राहकांना एकाच मंचावर अनेक व्यवहार करता येऊ लागले. त्यात देयक भरणा, ऑनलाइन खरेदी, व्यापाऱ्यांना पैसे वर्ग करणे हे सर्व व्यवहार ग्राहकांना अतिशय सहजपणे शक्य झाले. एखाद्या व्यापाऱ्याकडे पॉइंट ऑफ सेल यंत्र नसेल तर यूपीआयशी क्रेडिट कार्ड संलग्न असल्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करता येऊ लागले. एखाद्या भाजीवाल्यालाही तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे यूपीआयच्या माध्यमातून पैसे देऊ शकता. यासाठी क्रेडिट कार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. क्रेडिट कार्ड हे यूपीआयशी संलग्न केल्यामुळे अधिक प्रभावी, सहज आणि सोयीने व्यवहार करता येऊ लागले.

हेही वाचा… विश्लेषण: २६ आणि २२…? कुणाच्या वाट्याला किती? भाजप-शिंदे-अजितदादांसमोर सहमतीचे आव्हान!

ग्राहकाला काय फायदा?

यूपीआयशी क्रेडिट कार्ड संलग्न केल्यामुळे ग्राहकाला मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार करता येऊ लागले. ग्राहकांसाठी ही अतिशय सोयीची बाब आहे. याच वेळी यूपीआयद्वारे करण्यात आलेले क्रेडिट कार्ड व्यवहार जलद प्रक्रिया होणारे आणि ग्राहकांना तातडीने परतावा मिळवून देणारे ठरले. याचबरोबर हे व्यवहार अतिशय कमी वेळेत होत आहेत. यूपीआयचा वापर सर्व स्तरातील व्यवहारांमध्ये होत आहे. एखाद्या छोट्या व्यापाऱ्यापासून ई-कॉमर्स बाजारपेठेपर्यंत यूपीआयचा विस्तार झाला आहे. याचबरोबर विविध प्रकारचे देयके भरण्यासाठी यूपीआयचा वापर करता येतो. यामुळे ग्राहकाला क्रेडिट कार्डचे संपूर्ण तपशील प्रत्येक वेळी न देता यूपीआयद्वारे लगेच व्यवहार शक्य झाले. यूपीआय प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना आहेत. त्यात बायोमेट्रिकसह एमपिनचा वापर करून धोका कमी करता येतो. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचाही धोका नसतो.

कर्जाची सहज उपलब्धता?

क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकाला पूर्वनिश्चित कर्जमर्यादेएवढी रक्कम वापरता येते. त्यामुळे त्याच्या हातात सहजपणे या कर्जाचा पैसा केवळ खुळखुळणार नसून, तो त्याला खर्चही करता येणार आहे. त्यातच क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांना अनेक प्रकारचे परतावे देत असतात. त्यात रिवॉर्ड पॉइंट्सचा समावेश आहे. यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे व्यवहार वाढून ग्राहकांचे रिवॉर्ड पॉइंट्स वाढून त्याचा फायदा त्यांना होईल. तसेच, अनेक वेळा व्यवहारावर परतावाही दिला जातो. त्यामुळे ग्राहक अधिकाधिक प्रमाणात यूपीआयद्वारे क्रेडिट कार्डचा वापर करण्यास प्राधान्य देतील.

अतिखर्चाचा धोका?

यूपीआयशी क्रेडिट कार्ड संलग्न करण्यात खर्च वाढण्याचा प्रमुख धोका आहे. कारण व्यवहार सहजशक्य झाल्याने ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण वाढू शकते. यूपीआयचे व्यवहार सहजसोप्या पद्धतीने होतात, त्यामुळे ग्राहकांचे त्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यातून वित्तीय शिस्त बिघडण्याचा धोका असून, ग्राहकाचे आर्थिक गणित बिघडवणारा हा घटक ठरू शकतो. यातून मार्ग काढण्यासाठी ग्राहकाने महिन्याला खर्चाची मर्यादा आखून घ्यायला हवी. आपले बचत खाते, त्यातील शिल्लक आणि महिन्याचे अंदाजपत्रक याचा ताळमेळ लावूनच खर्च करायला हवे. मात्र, याचे पालन किती ग्राहक करतील, याबद्दल तज्ज्ञ साशंक आहेत.

व्यापाऱ्यांमध्ये चिंता का?

यूपीआयशी संलग्न क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करणे अतिशय सोपे असले तरी त्याचे काही तोटे आहेत. हे तोटे प्रामुख्याने व्यापाऱ्यांना आहेत. यूपीआयद्वारे व्यवहार करताना व्यापाऱ्यांना मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) द्यावा लागतो. बँका डिजिटल व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांकडून हे शुल्क घेतात. व्यवहाराच्या रकमेच्या प्रमाणात हे शुल्क आकारले जाते. या शुल्कातील काही हिस्सा कार्ड देणारी बँक आणि उरलेला हिस्सा रुपे, व्हिसा अथवा मास्टरकार्ड यासारख्या सेवा पुरवठादारांना दिला जातो. जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा यूपीआयवर व्यवहार करेल त्यावेळी एमडीआर लागू होतो. साहजिकच क्रेडिट कार्डद्वारे यूपीआयवर मोठे व्यवहार वाढून त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना बसेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credit card transactions through upi what are the advantages and disadvantages print exp dvr