अमेरिकेतली बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना एलॉन मस्क यांचा धडकी भरवणारा ई-मेल मिळाला आहे. ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रोबेशनवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्येही आपली नोकरी जाते की काय अशी धाकधूक आहे. अशात मस्क यांच्याकडून कामाचा आढावा मागणारा ईमेल आल्याने काय करावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
हा ई-मेल सरकारला अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्या एफबीआय चीफ काश पटेल आणि मस्क यांच्यात ठिणगी पडली आहे.
२२ फेब्रुवारीला अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही मागील आठवड्यात काय काम केले याचा आढावा सांगण्याबाबत एक ई-मेल आला. या मेलसंदर्भात एलॉन मस्क यांनी एक्सवर आधीच अल्टिमेटम दिला होता.
सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी मागील आठवड्यात काय केले याची सविस्तर माहिती सांगण्याबाबतचा ई-मेल लवकरच मिळेल. या मेलचे उत्तर न दिल्यास तो त्या कर्मचाऱ्याचा राजीनामा समजला जाईल, अशी पोस्ट मस्क यांनी मेल पाठवण्याआधी एक्सवर केली होती. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाअंतर्गत स्थापन केलेल्या DOGE म्हणजेच गव्हर्नमेंट एफिशिन्यसी विभागाचे प्रमुख म्हणून एलॉन मस्क यांच्यावर जबाबदारी आहे. या विभागाअंतर्गत मस्क यांच्यावर सरकारचा अपव्यय कमी करणं आणि कार्यक्षमता सुधारण्याची जबाबदारी आहे.
काय आहे हा ई-मेल?
या ई-मेलला साधारण ५ मुद्द्यांमध्ये उत्तर द्या. तुम्ही मागच्या आठवड्यात काय काम केले हे सांगत तुमच्या मॅनेजरला सीसी ठेवा. कृपया कोणतेही क्लासिफाइड, लिंक किंवा अटॅचमेंट्स यासोबत पाठवू नका. उत्तर देण्यासाठी सोमवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंतची अंतिम मुदत तुमच्याकडे आहे असं या मेलमध्ये लिहिलेलं आहे.
या ई-मेलचे समर्थन करत मस्क यांनी सुट्टीच्या दिवशीसुद्धा एक्सवर पोस्ट करत सांगितले, “हा मेल पाठवण्यामागचं कारण हेच आहे की अनेक कर्मचारी जेवढं काम सरकारसाठी करायला हवं ते करत नाहीत आणि याचा पुरावा म्हणजे बरेच कर्मचारी साधा ई-मेलही चेक करत नाहीत”.
पुढे त्यांनी असेही म्हटले की काही प्रकरणांमध्ये अस्तित्वात नसलेले किंवा मृत व्यक्तींच्या नावे पेचेक गोळा केल्याचे निदर्शनास आला आहे. ही एक मोठी फसवणूक आहे. मात्र या आरोपांबाबत त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
प्रतिक्रिया काय आहे?
असे ई-मेल किंवा कोणतीही कार्यप्दधती स्पष्ट करण्यासाठी ठोस प्रणाली नाहीये. तसंच स्पष्टतेचा अभाव असल्यामुळे कर्मचाऱ्यांची याबाबत चिडचिड होत आहे. याचं एफबीआय आणि राज्यविभाग उत्तम उदाहरण आहेत. न्यूयॉर्क टाइम्सला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास या ई-मेलला काही उत्तर देऊ नका असं एफबीआयच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आलेले एफबीआय संचालक काश पटेल यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना या सर्व प्रकारानंतर एक ई-मेल पाठवला आहे. त्यात ते म्हणाले की, एफबीआयच्या नियमांनुसार आपण या सगळ्याबाबत पुनरावलोकन करणार आहे. पण तोपर्यंत कोणीही कुठलीही प्रतिक्रिया ई-मेलला देऊ नये.
अमेरिकी सरकार हे अवाढव्य आहे. प्यू रिसर्च सेंटरनुसार, अनेक एजन्सी आणि विविध विभाग मिळून ३ मिलियनपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. सर्वांचे कामाचे आदेश आणि त्याचे पालन होणं किंवा नाही हे सुनिश्चित करणं कठीण आहे.
दुसरं म्हणजे मस्क आणि DOGEकडून काहीच दिवसांत सूचनांचा भडिमार होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या या नवीन हालचालींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरता आणि भीतीचे वातावरण पाहिले गेले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये, अनेक कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकण्यात आलं आहे. तसंच काहींना पगारावर राहण्यासाठी ‘डिफर्ड रेजिगनेशन प्रोग्राम’मध्ये सामील होण्यास सांगितले. पण शेवटी नोकरी तर जाणारच आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकरीबाबत अनिश्चितता वाटत आहे.
अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ही सर्वात मोठी कर्मचारी संघटना आहे. या ई-मेलचे पालन न केल्यास कोणत्याही बेकायदेशीर बडतर्फीला आव्हान कर्मचारी देऊ शकतात. मस्क आणि ट्रम्प यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रती अतिशय तिरस्कार दाखवल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष एव्हरेट केली यांनी केला आहे.
अनेक सरकारी सेवेत रूजू असणारे कर्मचारी जे अनेकांसाठी काम करतात त्यांना त्यांच्या कामाचे स्पष्टीकरण द्यायला सांगणे आणि तेही त्यांच्याकडून ज्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत, जे कधीही निवडून आलेले नाहीत असे अब्जाधीश, ज्यांनी आयुष्यात एक तासही प्रामाणिक सार्वजनिक सेवा केलेली नाही. हे अतिशय क्रूर आणि अनादर करणारे असल्याचेही केली यांनी म्हटले आहे.