Joshimath Uttarakhand गेल्या काही वर्षांत जोशीमठचे नाव अनेकदा चर्चेत आले आहे. जोशीमठला सामाजिकच नाही तर धार्मिक महत्त्वही लाभले आहे. जोशीमठ उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. जोशीमठ तहसीलचे ज्योतिर्मठ आणि नैनिताल जिल्ह्यातील कोसियाकुटोली तहसीलचे नाव श्री कैंची धाम तहसील करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला होता. उत्तराखंड सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने बुधवारी (१२ जून) मंजुरी दिली. उत्तराखंड धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या निर्णयामुळे या भागाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे का? या ठिकाणाचे नामकरण करण्यामागचा उद्देश काय? या जागेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? याविषयी जाणून घेऊ या.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानेही नामांतरासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. भारतीय सर्वेक्षण आणि भारतातील नकाशे तयार करण्यासाठी जबाबदार असलेली संस्था ही केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. गेल्या वर्षी जोशीमठ येथील जमीन खचल्यामुळे शहरातील अनेक रस्ते आणि शेकडो इमारतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले होते, तेव्हा जोशीमठची चर्चा अधिक झाली. दुसरीकडे, कोसियाकुटोली तहसील नीम करोली बाबांच्या कैंची धाम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.
हेही वाचा : Railway Accident: देशाला हादरवणारे ९ भीषण रेल्वे अपघात
आदि शंकराचार्य आणि ज्योतिर्मठाची कथा
ज्योतिर्मठाला हिमालयाचा दरवाजादेखील म्हटले जाते. तसेच ज्योतिर्मठला ज्योतिर पीठ म्हणूनही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की, ज्योतिर्मठ चार प्रमुख मठांपैकी एक आहे, ज्याची स्थापना आठव्या शतकातील तत्त्वज्ञ आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी भारतभर केली होती. ज्योतिर्मठाची स्थापना अध्यात्मिक ज्ञान आणि प्रथा यांचे जतन आणि प्रसारासाठी करण्यात आली. असे मानले जाते की, जेव्हा आदि शंकराचार्य येथे आले तेव्हा त्यांनी अमर कल्पवृक्ष नावाच्या झाडाखाली तपश्चर्या केली. ज्योतिर्मठ हे नाव त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशातून आले आहे, ज्याचा अर्थ ‘ज्योति’ म्हणजेच दिव्य प्रकाश असा होतो, असे सांगण्यात येते.
ज्योतिर्मठ ते जोशीमठ
ज्योतिर्मठ हे या भागातील डोंगरी शहराचे प्राचीन नाव होते. कालांतराने स्थानिक लोक या भागाचा उल्लेख ‘जोशीमठ’ असा करू लागले. हा बदल प्रादेशिक भाषा, स्थानिक बोली आणि उच्चाराच्या प्रभावामुळे झाला. ब्रिटीश वसाहतवादी राजवट येण्यापूर्वी जोशीमठ हे नाव वापरात आले. त्यामुळे या नावाची सरकारी नोंदीमध्ये नोंद झाली. त्या नंतर तहसील आणि ब्लॉक तयार झाल्यावर त्यांनाही जोशीमठ असे नाव पडले. ‘ज्योतिर्मठ’ धार्मिक संदर्भात वापरले जात असताना, ‘जोशीमठ’ हे नाव अधिक सामान्यपणे वापरले जाऊ लागले. अलीकडच्या वर्षांत, काही रहिवाशांनी शहराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन नाव बदलण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गेल्या वर्षी चमोली येथे आयोजित एका कार्यक्रमात नाव बदलण्याची घोषणा केली होती. या नावाला अधिकृत मान्यता मिळाल्यास अध्यात्मिक केंद्र म्हणून शहराचा दर्जा वाढेल, अधिक यात्रेकरू आकर्षित होतील आणि त्यामुळे स्थानिक पर्यटन व आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, या भागात वाढत असलेले पर्यटन आणि विकास कार्येदेखील पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. विशेषत: या प्रदेशातील पर्यावरणीय संवेदनशीलतेमुळे.
कोसियाकुटोलीचे सांस्कृतिक महत्त्व
कोसियाकुटोली येथे नीम करोली बाबा यांचं आश्रम आहे. जगभरात हा आश्रम प्रसिद्ध आहे. कोसियाकुटोलीचे परगणा श्री कैंची धाम असे नामकरण करण्यात आले आहे. कारण, नीम करोली बाबांच्या आश्रमाचे नावही कैंची धाम आहे. या आश्रमाला जगभरातील भक्त भेट देत असतात. ‘कोसियाकुटोली’ नावात ‘कोसी’ हे नाव नैनिताल जिल्ह्यातून वाहणार्या आणि उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या कोसी नदीचा संदर्भ म्हणून घेण्यात आले होते. ही नदी निसर्गसौंदर्यामध्ये भर घालण्याबरोबरच, स्थानिक पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे. ‘कुटोली’ हा शब्द गाव किंवा वस्तीचा संदर्भ देतो, जो स्थानिक भाषेतून आला होता. अशाप्रकारे या जिल्ह्याला कोसियाकुटोली नाव देण्यात आले होते. कुमाओनी भाषेत, एखाद्या ठिकाणाला नदीसारख्या प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार नाव देणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा नावांचा अर्थ अनेकदा स्थानिक इतिहास किंवा सांस्कृतिक गुणधर्मांशी जोडला जातो.
नीम करोली बाबांचे आश्रम
कोसियाकुटोली जिल्हा नीम करोली बाबा आणि त्यांनी १९६२ मध्ये स्थापन केलेल्या कैंची धाम आश्रमासाठी ओळखला जातो. नीम करोली बाबा एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू होते, ज्यांचे भारतासह परदेशातही अनुयायी आहेत. १९७३ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या अनुयायांमध्ये ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स, हार्वर्ड विद्यापीठाचे माजी प्राध्यापक राम दास (पूर्वीचे नाव रिचर्ड अल्पर्ट) आणि कीर्तन गायक कृष्णा दास यांचा समावेश आहे, ज्यांनी त्यांच्या शिकवणीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यास मदत केली. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीनेही त्यांच्या आश्रमाला भेट दिली आहे.
हेही वाचा : Kanchanjunga Express Accident: भारतात एवढे रेल्वे अपघात होण्याची कारणं काय?
नीम करोली बाबा यांनी असंख्य आजारी लोकांना चमत्कार करून बरे केले, असे मानले जाते. हजारो भक्त दरवर्षी कैंची धाम आश्रमात येतात, विशेषत: १५ जून रोजी. १५ जून रोजीच या आश्रमाची स्थापना करण्यात आली होती. या जिल्ह्यांच्या नामांतरामुळे या जागांना पर्यटकांमध्ये आणखी महत्त्व प्राप्त होईल, असे सांगितले जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd