२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील जवळपास दोन कोटी १० लाख वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक करण्यात आले. एक एप्रिलपासून ज्यांच्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट नसेल अशा वाहनांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या दंडाचा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक वाहनचालक धडपड करीत आहेत. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामह अन्य समाजमाध्यमांवर लिंक पाठवून किंवा बनावट संकेतस्थळाचा ॲड्रेस टाकून अनेकांना जाळ्यात ओढत आहे. ‘लिंकवर क्लिक करा आणि घरपोच मिळवा एचआरएसपी प्लेट’, अशी आमिषे दाखवत आहेत. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक शहरातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
एचएसआरपी म्हणजे नेमके काय?
हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड प्लेट म्हणजेच एचएसआरपी होय. सरकारने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सींच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन एचएसआरपीची ऑनलाइन नोंदणी करावी लागते. आपल्या वाहनांची माहिती नोंदवावी लागते. त्यानंतर नोंदणी दरम्यान, वाहनाच्या तपशीलांची सत्यता अधिकृत पोर्टलद्वारे तपासली जाते. निर्धारित तारखेला आपल्या वाहनावर एचएसआरपी बसवण्यासाठी नियुक्त केंद्रावर वाहन घेऊन जावे लागते. वाहनाच्या प्रकारानुसार शुल्क भरावे लागते. वाहनचालकांना एक प्रमाणपत्र मिळते. मात्र, ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करावी लागते. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
सायबर गुन्हेगार कसे करतात लक्ष्य?
राज्यातील प्रत्येक वाहनाला एचएसआरपी लावणे अनिवार्य केल्यामुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने एचएसआरपीची नोंदणी करण्यासाठी घाई करीत आहेत. प्रत्येक वाहनचालकाला ऑनलाइन नोंदणी कशी करावी, ती नोंदणी कुठे करावी आणि कशी करावी याबाबत माहिती नसते. या संभ्रमाच्या स्थितीचा फायदा सायबर गुन्हेगारांनी उचलला आहे. सायबर गुन्हेगार अनेकांना फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि विविध संकेतस्थळांवर लिंक पाठवत आहेत. अनेक वाहनचालक समाजमाध्यमांवर येणाऱ्या संदेशांचा बळी पडत आहेत. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटच्या नोंदणी करा आणि एका मिनिटात आणि घरबसल्या नवीन नंबर प्लेट मिळवा, असा संदेश पाठवून खाली लिंक पाठवण्यात येत आहे. असे संदेश पाठवणारे दुसरे-तिसरे कुणी नसून सायबर गुन्हेगार आहेत.
बनावट लिंक कशी ओळखावी?
सरकारने एचएसआरपी नोंदणी करण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांनी वरील शासनाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असणारे बनवाट संकेतस्थळ निर्माण केले आहे. हुबेहूब शासनाच्या संकेतस्थळासारखे दिसणाऱ्या संकेतस्थळावर जाऊन अनेक वाहनचालक अर्ज भरत आहेत. अशा वाहनचालकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करीत आहेत. मात्र, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन https://transport.maharashtra.gov.in खात्री करावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.
कोणत्या शहरांत सक्रिय?
राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या शहरातील अनेक वाहनचालकांना सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले आहे. सायबर पोलीस ठाण्यात तक्रारीसुद्धा दाखल आहेत. एचएसआरपी नोंदणीसाठी केवळ ४५० रुपयांचे शुल्क लागते. मात्र, सायबर गुन्हेगार शुल्क भरण्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड विचारतात. तसेच मोबाइलवर लिंक पाठवून खाते रिकामे करतात. सध्या सायबर गुन्हेगारांनी राज्यातील महानगरातील वाहनचालकांना लक्ष्य केले आहे. पुणे ग्रामीण आणि काही जिल्ह्यातही सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दंडाची भीती घालून गैरफायदा?
एचएसआरपी नोंदणी न केल्यास १० हजारांचा दंड भरावा लागू नये म्हणून मिळेल त्या मार्गाने नोंदणी करण्याचा प्रयत्न अनेक वाहनचालक करीत आहेत. एक एप्रिलपूर्वीच नंबर प्लेट देण्याचे आमिष सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ किंवा लिंकवरून देतात. त्यांच्या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर काही मिनिटातच एक ‘एपीके फाइल’ आपल्या मोबाइलवर येते. त्यावर एचएसआरपी प्रमाणपत्र किंवा ‘नंबर प्लेट’ असे लिहिलेले असते. अनेक जण उत्सुकतेपोटी ‘एपीके फाइल डाऊनलोड’ करतात. त्यामुळे फोन काही मिनिटांसाठी बंद पडतो. तोपर्यंत सायबर गुन्हेगार आपल्या मोबाइलमध्ये प्रवेश करून बँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक करतो.
फसवणूक झाली तर काय करावे?
सायबर गुन्हेगाराने नवीन नंबर प्लेटच्या नोंदणीसाठी लिंक पाठवून किंवा बनावट संकेतस्थळावरून जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केल्यास गोंधळून जाऊ नये. चोवीस तासांच्या आत थेट सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करावी. १९३० या नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर कॉल करावा. राष्ट्रीय सायबर क्राइम नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. लगेच आपल्या बँकेशी संपर्क साधून खाते गोठवावे. तसेच एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डसुद्धा ब्लॉक करावे. जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करता येऊ शकते.